सौरवची प्रशंसनीय प्रगती

किशोर पेटकर
सोमवार, 22 एप्रिल 2019

क्रीडांगण
 

जागतिक स्क्‍वॅशमध्ये पुरुष मानांकनात ‘टॉप टेन’मध्ये स्थान मिळविणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू हा पराक्रम सौरव घोषाल याने केला आहे. महिला गटात ज्योश्‍ना चिनाप्पा आणि दीपिका पल्लिकल यांनी ‘टॉप १०’मध्ये यापूर्वी जागा मिळवली होती, पण पुरुष गटात भारतीय स्क्‍वॅशपटूने प्रथमच मानाची कामगिरी पार पाडली आहे. फेब्रुवारी २०१८ पासूनची सौरवची प्रगती प्रशंसनीय आहे. तो ३२ वर्षांचा आहे, पण त्याच्या जबरदस्त खेळासमोर वयाने नमते घेतले आहे. गतवर्षी फेब्रुवारीत त्याने मुंबईत इंडिया ओपन स्पर्धा जिंकली, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये घरच्या मैदानावर कोलकत्यात पीएसए चॅलेंजर टूर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारली. त्यापूर्वी ऑक्‍टोबर २०१८ मध्ये सौरवने जागतिक मानांकनात ११ वे स्थान मिळवून आणखी एक उल्लेखनीय टप्पा गाठला होता. नव्या वर्षातही सौरवने दर्जेदार कामगिरी केली. शिकागो येथील जागतिक स्क्वॅश स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. त्यानंतर झुरिच येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या ग्रासहोपर कप स्पर्धेतही त्याने शेवटच्या आठ खेळाडूंत पात्रता मिळविली. सहाजिकच एक एप्रिलला जाहीर झालेल्या मानांकनात सौरव ‘टॉप टेन’ खेळाडूंत दिसला. २०१८-१९ या कालावधीत त्याच्या विजयांची टक्केवारी वरचढ ठरली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तो प्रमुख १२ स्पर्धांमध्ये खेळला. फक्त एकदाच पहिल्या फेरीत पराभूत होण्याची नामुष्की त्याच्यावर आलेली आहे.

नव्या प्रशिक्षकांची मदत
 ब्रिटनचे माल्कम विलस्ट्रॉप हे सौरवचे नियमित प्रशिक्षक. गेल्या वर्षी जूनमध्ये सौरवने आपल्या प्रशिक्षण ‘युनिट’मध्ये ऑस्ट्रेलियन डेव्हिड पाल्मर यांना सामावून घेतले. पाल्मर हे अनुभवी स्क्वॅशपटू आणि मार्गदर्शक. यापूर्वी त्यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानास साजेशी कामगिरी केलेली आहे. पाल्मर यांच्या मार्गदर्शनाखाली सौरवचा खेळ आणखीनच खुलला व परिपक्वही झाला. स्क्‍वॅशमध्ये खेळाडूसाठी तंदुरुस्ती अतिशय महत्त्वाची ठरते. त्यादृष्टीने मेहनत घेताना सौरवने ट्रेनर डॅमन ब्राऊन यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ‘फिटनेस’ची जोड दिली आहे. दुखापतीनंतर त्याने गतवर्षी अफलातून तंदुरुस्ती साधत खेळात सातत्य राखले. प्रशिक्षण आणि स्पर्धा यामुळे सौरव जास्त काळ ब्रिटनमध्ये असतो. २०१८ च्या सुरुवातीस त्याने मानांकन सुधारण्याचे लक्ष्य बाळगले होते, ते साध्य केले आहे. २०१३ मध्ये त्याने सर्वप्रथम जागतिक क्रमवारीत पहिल्या २० खेळाडूंत स्थान मिळविले होते. त्यावर्षी त्याने जागतिक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीही गाठली होती. २०१५ पर्यंत त्याची जगातील पहिल्या १५ खेळाडूंत गणना होती. गतवर्षी तो अकराव्या स्थानी आला आणि आता दहा खेळाडूंत जागा मिळविली आहे. त्याच्या कामगिरीचा उंचावता आलेख कायम राहिल्यास, कदाचित सौरव पहिल्या पाच जणांत येण्याचे स्वप्न साकारू शकतो. २००४ मध्ये १९ वर्षांखालील ब्रिटिश ज्युनिअर स्पर्धा जिंकलेल्या सौरवने पंधरा वर्षांत मोठी मजल मारली आहे. ‘टॉप टेन’मध्ये आल्यानंतर सौरव संतुष्ट नाही. व्यावसायिक पातळीवर भरीव यश मिळविण्यासाठी तो उत्सुक असून त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या स्पर्धांत खेळताना दिसतो. 

आशियाई पदक विजेता
 गेल्या वर्षी जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सौरवने पुरुष एकेरीत ब्राँझपदकाची कमाई केली. या स्पर्धेत पदक जिंकणे हे सौरवसाठी नावीन्यपूर्ण नाही. २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीचे ब्राँझपदक जिंकले होते. पुरुष स्क्‍वॅशमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय हा मान त्याला तेव्हा मिळाला होता. २०१० मध्ये ग्वांगझू येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुष एकेरी आणि सांघिक गटात ब्राँझपदकाची कमाई केली होती. नंतर २०१४ मध्ये इन्चॉन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याच्या खेळास सोनेरी झळाळी आली. सांघिक स्क्‍वॅशमध्ये भारतास सुवर्णपदक मिळवून देताना सौरवने मोलाचा वाटा उचलला होता. याशिवाय त्याने पुरुष एकेरीत अंतिम फेरीत धडक मारत रौप्यपदकही जिंकले होते. 

संबंधित बातम्या