इरफानची हॅट्रिक!
क्रीडांगण
चेन्नई येथे केरळच्या के. टी. इरफान याने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत विजेतेपद मिळविले. त्याने या स्पर्धेत यशाची हॅट्रिक केली. तिसऱ्या स्थानावरून जोरदार मुसंडी मारत इरफानने सुवर्णपदकास गवसणी घातली. त्याने १ तास २६ मिनिटे १८ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करून हरियाणाच्या देवेंद्र सिंग याला मागे टाकले. देवेंद्रने १ तास २६ मिनिटे १९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. यावरून इरफान आणि देवेंद्र यांच्यातील चुरस लक्षात येते. इरफानची ही कामगिरी खास आहे. गतवर्षी त्याला खूप मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यातून सावरत त्याने राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत पुरुष गटात दबदबा राखला. २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी बजावत इरफान प्रकाशझोतात आला होता. त्याने दहावे स्थान मिळवत भारतीयांतर्फे सर्वोत्तम कामगिरी नोंदविली होती. यंदा चालण्याच्या शर्यतीत वरचष्मा राखण्यासाठी इरफानने खूप मेहनत घेतली. स्पर्धेपूर्वी चार महिने तो सरावासाठी घरापासून दूर राहिला. मुलगा फक्त दोन वर्षांचा आहे, पण प्रशिक्षणामुळे पतियाळा व बंगळूर येथे राहावे लागल्यामुळे त्याला मुलाचे तोंडही पाहता आले नाही. हा त्याग सत्कारणी लागला. चालण्याचा शर्यतीत देशातील सर्वोत्तम ॲथलिट हा मान त्याने राखला.
‘राष्ट्रकुल’मधून हकालपट्टी
गतवर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या कालावधीत तो राहात असलेल्या खोलीत अधिकाऱ्यांना ‘सिरींज’ सापडल्या. उत्तेजक द्रव्य सेवनात सुया वापरल्या जातात. त्यामुळे इरफानभोवती संशयाचे जाळे तयार झाले. ‘सिरींज’ आपल्या खोलीत कशा आल्या, हे खुद्द इरफानलाच माहीत नव्हते. तो समर्पक उत्तरे देऊ शकला नाही. परिणामी त्याची आणि सहकारी ॲथलिट राकेश बाबू याचीही राष्ट्रकुल क्रीडानगरीतून हकालपट्टी झाली होती. वेदना आणि टीका झेलत त्याला गोल्ड कोस्ट सोडावे लागले. मायदेशात आल्यावर आरोपीच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले. आपण निर्दोष आहे हे इरफानला माहीत होते, परंतु तो आरोप फेटाळू शकला नाही. आता त्याने नव्या जिद्दीने पुनरागमन केले आहे. २०१४ मध्ये इरफानच्या कारकिर्दीस दुखापतीने धक्का दिला होता. त्यामुळे त्याला २०१६ मधील रिओ ऑलिंपिकला मुकावे लागले होते. दुखापतीवर मात करत दोन वर्षांपूर्वी जिगरबाज इराफनने वेगाने चालण्यास सुरुवात केली, पण गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत इरफानवर जबरदस्त आघात झाला. त्यातून सावरत आवश्यक तंदुरुस्ती राखण्यावर त्याने भर दिला. तो पुन्हा चालण्याच्या सरावात मग्न झाला. २०२० मधील टोकियो ऑलिंपिकवर त्याची नजर आहे. त्यापूर्वी त्याच्यासमोर जागतिक स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याचे लक्ष्य असेल.
राष्ट्रीय विक्रमाचा मान
केरळमधील मलाप्पुरम जिल्ह्यातील इरफान याने नऊ वर्षांपूर्वी लंडन ऑलिंपिकमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. १ तास २० मिनिटे २१ सेकंद ही कामगिरी कौतुकास्पद ठरली. लंडन ऑलिंपिकनंतर वर्षभरात इरफानने चीनमध्ये झालेल्या ‘आयएएएफ’च्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत १ तास २० मिनिट ५९ सेकंद वेळेसह पाचवा क्रमांक मिळविला होता. मात्र २०१४ मधील दुखापतीमुळे तो मागे पडला. त्याने हार मानली नाही. दोन वर्षांपूर्वी आशियायी चालण्याच्या शर्यतीत त्याने १ तास २० मिनिटे ५९ सेकंद वेळेसह ब्राँझपदक जिंकले होते. २०१७ मध्ये लंडन येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत त्याने १ तास २१ मिनिटे ४० सेकंद वेळ नोंदविली होती. चेन्नईतील राष्ट्रीय स्पर्धेत त्याने नोंदविलेली वेळ त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीच्या तुलनेत संथ आहे, पण गतवर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील दुःस्वप्नानंतर हा ॲथलिट सावरला आहे, हे महत्त्वाचे आहे. सरावात ३० ते ३६ किलोमीटर चालण्यावर इरफानचा भर असतो. कारकिर्दीवर अजाणतेने काळा डाग लागूनही मेहनत आणि जिद्द या बळावर त्याने खंबीरपणे वेगाने चालण्याचे कायम ठेवले आणि त्यात प्रभुत्त्वही राखले.