फेडरर नाबाद १०१!

किशोर पेटकर
सोमवार, 22 एप्रिल 2019

क्रीडांगण
 

खेळाडूच्या निवृत्तीचे वय काय? शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि सक्षम क्रीडापटूस हा प्रश्‍न विचारूच नये. तो स्वतः निवृत्तीचे वय ठरवतो. आता स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याचेच पाहा ना, वयाच्या ३७ व्या वर्षी या महान टेनिसपटूने १०१ वे अजिंक्‍यपद पटकाविले. सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेगणिक फेडररची महती वाढत चालली आहे. मायामी येथील १००० गुणांच्या टेनिस स्पर्धेत त्याने धोकादायक जॉन इस्नर याला नमवून बाजी मारली. त्याची कारकिर्दीतील १५४ वी ‘फायनल’ ठरली, तर मायामीतील स्पर्धेत फेडररने चौथ्यांदा करंडक उंचावला. जिमी कॉनर्स याने कारकिर्दीत १०९ करंडक पटकाविले आहेत, त्याला गाठण्यासाठी फेडररला आणखी आठ स्पर्धा करंडक हवे आहेत. १७ वर्षांपूर्वी, २००२ मध्ये फेडररने सर्वप्रथम अमेरिकेतील या शहरात अंतिम फेरी गाठली होती, तेव्हा आंद्रे आगासीने त्याला हरविले होते. त्यानंतर २००५ मध्ये राफेल नदालला आणि २००६ मध्ये इव्हान ल्युबिसिचला हरवून फेडररने मायामीत यशाचा झेंडा फडकाविला. ११ वर्षांनंतर, २०१७ मध्ये पुन्हा तो या ठिकाणी अंतिम लढत खेळला आणि राफेल नदाललाच हरवून सफलतेचा अध्याय लिहिला. यंदा पुन्हा तो मायामीत ‘बॉस’ ठरला. या स्पर्धेत नोव्हाक जोकोविच आणि आंद्रे आगासी यांनी प्रत्येकी सहा वेळा विजेतीपदे मिळविली आहेत. फेडररच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ‘‘अधिकाधिक करंडक पटकाविण्याचा प्रयत्न आहे. दुखापतीपासून दूर राहाता यावे यासाठी मेहनत घेत आहे.’’

जबरदस्त जिगर
 फेडरर हा जिगरबाज खेळाडू. त्याने पुरुष एकेरीतील कारकिर्दीत सर्वाधिक २० ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एटीपी मास्टर्स (१००० गुण) स्पर्धा त्याने २८ वेळा जिंकली. फेडररवर लिहिताना नेहमीच आकड्यांना अतीव महत्त्व प्राप्त होते. या वर्षीचा त्याचा फॉर्म जबरदस्त आहे. पहिल्या तीन महिन्यांत तो २० सामने खेळला, त्यापैकी १८ सामने जिंकले, तर फक्त दोन पराभव पत्करले. दोन स्पर्धांत तो अजिंक्‍य राहिला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत फेडररला ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपास याने हरविले, मात्र त्याचा बदला स्विस खेळाडूने दुबईतील स्पर्धेत घेतला. ग्रीक खेळाडूस हरवून त्याने कारकिर्दीतील शंभरावे विजेतेपद साकारले. मोसमातील दुसरा पराभव फेडररला इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वीकारावा लागला. ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीम याने फेडररची घोडदौड रोखली. स्वित्झर्लंडच्या या महान टेनिसपटूच्या कारकिर्दीवर नजर टाकता, जरी त्याला हिरवळीच्या कोर्टवरील बादशाह मानले जात असले, तरी त्याने सर्वाधिक यश हार्ड कोर्टवर मिळविले आहे. अशाप्रकारच्या मैदानावर त्याने ६९ करंडक पटकाविले आहेत, तर ग्रास कोर्टवर तो १८ वेळा अजिंक्‍य ठरलेला आहे. मातीचे मैदान त्याच्यासाठी नावडते ठरले आहे. पॅरिसमध्ये फ्रेंच ओपनमधील एकमेव यशासह तो क्‍ले कोर्टवर अकरा वेळा विजेता बनला आहे. देदीप्यमान कारकिर्दीत फेडररने सारे जग पालथे घातले आहे. एकूण १९ देशात त्याने यशाचा झेंडा फडकाविला आहे. 

प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचाय...
 मायामीतील विजेतेपदामुळे फेडरर एक एप्रिलला पाचव्या क्रमांकावरून चौथ्या स्थानी आला. पहिल्या पाचांतील स्थान त्याने क्वचितच गमावले आहे. २ फेब्रुवारी २००४ रोजी त्याने सर्वप्रथम जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. त्यानंतर गतवर्षी जूनमध्ये पुन्हा फेडररने प्रथम क्रमांकावर हक्क सांगितला. मायामीतील यशानंतर फेडररने मातीच्या मैदानावर चाचपणी करण्याचे ठरविले आहे. गेल्या दोन मोसमात तो क्‍ले कोर्टवर विशेष खेळलेला नाही. फ्रेंच ओपनपूर्वी त्याचा मातीच्या मैदानावर सराव करण्याचा भर असेल. मायामीतील कामगिरीनंतर फेडररने सांगितले, ‘‘मी सध्या फॉर्ममध्ये आहे. फिटनेसही चांगला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी खेळतो आहे. गेल्या काही वर्षांत अशी तंदुरुस्ती नव्हती. मला प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे.’’ फेडररच्या या आत्मविश्‍वासाने भारलेल्या मनोगतावरून हा ‘लिजंड’ नक्कीच कॉनर्सला मागे टाकू शकेल.

संबंधित बातम्या