रेक्स सिंगचा भन्नाट वेग
क्रीडांगण
मणिपूरमधील इंफाळपासून सुमारे तीन किलोमीटर दूर असलेल्या गावातील एक नवोदित मुलगा सध्या भारतीय क्रिकेटमध्ये लक्ष वेधत आहे. वडील ट्रक ड्रायव्हर. त्यांच्या कमाईवर कुटुंबाचा चरितार्थ चालतो. त्यातच इंफाळमध्ये क्रिकेटच्या अत्याधुनिक सुविधांचाही अभाव. तरीही, राजकुमार रेक्स सिंग या १८ वर्षांच्या वेगवान गोलंदाजाचा उत्साह कमी झाला नाही. पालकांचे पाठबळ आणि प्रशिक्षकांचे प्रोत्साहन या बळावर या डावखुऱ्या फिरकी (स्विंग) गोलंदाजाने भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात स्थान मिळविले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या चार दिवसांच्या सामन्यासाठी संघ जाहीर केला, त्यात ईशान्येकडील रेक्सचे नाव झळकले. भारतीय संघात निवड होणारा मणिपूरचा हा पहिला क्रिकेटपटू ठरला. रेक्सच्या नैसर्गिक गुणवत्तेची दखल ‘बीसीसीआय’ने घेतली हे चांगले चिन्ह आहे. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ईशान्येकडील राज्ये देशांतर्गत क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आली. त्यापूर्वी तेथील क्रिकेटपटूंना फक्त सदस्य संघटनांच्या स्पर्धेत खेळण्याचीच थोडीफार संधी मिळायची, तीही बेदखल ठरत असे. जबरदस्त इनस्विंग असलेल्या रेक्सच्या निवडीमुळे देशाच्या ईशान्य भागातील क्रिकेट गुणवत्तेची ओळख झालेली आहे. फुटबॉल, बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट इत्यादी खेळातून ईशान्य भारतातील क्रीडापटू नावारूपास आले. पण आता क्रिकेट मैदानावरही तेथील गुणवत्ता प्रकाशमान होऊ लागली आहे, हे रेक्सच्या निवडीने जाणवते. रेक्सची गोलंदाजी पाहिलेले, त्याची तुलना भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाणशी करतात. मणिपूरच्या या हरहुन्नरी वेगवान गोलंदाजास अजून भरपूर मजल मारायची आहे, मात्र त्याने अपेक्षा उंचावल्या आहेत, हे निश्चित.
दहापैकी दहा...
युवा रेक्सने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कमाल केली. १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेच्या गटात त्याने डावात सर्वच्या सर्व दहाही फलंदाज बाद करण्याचा दुर्मीळ पराक्रम बजावला. या कामगिरीने मणिपूरचा हा प्रतिभावान गोलंदाज चर्चेत आला. अनंतपूर येथे झालेल्या चार दिवसांच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात रेक्सने सर्व १० विकेट्स पटकावून अरुणाचल प्रदेशचा डाव अवघ्या ३६ धावांत गुंडाळला. ९.५-६-११-१० असे भन्नाट गोलंदाजी पृथ्थकरण त्याने आपल्या नावे नोंदवले. रेक्सच्या गोलंदाजीचा दाह अरुणाचल प्रदेशचे फलंदाज सहन करू शकले नाहीत. त्याने त्या डावात पाच जणांच्या यष्ट्यांचा वेध घेतला. दोघांना पायचीत केले. दोघांचे झेल यष्टिरक्षकाने पकडले, तर एक फलंदाज झेलचीत झाला. या अफलातून कामगिरीची ‘बीसीसीआय’च्या ज्युनियर निवड समितीनेही दखल घेतली. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या त्या सामन्यात दोन्ही डावात मिळून रेक्सने ४४ धावांत १५ गडी बाद केले. त्यानंतर त्याला मणिपूरच्या रणजी क्रिकेट संघाचेही द्वार खुले झाले. इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क या वेगवान गोलंदाजांना आदर्श मानणाऱ्या रेक्सचा गोलंदाजीत अचूकता आणि फिरकीवर भर असतो. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आल्यानंतर त्याला वेगवान गोलंदाजीतील आणखी खुबी शिकायला मिळाल्या. अनुभवागणिक तो अधिकच परिपक्व होईल, हे स्पष्टच आहे.
क्रिकेटमध्ये कारकीर्द
रेक्स राजकुमार सिंग याची ‘लेदर बॉल’ क्रिकेटमधील कारकीर्द घडविण्यात प्रशिक्षक रोहेंद्र सिंग यांचा मोलाचा वाटा आहे. गावातील मैदानावर टेनिस बॉलने क्रिकेट खेळणाऱ्या वेगवान रेक्सची नैसर्गिक गुणवत्ता रोहेंद्र यांना भावली. तेव्हा हा गोलंदाज साधारणतः दहा वर्षांचा होता. त्यांनी रेक्सला ‘लेदर बॉल’ने वेगवान गोलंदाजी करण्यास प्रोत्साहित केले. नियमितपणे तायक्वांदोचा सराव करणाऱ्या, तसेच फुटबॉल खेळण्यावर भर देणाऱ्या रेक्सला क्रिकेट मैदानाची गोडी लागली. सदस्य संघटनांच्या वयोगट क्रिकेट स्पर्धेत २०१४ मध्ये त्याने बिहारविरुद्ध डावात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला. या कामगिरीने उत्तेजित झालेला रेक्स ‘लेदर बॉल’ने अधिकच भन्नाट मारा करू लागला, नंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.