मनप्रीतची कारकीर्द काळवंडली

किशोर पेटकर
सोमवार, 29 एप्रिल 2019

क्रीडांगण
 

ऑलिंपियन आणि देशातील सर्वोत्तम महिला गोळाफेकपटू मनप्रीत कौर हिची कारकीर्द काळवंडली आहे. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेने (नाडा) तिच्यावर चार वर्षांचे निलंबन लादले आहे. ‘नाडा’द्वारे तिची चार वेळा चाचणी झाली, प्रत्येकवेळी शरीरात प्रतिबंधक उत्तेजक द्रव्यांचा अंश सापडल्यामुळे मनप्रीतला बंदीस सामोरे जावे लागले आहे. कारवाईमुळे तिची कारकीर्द कोलमडून पडली आहे. २०१७ मध्ये ८४ दिवसांच्या कालावधीत तिची चार वेळा चाचणी झाली. चीनमधील जिन्हुआ येथे झालेल्या आशियाई ग्रांप्री स्पर्धेत तिच्या शरीरात मेटेनोलोन हे द्रव्य, तर पतियाळा येथील फेडरेशन कप स्पर्धेत, भुवनेश्‍वर येथील आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत आणि गुंटूर येथील राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत खेळताना ‘डायमिथाईलब्युटाईलअमाईन’ हे द्रव्य सापडले. प्रत्येक चाचणीत ती दोषी आढळल्यामुळे कठोर कारवाई करण्यात आली आहे. २० जुलै २०१७ या मागील तारखेने मनप्रीत निलंबित असेल, त्यामुळे टोकियो ऑलिंपिक तिच्यासाठी अशक्‍य ठरले आहे. कारवाई विरोधात दाद मागण्याची मुभा मनप्रीतला आहे, पण चार वेळा शरीरात प्रतिबंधक द्रव्य सापडल्यामुळे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मनप्रीतला मोठा संघर्ष करावा लागेल. लवादाने मनप्रीत निर्दोष असल्याचा निर्णय दिला, तरच तिची गोळाफेकीतील वाटचाल सुकर होईल. 

गोळाफेकीत प्रगती
 हरियानातील अंबाला येथील मनप्रीतचे वडील शेतकरी, पण पितृछत्र ती लहान असतानाच गमावले. आई आजारपणामुळे अंथरुणास खिळलेली. अशा परिस्थितीत मनप्रीतने गोळाफेकीत प्रभुत्व संपादन केले. भावांसोबत मैदानात जाताना मनप्रीतनेही खेळाडू बनण्याचा निश्‍चय केला. जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर ऑलिंपिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न साकार करताना विक्रमासही गवसणी घातली. गोळाफेकीतील कौशल्य विकसित करत तिने जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय मैदानावर यशाला गवसणी घातली, नंतर आंतरराष्ट्रीय मैदानावरही पताका डौलाने फडकाविली. जिन्हुआ येथील आशियाई ग्रांप्री स्पर्धेत मनप्रीतने २०१७ मध्ये १८.८६ मीटरचा विक्रम नोंदवीत सुवर्णपदक मिळविले. या कामगिरीमुळे जागतिक महिला गोळाफेकपटूंत तिला अव्वल क्रमांकही मिळाला होता. २०१६ मध्ये रिओ ऑलिंपिकमध्ये तिने देशाचे प्रतिनिधित्व केले. 

कारकीर्द प्रश्‍नांकित
 आपल्या पेयात कोणीतरी मुद्दामहून उत्तेजक द्रव्य मिसळले असा मनप्रीतचा दावा आहे. कदाचित तिची प्रगती सहन न झाल्यामुळे कुटिल डाव रचण्यात आला असावा, पण चार वेळा तिच्या शरीरात प्रतिबंधित द्रव्य सापडल्यामुळे संशयाची सुई मनप्रीतकडेच जास्त प्रमाणात वळली आहे. कामगिरी उंचावण्यासाठी, सुवर्णपदक प्राप्तीच्या ध्येयापोटी क्रीडापटू उत्तेजक द्रव्यांच्या आहारी जातात. अशी कितीतरी उदाहरणे आहेत आणि दोषीही सापडले आहेत. मनप्रीत जाणूनबुजून चुकीच्या वाटेने गेली नसेल, तर कदाचित तिला न्याय मिळेल, पण त्यासाठी निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल. एक वेळ नव्हे, तर चार वेळा! ‘नाडा’ची सहानुभूती तिने गमावली आहे. ‘नाडा’च्या पॅनेलने मनप्रीतला निर्दोष मानण्यास नकार दिला, कारण प्रत्येकवेळी घातपात झाल्याचे मनप्रीतचे म्हणणे त्यांना अजिबात पटले नाही. तिने उत्तेजक द्रव्य अनावधाने घेतल्याचे कारण मान्य करण्याजोगे नसल्याचेही ‘नाडा’ने स्पष्ट केले आहे. चार वर्षांच्या निलंबनामुळे मनप्रीतची सारी कामगिरी रद्दबातल झाली आहे. तिने जिंकलेली पदके आता काढून घेतली जातील. यामध्ये आशियाई पातळीवरील सुवर्णपदकांचाही समावेश आहे. लवादानेही तिच्या शिक्षेवर मोहोर उठविली, तर मनप्रीतला बंदीचा कालावधी संपवून पुन्हा मैदानात उतरणे खूपच कठीण असेल. बंदीच्या शिक्षेमुळे तिची कारकीर्द संपल्यातच जमा होईल.   
 

संबंधित बातम्या