अविनाशची प्रगती

किशोर पेटकर
सोमवार, 1 एप्रिल 2019

क्रीडांगण
 

भारतीय ॲथलेटिक्‍समध्ये अविनाश साबळे हा ॲथलिट सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील माढवा गावचा हा २५ वर्षीय धावपटू सेनादलाचे प्रतिनिधित्व करतो. पतियाळा येथे झालेल्या फेडरेशन करंडक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत त्याने ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत ८ मिनिटे २९.९४ सेकंद वेळ नोंदवून आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. अविनाशने गतवर्षी भुवनेश्‍वर येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ८ मिनिटे २९.८० सेकंद वेळ देत तब्बल ३७ वर्षे अबाधित राहिलेला विक्रम मोडीत काढला होता. गोपाळ सैनी याने १९८१ मध्ये टोकियोत झालेल्या आशियायी ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८ मिनिटे ३०.८८ सेकंद वेळेसह राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता, त्यानंतर या कामगिरीच्या जवळपास एकाही भारतीय धावपटूस पोचता आले नव्हते. अखेरीस गतवर्षी अविनाशने पराक्रम केला. हा मेहनती धावपटू तेवढ्यावरच तृप्त राहिला नाही. यंदा आणखी सरस वेळ साधत आगामी आशियायी ॲथलेटिक्‍स व जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. 
 आता तो प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेईल. पायाच्या दुखापतीमुळे गतवर्षी तो आशियायी क्रीडा स्पर्धेसाठी आवश्‍यक पात्रता वेळ गाठू शकला नव्हता. एप्रिलमध्ये दोहा येथे आशियायी ॲथलेटिक्‍स स्पर्धेत अविनाश भाग घेईल, नंतर सप्टेंबरमध्ये दोहा येथेच जागतिक स्पर्धा होईल. आशियायी स्पर्धेत अविनाशने आणखी वेग वाढविला, तर त्याला पदकाची संधी राहील. सध्या आशियात त्याचे मानांकन पाचवे आहे. टोकियो ऑलिंपिकसाठीही त्याचे प्रयत्न राहतील.

लष्करी जवान
 अविनाश सुरुवातीस निष्णात धावपटू नव्हता. २०१२ मध्ये तो लष्करात रुजू झाला. क्रीडा कोट्यातून नव्हे, तर जवान या नात्याने त्याला सेनादलात नोकरी मिळाली. सुरुवातीच्या कालावधीत त्याची नियुक्ती सियाचेनच्या बर्फाळ प्रदेशात होती. नंतर काही काळ राजस्थानातही त्याने सेवा बजावली. त्यानंतर तो सिक्कीममध्ये तैनात झाला. त्या कालावधीत अविनाशने क्रॉसकंट्री स्पर्धांत भाग घेण्यास सुरुवात केली. लहानपणी त्याच्या गावी शाळा नव्हती, त्यामुळे सुमारे सहा किलोमीटर चालत किंवा धावत त्याला शाळा गाठावी लागत असे. अतिशय मेहनती अविनाश हा धावण्यात पटाईत होता. त्याच्या तंत्राने सेनादलाचे माजी राष्ट्रीय विजेते अमरीशकुमार सिंग यांना प्रभावित केले. जानेवारी २०१७ मध्ये हैदराबादमधील क्रॉसकंट्री स्पर्धेत अविनाशला अमरिश यांनी धावताना पाहिले होते. त्याचे तंत्र पाहून अडथळ्यांच्या स्टीपलचेसमध्ये भाग घेण्याचे अमरिश यांनी अविनाशला सुचविले. नव्या ट्रॅकवर आल्यानंतर या होतकरू धावपटूस सुंदर शेखर यांचेही मार्गदर्शन लाभले. त्याची उपजत नैसर्गिक गुणवत्ता बहरली. परदेशी प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव यांच्या मार्गदर्शनाखालीही त्याने सराव केला. प्रतिदिनी सुमारे सहा तास सराव करणाऱ्या अविनाशला ‘वर्कलोड’ झेपला नाही. त्याचा पाय दुखावला. स्नेसारेव यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी त्याने राष्ट्रीय विक्रम मोडला होता, पण दुखापत आणि आशियायी क्रीडा स्पर्धेची पात्रता हुकल्यानंतर तो पुन्हा अमरिश यांच्याकडे आला. आतापर्यंतचे सारे यश त्याने सेनादलाच्या पाठबळावर मिळविले आहे. 

स्टीपलचेसमध्ये कारकीर्द
 ‘क्रॉसकंट्री’चा निरोप घेत स्टीपलचेसवर लक्ष केंद्रित केलेल्या अविनाशने दोन वर्षांपूर्वी नव्या प्रकारात कारकीर्द करण्याचे निश्‍चित केले. अतिशय परिश्रमी असलेल्या या मराठी युवकाने नव्या क्षेत्रात सफलतेचा झेंडा रोवला. २०१७ मध्ये झालेल्या फेडरेशन करंडक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ९ मिनिटे ०६.४२ सेकंद वेळ नोंदवत त्याने पाचवा क्रमांक मिळविला. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. अडथळे पार करत जोरदार मुसंडी मारणे हे त्याचे ध्येय बनले. सप्टेंबर २०१७ मध्ये चेन्नईत झालेल्या राष्ट्रीय खुल्या ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ८ मिनिटे ३९.८१ सेकंद वेळेसह त्याने स्टीपलचेसमधील पहिले विजेतेपद प्राप्त केले. त्यानंतर प्रत्येक शर्यतीगणिक त्याची कामगिरी सुधारत गेली आणि गोपाळ सैनीचा जुना विक्रम धारातीर्थी पडला. 

संबंधित बातम्या