‘स्पेशल’ जिगर!

किशोर पेटकर
सोमवार, 1 एप्रिल 2019

क्रीडांगण
 

संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथे झालेल्या स्पेशल ऑलिंपिक्‍स जागतिक उन्हाळी क्रीडा स्पर्धेत भारताच्या ‘स्पेशल’ क्रीडापटूंनी अफलातून जिगर प्रदर्शित केली. बौद्धिक, शारीरिक दुबळेपणा असलेल्या क्रीडापटूंच्या स्पर्धेत भारताचे २८७ ‘विशेष’ क्रीडापटू सहभागी झाले होते. त्यांनी तब्बल ३६८ पदकांची कमाई केली. यामध्ये ८५ सुवर्ण, १५४ रौप्य आणि १२९ ब्राँझपदकांचा समावेश होता. शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या क्रीडापटूंच्या तोडीची, त्यांनाही तोंडात बोटे घालायला लावणारी ही कामगिरी आहे. १४ ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत जगभरातील १९० देश सहभागी झाले होते. क्रीडापटूंमध्ये अमाप उत्साह होता. जागतिक क्रीडा व्यासपीठावर अवर्णनीय पराक्रम गाजविण्यास ‘स्पेशल’ क्रीडापटू आतुरले होते. स्पर्धेत एकूण २४ क्रीडा प्रकार होते. जगभरातील ७५०० क्रीडापटूंनी कौशल्य प्रदर्शित करून ‘वाह व्वा’ मिळविली. पदके जिंकणारे पराक्रमी ठरलेच, पण त्यांच्यासमवेत अन्य सहभागी स्पर्धकांची जिद्दही अवर्णनीय ठरली. हे स्पेशल क्रीडापटू ‘खास’ आहेत. त्यांना आवश्‍यक मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धेत जगभरातील तीन हजार प्रशिक्षकांची फौज तैनात होती. भारतीय ‘स्पेशल’ क्रीडापटूंना ७३ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. हे क्रीडापटू मानसिकदृष्ट्या दुर्बल, पण त्यांची जिद्द अचाट आणि थक्क करणारी. मानसिक अस्वस्थेतेवर मात करून त्यांनी देशाचा तिरंगा आंतरराष्ट्रीय मैदानावर डौलाने फडकविला. काही खेळाडू बौद्धिक पातळीवर कमजोर होते, काहींना बोलण्यात-शिकण्यात अडचण होती, काही जण शारीरिकदृष्ट्या झगडत होते, काहींना दृष्टिदोष होता, पण या सर्वांचे ध्येय उत्तुंग होते. त्यांनाही ‘स्टार’ व्हायचे होते. अबुधाबीतील स्पर्धेत हे स्वप्न साकार झाले. भारताच्या खाती साडेतीनशेहून जास्त पदके जमा झाली. ‘स्पेशल’ क्रीडापटूंसाठी मध्यस्थाची चोख भूमिका बजावणारी ‘स्पेशल ऑलिंपिक्‍स-भारत’ ही संस्थाही कौतुकास पात्र आहे. 

कौशल्य विकसनावर भर
 ‘निश्‍चयास भेटा’ हे अबुधाबीतील स्पर्धेचे ब्रीद होते. क्रीडा मैदानावर ध्येयनिश्‍चितीसाठी ‘स्पेशल’ क्रीडापटूंना संधी मिळाली. त्यांनी त्याचा पुरेपूर लाभ उठवला. त्यांची कामगिरी पाहता, हे खेळाडू बौद्धिक किंवा मानसिकदृष्ट्या दुबळे, कमजोर आहेत असं जराही वाटणार नाही. त्यांचा जोश, करारी बाणा, आत्मविश्‍वास सारे काही पराकोटीचे. मुले ‘विशेष’ असली, तरी त्यांचे कौशल्य योग्यरीत्या विकसित झाल्यास ही मुले गगनात भरारी घेऊ शकतात हे ‘स्पेशल ऑलिंपिक्‍स’मधील कामगिरीने पुन्हा एकदा दिसून आले. या जगात कोणीही कमजोर नाही. योग्य मार्गदर्शन, भरीव प्रोत्साहन आणि संधी या बळावर यशाला गवसणी घालणे शक्‍य आहे. भारतात ‘स्पेशल ऑलिंपिक्‍स’च्या माध्यमातून कौशल्य जागृतीची मशाल संपूर्ण देशात तेवत आहे. ताज्या माहितीनुसार, देशात १२,४३,२४६ इतके क्रीडापटू सक्रिय आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी १,१९,९०० प्रशिक्षक व ६,१६२ ट्रेनर तत्पर आहेत. सकारात्मक दृष्टिकोनातून सारी प्रक्रिया चालते. देशातील विविध धर्मादाय संस्थांचाही या वाटचालीत उत्स्फूर्त हातभार लागतो. ‘स्पेशल’ मुलांच्या शाळांतून क्रीडापटूंच्या उपजत गुणवत्तेला शास्त्रोक्त पैलू पाडले जाते, त्यातूनच देशाला जागतिक पातळीवरील पदक विजेते गवसले आहेत. भारतातील ‘स्पेशल ऑलिंपिक्‍स’ची चळवळ १९८८ साली सुरू झाल्याची नोंद सापडते. त्यानंतर त्यास मोठ्या प्रमाणात बळ मिळत गेले. संस्थेचे देशभरात शिस्तबद्ध कार्य चालते. जागतिक स्पेशल ऑलिंपिक्‍सचा विचार करता, भारत क्रीडा मैदानावरील ‘सशक्त’ ताकद बनली आहे. ‘स्पेशल ऑलिंपिक्‍स’मध्ये ‘युनिफाईड’ गट असतो. यामध्ये सुदृढ क्रीडापटूंच्या खांद्याला खांदा भिडवत ‘स्पेशल’ क्रीडापटू खेळतात, त्यावेळी ‘विशेष’ कौशल्याचे तेज आगळेच भासते.

प्रतिकूलतेवर मात
 ‘स्पेशल’ मुलांना समाजात वावरताना ठेच लागते. प्रत्येक ‘स्पेशल’ मुलाची ह्रदय पिळवणारी पार्श्‍वभूमी असते. घरात दुबळेपणा असलेल्या मुलाचा जन्म काही वेळा टोचतो, पण आज चित्र खूप बदलत आहे. जागृतीमुळे सामाजिक ममत्व जागरूक झाले आहे. पालकही आपल्या ‘स्पेशल’ मुलांना केवळ क्रीडांगणावरच नव्हे, तर अन्य क्षेत्रातही भरीव प्रोत्साहन देताना दिसतात. धर्मादाय संस्थांमुळे गरीब, अनाथ मुलांना ममता मिळते, त्यांच्या जगण्याला सुयोग्य दिशा गवसत आहे. पाठबळाच्या जोरावर, ‘काहीही अशक्‍य नाही,’ हा संदेश आज देशातील ‘स्पेशल’ मुले देताना दिसतात. अबुधाबीतील कामगिरीने त्यांचा दृढनिश्‍चय पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

संबंधित बातम्या