‘टॉप १००’ मधील प्रज्ज्ञेश

किशोर पेटकर
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

क्रीडांगण
 

भारतीय टेनिसपटू प्रज्ज्ञेश गुणेश्‍वरन याने वयाच्या २९ व्या वर्षी कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन मिळवले आहे. जागतिक टेनिस पुरुष एकेरीत प्रथमच पहिल्या १०० खेळाडूंमध्ये त्याने जागा मिळवली आहे. एक बाब मान्य करायला हवी, ‘टॉप १००’ बनण्यासाठी प्रज्ज्ञेशला उशीरच झाला, पण त्याने दुखापतींवर मात करून सावरलेली कारकीर्द पाहता, ही कामगिरी कौतुकास्पद ठरते. गेल्या वर्षभरात चेन्नईच्या या डावखुऱ्या टेनिसपटूने जबरदस्त उसळी घेतली. मागील वर्षाच्या सुरुवातीला तो २४१ व्या स्थानी होता. या वर्षी ११ फेब्रुवारीस तो ९७ व्या क्रमांकावर आला. भारतीय टेनिसची सध्याची स्थिती पाहता, प्रज्ज्ञेशचे मानांकन लक्षणीय ठरते. दशकभरात ‘टॉप १००’ मध्ये येणारा तो तिसराच भारतीय ठरला. सोमदेव देववर्मन आणि युकी भांब्री यांच्यानंतर प्रज्ज्ञेशला जगातील पहिल्या शंभर टेनिसपटूंत स्थान मिळाले आहे. तो ही प्रगती किती काळ राखून ठेवतोय, हे पाहावे लागेल. सोमदेव ८३ आठवडे ‘टॉप १००’ मध्ये होता. त्यानंतर भांब्री ३७ आठवडेच पहिल्या १०० खेळाडूंत राहू शकला. प्रज्ज्ञेशसमोर आव्हान आहे. त्याने वर्षभरात ‘टॉप ५०’ मध्ये येण्याचा संकल्प केलाय, पण वाटचाल खूपच अवघड आहे, याची जाणीव त्यालाही आहे. पहिल्या १०० खेळाडूंत स्थान मिळविण्यापूर्वी, कोलकता येथे झालेल्या इटलीविरुद्ध डेव्हिस करंडक स्पर्धेत त्याला दोन्ही एकेरीतील सामने गमवावे लागले. चेन्नईतील चॅलेंजर स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या ३४७ व्या क्रमांकावरील अँड्य्रू हॅरिस याच्याकडून उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली. या कामगिरीने प्रज्ज्ञेश सावध झालेलाच असेल. परिश्रमाने मिळवलेले मानांकन सहजासहजी न गमावण्याचे उद्दिष्ट बाळगून त्याला मोसमात खेळावे लागेल.

वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी
प्रज्ज्ञेशसाठी २०१८ हे वर्ष यशस्वी ठरले. डिसेंबरअखेरीस तो १०७ व्या स्थानी होता. त्यापूर्वी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये त्याचे मानांकन २६६ क्रमांकापर्यंत घसरले होते. मात्र, नंतर त्याने उसळी घेतली. चार एटीपी चॅलेंजर एकेरी स्पर्धांची अंतिम फेरी गाठताना दोन विजेतिपदे पटकावली. त्याने कुन्मिंग चॅलेंजर आणि बंगळूर चॅलेंजर स्पर्धा जिंकली. निंग्बो चॅलेंजर व पुणे चॅलेंजर स्पर्धेत तो उपविजेता ठरला. जाकार्ता येथील आशियायी क्रीडा स्पर्धेत तो पुरुष एकेरीत कांस्य पदकाचा मानकरी ठरला. मागील वर्षीच्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याबाबत तो दुर्दैवी ठरला. पात्रता फेरीतील निर्णायक लढतीत त्याला निक किर्गिओस याच्याकडून हार पत्करावी लागली. किर्गिओसने माघार घेतल्यानंतर प्रज्ज्ञेशला पात्रतेची संधी मिळाली, पण त्याने पॅरिस सोडले तेव्हा आयोजकांनी निर्णय जाहीर केला. त्यामुळे संधी मिळूनही त्यावर पाणी पडले. प्रज्ज्ञेशला यावर्षी पुण्यात झालेल्या महाराष्ट्र ओपन स्पर्धेत ‘वाइल्ड कार्ड’ मिळाले, पण त्याला पहिली फेरी पार करता आली नाही. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याने पात्रतेचा अडथळा पार करून ग्रॅंड स्लॅमच्या मुख्य फेरीत खेळण्यास जागा मिळवली. पहिल्या फेरीत तो हरला, तरीही ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याचे त्याचे स्वप्न साकारले. सध्या तो भारताचा पुरुष एकेरीतील अव्वल टेनिसपटू आहे.

मेहनतीचे फळ
जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० खेळाडूंत स्थान मिळविल्यानंतर, २०१८ मधील मोसम आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरला. हे अथक मेहनतीचे फळ असून नव्या मोसमातील पहिले लक्ष्य साध्य झाल्याचे प्रज्ज्ञेशने सांगितले. ‘टॉप १००’ मध्ये टिकून राहाण्यासाठी सातत्यावर भर राखण्यास तो प्रयत्नशील आहे. जर्मनीत सराव करणाऱ्या प्रज्ज्ञेशसमोर फ्रेंच ओपन स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याचे आव्हान असेल. 
आक्रमक खेळ हे त्याचे वैशिष्ट्य! त्याचा परिणामकारक सर्व्ह हे त्याच्या भात्यातील प्रमुख अस्त्र आहे. मात्र, दुखापतीमुळे त्याच्या कारकिर्दीला योग्य दिशा गवसत नव्हती. तब्बल पाच वर्षे दोन्ही गुडघ्यांनी त्याला सतावले. त्यावर मात करत तो जागतिक टेनिसमध्ये सक्रिय झाला. फोरहॅंड, बॅकहॅंड फटके सुरेखपणे जुळू लागले. जगातील पहिल्या १०० खेळाडूंत स्थान मिळणे हा निव्वळ ‘अपघात’ नाही, तर प्रबळ आत्मविश्‍वासाची मिळकत असल्याचे प्रज्ज्ञेशने म्हटले आहे. 

संबंधित बातम्या