‘झिझोऊ’ची घरवापसी...!

किशोर पेटकर
सोमवार, 25 मार्च 2019

क्रीडांगण
 

फ्रान्सचे माजी जगज्जेते फुटबॉलपटू झिनेदिन झिदान यांनी आक्रमक शैलीचा मध्यरक्षक या नात्याने कारकीर्द संस्मरणीय ठरविली. फ्रान्सने १९९८ मध्ये विश्‍वकरंडक जिंकला, तेव्हा झिदान यांची कामगिरी लाखमोलाची ठरली होती. त्यावेळी खेळाडू या नात्याने त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली होती. या विश्‍वविजयी खेळाडूस २००१ मध्ये स्पेनचा मातब्बर क्‍लब रियल माद्रिदने करारबद्ध केले. त्यानंतर माद्रिदमधील ‘सांतियागो बेर्नाबेऊ’ हे या फ्रेंच फुटबॉलपटूचे दुसरे घर बनले. रियल माद्रिदच्या ‘बेर्नाबेऊ’वर झिदान यांना झिझोऊ या टोपणनावानेच जास्त प्रेम मिळाले. निवृत्तीनंतर प्रशिक्षक या नात्याने रियल माद्रिदलाच त्यांनी प्राधान्य दिले. प्रशिक्षकपदाची त्यांची ‘इनिंग’ही विलक्षण ठरली. गतवर्षी मे महिन्यात रियल माद्रिदने एकंदर तेराव्यांदा, तर झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तिसऱ्यांदा चॅंपियन्स लीग स्पर्धा जिंकली. संघाला युरोपातील चॅंपियन क्‍लब बनविल्यानंतर ‘झिझोऊ’ने लगेच पदाचा राजीनामा देत साऱ्यांनाच धक्का दिला होता. मात्र, आता दहा महिन्यांतच त्यांची ‘घरवापसी’ झाली आहे. स्पेनचे ज्युलेन लोपेतेगुई आणि नंतर अर्जेंटिनाचे सांतियागो सोलारी यांच्या खराब कामगिरीमुळे डच्चू देत रियल माद्रिदचे मालक फ्लोरेंटिनो पेरेझ यांनी झिदान यांना पुन्हा सन्मानाने प्रशिक्षकपदी पाचारण केले. क्‍लबबरोबरच्या जिव्हाळ्याच्या नात्यास प्राधान्य देत झिदान यांनी ३० जून २०२२ पर्यंत या पदी राहण्याच्या करारपत्रावर सही केली. गेल्या मोसमाच्या अखेरीस झिदान यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो यानेही रियल माद्रिदला सोडचिठ्ठी दिली. २०१८-१९ च्या मोसमात स्पेनच्या या प्रतिथयश संघाला लौकिक राखता आला नाही. चॅंपियन्स लीग स्पर्धेत त्यांना नेदरलॅंड्‌सच्या ॲजॅक्‍स ॲमस्टरडॅम संघाने गारद केले. शिवाय पारंपरिक प्रतिस्पर्धी बार्सिलोना संघानेही त्यांना ला-लिगा व कोपा डेल रे स्पर्धेत हरविले. या पार्श्‍वभूमीवर क्‍लबच्या अध्यक्षांना, तसेच चाहत्यांना पुन्हा ‘झिझोऊ’ची आठवण झाली.

प्रशिक्षकांची हकालपट्टी
झिदान यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रियल माद्रिदने लोपेतेगुई यांची नियुक्ती केली, पण ती चांगलीच वादग्रस्त ठरली. गेल्या वर्षी रशियात झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी लोपेतेगुई स्पेनचे प्रमुख प्रशिक्षक होते, पण अंधारात ठेवून रियल माद्रिदचे प्रशिक्षकपद स्वीकारल्याचे कारण देत स्पेन फुटबॉल महासंघाने विश्‍वकरंडक स्पर्धा ऐन तोंडावर असताना लोपेतेगुई यांची हकालपट्टी केली. रियल माद्रिदचे प्रशिक्षक या नात्याने लोपेतेगुई ‘बेर्नाबेऊ’वर स्थिरावले नाहीत. गतवर्षी ऑक्‍टोबरमध्ये त्यांच्या हाती क्‍लब व्यवस्थापनाने परतीचे तिकीट दिले. नंतर नोव्हेंबरमध्ये माजी खेळाडू सोलारी यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रियल माद्रिदने फिफा क्‍लब विश्‍वकरंडक जिंकला, पण चॅंपियन्स लीगमधील आव्हान खूप लवकर आटोपले, तसेच ला-लिगा स्पर्धेतही घसरण झाली. परिणामी सोलारी यांनाही डच्चू मिळाला. 

सफल प्रशिक्षक
खेळाडू या नात्याने २००१ साली झिदान यांना करारबद्ध करताना रियल माद्रिदने ७७.५ दशलक्ष युरो रक्कम मोजली होती. तेव्हाच्या या महागड्या खेळाडूने सातत्यपूर्ण कामगिरीने आपल्या किमतीस न्याय दिला होता. २००६ पर्यंत झिदान रियल माद्रिदचे आधारस्तंभ होते. निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षक या नात्याने नव्या कारकिर्दीचा प्रारंभ केला. सुरुवातीस ते रियल माद्रिदचा दुय्यम संघ असलेल्या ‘कास्तिला’चे प्रशिक्षक होते. जानेवारी २०१६ मध्ये खराब कामगिरीमुळे रियल माद्रिदने प्रशिक्षक राफा बेनिटेझ यांना डच्चू दिला. प्रशिक्षकपदाची सूत्रे झिदान यांच्याकडे आली. त्यानंतर अडीच वर्षांच्या कालावधीत रियल माद्रिदचे सफल प्रशिक्षक बनण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. दुभंगलेल्या संघाला त्यांनी प्रेरित केले. झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली रियल माद्रिदने जबरदस्त उसळी घेत १४९ पैकी १०४ सामने जिंकताना नऊ करंडकांवर नाव कोरले. सलग तीन मोसम युरोपमधील चॅंपियन क्‍लब हा किताब पटकाविला.

संबंधित बातम्या