हुकमी एक्का अलमोएझ

किशोर पेटकर
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

क्रीडांगण
 

बलाढ्य जपानला ३-१ गोल फरकाने पराभूत करून कतारने आशिया करंडक फुटबॉल स्पर्धा प्रथमच जिंकली. जपान हा चार वेळचा माजी विजेता संघ, तुलनेत कतारचा संघ नव्या दमाचा. २०२२ मध्ये कतारमध्ये विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर फेलिक्‍स सांचेझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आशिया करंडक स्पर्धेतील यश लक्षवेधक ठरले. केवळ यजमान या नात्याने विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळायचे नाही हे कतारच्या फुटबॉलपटूंनी सिद्ध केले आहे. पश्‍चिम आशियातील राजकीय परिस्थिती ‘स्फोटक’ आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कतारच्या समर्थकांना यजमान संयुक्त अरब अमिरातीत प्रवेश नव्हता, तरीही या देशाच्या संघाने सर्वोत्तम कौशल्य प्रदर्शित करत करंडक पटकाविला. या संघाचा २२ वर्षीय स्ट्रायकर अलमोएझ अली याची कामगिरी उठावदार ठरली. त्याने ‘गोल्डन बूट’बरोबरच स्पर्धेतील ‘मौल्यवान खेळाडू’ हा किताबही पटकाविला. अलमोएझ याने नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. आशिया करंडक स्पर्धेच्या मुख्य फेरीत सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम त्याने बजावला. एकूण नऊ गोल करताना त्याने इराणचा महान फुटबॉलपटू अली देई याचा विक्रम मोडला. अली देई याने १९९६च्या आशिया करंडक स्पर्धेत आठ गोल नोंदविले होते. यंदा अलमोएझ याने एक गोल जास्त केला. जपानविरुद्धच्या अंतिम लढतीत प्रेक्षणीय ‘बायसिकल किक’वर अलमोएझने चेंडूला नेटचे अचूक दिशा दाखवत तब्बल २३ वर्षे अबाधित राहिलेला कीर्तीमान मागे टाकला.

गोल मशिन
अलमोएझ अली याला कतार फुटबॉलमध्ये ‘गोल मशिन’ मानले जाते. तीन वर्षांपूर्वी त्याने कतारच्या संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हापासून तो संघाचा प्रमुख खेळाडू आहे. गतवर्षी २३ वर्षांखालील एएफसी कप स्पर्धेत कतारला तिसरा क्रमांक मिळाला. तेव्हा त्याने स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल नोंदविले होते. संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या यावेळच्या आशिया करंडक स्पर्धेत अलमोएझ याने गोलधडाका राखला. लेबनॉनविरुद्ध एक गोल केल्यानंतर त्याने उत्तर कोरियाविरुद्ध ५१ मिनिटांच्या खेळात तब्बल चार गोल डागले. सौदी अरेबियाविरुद्धच्या लढतीत दोन गोल नोंदविल्यानंतर यजमान संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या उपांत्य लढतीत त्याने स्पर्धेतील वैयक्तिक आठवा गोल करून इराणच्या देई याला गाठले. जपानविरुद्ध त्याने स्पर्धेतील नवा उच्चांक गाठला. येत्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या कोपा अमेरिका स्पर्धेसाठी कतारला निमंत्रित करण्यात आले आहे. त्या स्पर्धेत दक्षिण अमेरिकेतील नामवंत फुटबॉल संघाविरुद्ध खेळताना अलमोएझच्या कामगिरीकडे लक्ष राहील. युरोपियन क्‍लब मध्ये देखील त्याच्या खेळाचे औत्सुक्‍य असेल. आक्रमक खेळाडू या नात्याने त्याची छाप पाडणारी शैली, गोल करण्याची हुकमत पाहता या २२ वर्षीय फुटबॉलपटूचे भवितव्य उज्ज्वल आहे.

पात्रतेवरून वाद
उपांत्य लढतीत चार गोलांनी हार पत्करलेल्या संयुक्त अरब अमिरातीने कतारच्या दोघा खेळाडूंच्या पात्रतेसंदर्भात आशियाई फुटबॉल महासंघाकडे (एएफसी) तक्रार नोंदविली. कतारच्या संघातील अलमोएझ अली हा सुदानचा, तर बास्सम अल रावी हा इराकचा असल्याचा दावा संयुक्त अरब अमिरातीने केला. मात्र एएफसी शिस्तपालन आणि आचारसंहिता समितीने हा दावा फेटाळून लावल्यामुळे अलमोएझ अंतिम लढत खेळू शकला. त्याचा जन्म ईशान्य आफ्रिकेतील सुदान देशातील असला, तरी त्याचे बालपण कतारमध्येच गेले आहे. अलमोएझच्या माहितीनुसार, त्याची आई मूळची कतारची आहे. बालपणीच तो आपल्या आईच्या देशात आला. अल मेसैमीर हा त्याचा लहानपणीचा पहिला क्‍लब. त्यानंतर तो कतारमधील नामवंत ॲस्पायर फुटबॉल अकादमीत दाखल झाला. कतारमधील युवा फुटबॉल गुणवत्तेला विकसित करण्याच्या उद्देशाने २००४ मध्ये ॲस्पायर अकादमीची स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी त्याच्या गुणवत्तेवर सुमारे सात वर्षे शास्त्रोक्त पैलू पाडले गेले. त्यानंतर तो युरोपमध्येही काही काळ खेळला. बेल्जियम, ऑस्ट्रिया, तसेच स्पेनमधील क्‍लबने त्याला करारबद्ध केले होते. २०१६ मध्ये तो पुन्हा कतारमध्ये परतला.   

संबंधित बातम्या