किमयागार चेन्नई सिटी 

किशोर पेटकर
सोमवार, 8 एप्रिल 2019

क्रीडांगण
 

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या आय-लीग या सर्वोच्च फुटबॉल स्पर्धेचा २०१८-१९ हा शेवटचा मोसम असल्याचे निश्‍चित आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेस अतीव महत्त्व देताना २०१९-२० पासून आय-लीग स्पर्धा अस्तित्वात नसेल. आय-लीगमधील संघांना दुय्यम स्थान मिळणार असल्याने या स्पर्धेत खेळणारे क्‍लब एकवटले आहेत, अजून अंतिम निर्णय झालेला नाही. 
यंदाच्या आय-लीग स्पर्धेत चेन्नई सिटी एफसी संघ किमयागार ठरला. आय-लीगमधील तिसऱ्या मोसमात चेन्नईच्या या संघाने विजेतेपदावर नाव कोरले. त्यांना कोलकत्याच्या मातब्बर ईस्ट बंगालने शह देण्याचा प्रयत्न केला, पण एका गुणाच्या फरकाने चेन्नई सिटीने विजेतेपद निश्‍चित केले. त्यांचे ४३, तर ईस्ट बंगालचे ४२ गुण झाले. चेन्नई सिटीने कोईमतूरला आपले ‘होम ग्राउंड’ बनविले आणि ते त्यांच्यासाठी लकी ठरले. आय-लीग स्पर्धेतील २० पैकी १० सामने चेन्नई सिटी संघ कोईमतूरला खेळला. आठ सामन्यांत विजय, एक बरोबरी आणि एक पराभव अशी प्रभावी कामगिरी घरच्या मैदानावर बजावताना त्यांनी २५ गुणांची कमाई केली. मागील दोन मोसमात चेन्नई सिटीने आय-लीगमध्ये निराशा करताना आठव्या क्रमांकावर समाधान मानले होते. सिंगापूरचे प्रशिक्षक अकबर नवास यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यंदा लाजवाब खेळ केला. आकर्षक फुटबॉलला आक्रमकतेची जोड देताना सर्वाधिक ४८ गोल केले. आय-लीग विजेतेपदावर शिक्कामोर्तब करताना शेवटच्या साखळी लढतीत त्यांनी गतविजेत्या मिनर्व्हा पंजाब संघाचा ३-१ फरकाने पराभव केला. 

स्पॅनिश फुटबॉलपटूंचा बोलबाला 
चेन्नई सिटीच्या विजेतेपदात त्यांच्या स्पॅनिश खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. आघाडीपटू पेद्रो मांझी, तसेच मध्यफळीतील सॅंड्रो रॉड्रिग्ज व नेस्टर गॉर्डिलो यांनी अफलातून समन्वय साधला. या त्रिकुटाला रोखणे प्रतिस्पर्धी बचावफळीस शेवटपर्यंत कठीण गेले. मांझी याने १८ सामन्यांत २१ गोल करताना चार वेळा हॅटट्रिक नोंदविली. त्याच्याइतकेच चर्चिल ब्रदर्सचा त्रिनिदाद-टोबॅगोचा खेळाडू विलिस प्लाझा यानेही २१ गोल केले, पण मांझीच्या कामगिरीने त्याच्या संघाला विजेतेपदाचा जल्लोष करता आला. सॅंड्रो याने नऊ, तर नेस्टरने आठ गोल केले. स्पेनचे जॉर्डी व्हिला हे चेन्नई सिटीचे माजी सहाय्यक प्रशिक्षक. पेप गार्डिओला मुख्य प्रशिक्षक असताना व्हिला त्यावेळी बार्सिलोना क्‍लबच्या सपोर्ट स्टाफमध्ये होते. स्पेनमधील तळाच्या विभागात खेळणाऱ्या मांझी, सॅंड्रो, नेस्टर, तसेच रॉबर्टो एस्लाव्हा यांना व्हिला यांनी चेन्नईत आणले. आय-लीग मोसमापूर्वी व्हिला राजीनामा देऊन अमेरिकेतील मेजर लीग सॉकरमधील न्यूयॉर्क सिटी एफसीच्या प्रशिक्षक ताफ्यात गेले. व्हिला यांच्या अनुपस्थितीत अकबर नवास यांनी स्पॅनिश खेळाडूंच्या शैलीस अजिबात धक्का दिला नाही. विजेत्या चेन्नई सिटीच्या मोहिमेत स्पेनच्या चौघाही खेळाडूंनी मिळून एकत्रित ४० गोल केले. 

वर्चस्व राखले 
यंदाच्या आय-लीग स्पर्धेत चेन्नई सिटीने फक्त तीन सामने गमावले. त्यापैकी एक पराभव घरच्या मैदानावरील होता. मुख्य प्रशिक्षक अकबर यांनी सहाय्यक या नात्याने सिंगापूरचे आणखी एक प्रशिक्षक बाला विमारन यांना आणले. बाला यांचे पूर्वज दक्षिण भारतातील, थंजावूर येथील. क्‍लबच्या व्यवस्थापनाने प्रशिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. संघाचे अर्थकारण मर्यादित होते, पण आत्मविश्‍वास पराकोटीचा होता. सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर पूर्ण वर्चस्व राखून खेळणे हा प्रशिक्षक अकबर यांचा मंत्र होता, ज्याचा खेळाडूंनी नियमित जप केला. प्रतिस्पर्ध्यांना गुंगारा देत मुसंडी मारणे ही या संघाची खासियत ठरली, त्यांचे बचावपटूही बऱ्याच वेळा आक्रमकाच्या भूमिकेत दिसत. चेन्नई सिटीचा बचाव काही प्रमाणात कमजोर ठरला, त्यांनी २८ गोल स्वीकारले, मात्र ‘स्पॅनिश’ आक्रमकतेमुळे बचावातील ‘दुखणे’ जास्त बळावले नाही. परदेशी खेळाडूंवर भिस्त ठेवताना, चेन्नई सिटीने तमिळनाडूतील गुणवान फुटबॉलपटूंच्या कौशल्यासही व्यासपीठ मिळवून दिले.

संबंधित बातम्या