बंगळूर एफसीचे यश

किशोर पेटकर
सोमवार, 8 एप्रिल 2019

क्रीडांगण
 

बंगळूर एफसी हा भारतीय फुटबॉलमधील मातब्बर संघ. २०१३-१४ मध्ये आय-लीग स्पर्धा जिंकल्यानंतर या संघाने कोलकता आणि गोव्यातील संघांचे भारतीय फुटबॉलमधील वर्चस्व संपुष्टात आणले. यंदा इंडियन सुपर लीग(आयएसएल) फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचाही पराक्रम त्यांनी साधला. सहा वर्षांतील त्यांचा हा विजेतेपदाचा सहावा करंडक ठरला. गतवर्षी आयएसएल स्पर्धेच्या साखळी फेरीत अव्वल कामगिरी करूनही अंतिम लढतीत त्यांना यश थोडक्‍यात हुकले होते. चेन्नईयीन एफसीने बाजी मारल्यामुळे बंगळूरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा मुंबईत झालेल्या अंतिम लढतीत एफसी गोवा संघावर एका गोलने मात करत कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने आयएसएल स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न साकार केले. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा या संघाचा हुकमी खेळाडू. त्याच्या जोडीस अन्य परदेशी, तसेच भारतीय खेळाडूही होते. अंतिम लढतीत निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात एकही गोल झाला नाही. जादा वेळेच्या खेळातील चार मिनिटे बाकी असताना राहुल भेके याने केलेला गोल बंगळूरच्या संघासाठी निर्णायक ठरला. त्यामुळे एफसी गोवाच्या गोटात निराशा पसरली. सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने स्पर्धेत यंदा सर्वाधिक ४१ गोल केले होते, तसेच त्यांचा स्पॅनिश स्ट्रायकर फेरान कोरोमिनास याने सर्वांत जास्त १६ गोल नोंदविले. पण बंगळूरविरुद्ध फायनलमध्ये एफसी गोवा संघाला गोल करता आला नाही. बंगळूरने मात्र गतमोसमात हुकलेले विजेतेपद साकार केले. २०१५ नंतर पुन्हा एकदा एफसी गोवास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांना मोसमात सलग तिसऱ्यांदा बंगळूरकडून हार पत्करावी लागली.  

जबरदस्त आत्मविश्‍वास
बंगळूरने गतमोसमात आयएसएल स्पर्धेत पदार्पण केले होते. पहिल्याच मोसमात त्यांनी अंतिम फेरी गाठून कौतुकाची थाप मिळविली होती. २०१८-१९ मोसमात या संघाच्या प्रशिक्षकपदी अल्बर्ट रोका नव्हते, त्यांच्या जागी स्पेनचेच कार्ल्स कुआद्रात आले. त्यांनी अगोदरच्या प्रशिक्षकांप्रमाणेच नियोजनबद्ध संघ बांधणी केली. जबरदस्त आत्मविश्‍वास हे या संघाचे बलस्थान ठरले. बंगळूरचा संघ केवळ सुनील छेत्रीवरच पूर्णपणे अवलंबून राहिला नाही. उदांता सिंग यानेही छाप पाडली. बचावफळीत राहुल भेके, निशू कुमार, हरमनज्योत खाब्रा यांचा खेळ उल्लेखनीय ठरला. अपेक्षेप्रमाणे गोलरक्षणात गुरप्रीतसिंग संधू याने दक्ष कामगिरी बजावली. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रतिकूल परिस्थितीत या संघाने तोल ढळू दिला नाही. त्यांनी मोहिमेची सुरुवात दणक्‍यात केली. आठपैकी सात सामन्यांत त्यांनी विजय नोंदविला, तर एक सामना बरोबरीत राखला. नंतर सुमारे महिनाभराच्या हिवाळी विश्रांतीनंतर संघ पुन्हा मैदानात उतरला, तेव्हा कामगिरी घसरली. संघातील परदेशी खेळाडू मिकू आणि एरिक पार्तालू यांच्या दुखापतींमुळे बंगळूरला अपेक्षित खेळ करता आला नाही. आक्रमण थिटे ठरले, पण अगोदरच्या टप्प्यातील कामगिरीमुळे हा संघ प्ले-ऑफ फेरीत दाखल झाला.   
 गुवाहाटीतील पहिल्या टप्प्यातील उपांत्य लढतीत बंगळूरला नॉर्थईस्ट युनायटेडकडून १-२ फरकाने हार पत्करावी लागली. वाटले, की हा संघ गारद होणार, पण त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील लढतीत जोरदार पुनरागमन केले. नॉर्थईस्ट युनायटेडवर ३ गोल डागून दणक्‍यात अंतिम फेरी गाठली. 

संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा
 बंगळूर एफसीच्या गेल्या सहा वर्षांतील यशस्वी कामगिरीचा आढावा घेतल्यास, या संघाला व्यवस्थापनाकडून नेहमीच उत्स्फूर्त पाठिंबा लाभला. केवळ स्पर्धेच्या तोंडावर त्यांची संघ बांधणी होत नाही, तर ती प्रक्रिया मोसमपूर्व कालावधीतही सुरू असते. चांगले खेळाडू निवडण्यावर बंगळूर एफसीचा भर असतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, बंगळूर एफसीचे व्यवस्थापन प्रशिक्षकांना संघबांधणीसाठी पुरेसा वेळ देतात. कामगिरी अपेक्षित होत नसल्यास मध्येच प्रशिक्षकांना माघारी पाठवणे बंगळूर एफसीच्या परंपरेत नाही. कुआद्रात यांना बंगळूर एफसीच्या संघ व्यवस्थापनाने पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि त्याची योग्य बक्षिसी मोसमाअखेरीस मिळाली.
 

संबंधित बातम्या