बॉक्‍सर अमितची कसोटी

किशोर पेटकर
सोमवार, 18 मार्च 2019

क्रीडांगण
 

बल्गेरियातील सोफिया येथे झालेल्या स्ट्रॅंडा आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेत भारताचा २३ वर्षांचा बॉक्‍सर अमित पंघाल याने सुवर्णपदक जिंकले. ४९ किलो वजनगटात त्याने बाजी मारली. अंतिम लढतीत या प्रतिभाशाली बॉक्‍सरने कझाकस्तानच्या तेमिरतस झुसूपोव्ह याचा ५-० फरकाने सहज पाडाव केला. कडाक्‍याच्या थंडीमुळे योग्य वजन राखण्यासाठी अमितला सोफियात काही दिवस उपाशी झोपावे लागले. त्याचे हे ४९ किलो वजनगटातील शेवटचे पदक ठरले. कारण, २०२० मधील टोकियो ऑलिंपिक स्पर्धा नजरेसमोर ठेवून सेनादलाचा हा बॉक्‍सर आता ५२ किलो वजनगटात खेळणार आहे. त्याच्या आवडीचा आणि त्याची हुकमत असलेला ४९ किलो वजनगट ऑलिंपिक रिंगणात नाही, त्यामुळे अमितला वजनगट बदलावा लागत आहे. त्याची नव्या गटात कसोटी लागणार आहे. ५२ किलो वजनगटात मुरलेल्या बॉक्‍सरशी त्याचा मुकाबला असेल. वाटचाल सोपी नाही, त्यामुळे अमितने तयारीवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. आगामी आशियायी अजिंक्‍यपद स्पर्धेत अमित ५२ किलो वजनगटात कौशल्य आजमावणार आहे. जास्त वजनाचा नवा गट सोपा नाही, ही बाब खुद्द अमितनेच मान्य केलेली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, वरच्या गटात खेळताना निश्‍चितच बाहूंत जास्त ताकद लागेल. डावपेच बदलावे लागतील. ठोसे अधिक बलवान करावे लागतील. अमितचा दृष्टिकोन आश्‍वासक असून आत्मविश्‍वास पराकोटीचा आहे. त्यामुळेच त्याने वरच्या वजनगटात खेळण्याचे निश्‍चित केले आहे. ऑलिंपिक पदक हे त्याचे ध्येय आहे. आशियायी अजिंक्‍यपद स्पर्धा १९ एप्रिलपासून बॅंकॉक येथे खेळली जाईल, त्यावेळी अमितची प्रगती दिसेल.

यशस्वी कामगिरी
अमितसाठी २०१७ व २०१८ वर्षे यशस्वी ठरली. २०१७ मध्ये त्याने दोन आंतरराष्ट्रीय पदके जिंकली. २०१८ मध्ये त्याची कामगिरी अधिकच उठावदार, उच्च दर्जाची ठरली. गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला. जाकार्ता-पालेमबंग येथे झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदकास गवसणी घातली. अंतिम लढतीत त्याने रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील उझबेकिस्तानचा सुवर्णपदक विजेता हसनबॉय दुस्मातोव याला हरवून सनसनाटी निकाल नोंदवला होता. गेल्या वर्षीच्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताला बॉक्‍सिंगमधील एकमेव सुवर्णपदक अमितच्या ताकदवान ठोशांमुळे मिळाले. सेनादलाच्या या बॉक्‍सरने यंदाही आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंगमधील यशस्वी वाटचाल कायम राखली आहे. काश्‍मीरमधील पुलवामा येथे ४० जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले, त्याच दिवशी भारतीय बॉक्‍सिंग संघ बल्गेरियास रवाना झाला होता. सोफियात जिंकलेले सुवर्णपदक अमितने हुतात्मा जवानांना अर्पण केले आहे. लष्करात नायब सुभेदार असलेल्या अमितला पुलवामातील हल्ल्याने खूपच वेदना झाल्या. आपण लष्कराच्या सेवेत असल्याने जास्त व्यथित झालो, असे त्याने सोफियात सुवर्णपदक जिंकल्यानंतर सांगितले.

डावखुरा बॉक्‍सर
अमित हा डावखुरा बॉक्‍सर आहे. मजबूत ठोशांच्या बळावर तो रिंगणात प्रतिस्पर्ध्यांना सावरण्याची अजिबात संधी देत नाही. बॉक्‍सिंगमध्ये यश मिळविण्यासाठी अमितने खूप मेहनत घेतली आहे. हरियानातील रोहतक जिल्ह्यातील मायना गावातील हा बॉक्‍सर प्रतिकूल परिस्थितीशी झगडलेला आहे. वडील शेतकरी, घरची परिस्थिती डळमळीतच. अमित आणि त्याचा थोरला भाऊ अजय दोघेही बॉक्‍सर, पण कुटुंबात कमवता कोणीही नव्हता. अजयला बॉक्‍सिंग सोडून सेनादलात रुजू व्हावे लागले, मात्र त्याने अमितचे बॉक्‍सिंग रोखले नाही. त्याच्या गुणवत्तेला खतपाणी घातले. लहानपणी अमितची शरीरयष्टी कृश होती. मात्र बॉक्‍सर बनण्याची हौस भारी होती. प्रशिक्षक अनिल धांकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमितची गुणवत्ता बहरली. अमितच्या बॉक्‍सिंगमधील यशात सेनादलाचा मोठा वाटा आहे. सेनादलाचे साह्य मिळाल्यापासून त्याची कामगिरी जास्तच बहरली. कधीकाळी उपाशीपोटी राहून बॉक्‍सिंग खेळलेला अमित आता भारतासाठी ऑलिंपिकमधील आशास्थान बनला आहे.

संबंधित बातम्या