फुटबॉलमधील नवा ‘सुपरस्टार’?

किशोर पेटकर
सोमवार, 29 एप्रिल 2019

क्रीडांगण
 

युरोपियन फुटबॉलमध्ये सध्या नवा फुटबॉलपटू चर्चेत आहे. पोर्तुगालचा ३४ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या कारकिर्दीच्या संध्याकाळात त्याच्याच देशाच्या युवा फुटबॉलपटूचा युरोपियन फुटबॉल मैदानावर उदय झालेला आहे. काही जण त्याला भावी सुपरस्टार मानतात, तर त्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे काहींचे मत आहे. पण तो लक्षवेधी आहे हे नक्की. जुआंव फेलिक्‍स सिक्वेरा हे या १९ वर्षीय फुटबॉलपटूचे नाव. त्याच्या शैलीवर युरोपातील मातब्बर क्‍लब फिदा झाले आहेत. यामध्ये रिअल माद्रिद, मॅंचेस्टर सिटी, युव्हेंट्‌स या बड्या क्‍लबांचा समावेश आहे. त्याच्यासाठी मोठी रक्कम मोजण्यास हे क्‍लब इच्छुक आहेत. जुआंव फेलिक्‍स महागडा ठरण्याचे संकेत आहेत. तो प्रकाशझोतात येण्याचे आणखी एक कारण म्हणजे, पोर्तुगालमधील बलाढ्य संघ ‘स्पोर्ट लिझ्बोंय ई बेंफिके’ ऊर्फ बेंफिका संघातर्फे खेळताना त्याने केलेली देखणी कामगिरी. युरोपा लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्यात ईनट्रॅच फ्रॅंकफर्ट संघाविरुद्ध हॅटट्रिक नोंदवत जुआंव फेलिक्‍स प्रसिद्धीच्या झोतात आला. हा सामना बेंफिकाने ४-२ फरकाने जिंकला. १९ वर्षे आणि १५२ दिवसांचा असताना युरोपा लीगमध्ये हॅटट्रिक नोंदविणारा जुआंव फेलिक्‍स युवा फुटबॉलपटू ठरला. यूईएफए कपचे २००९-१० मोसमात युरोपा लीग असे नामकरण झाले. त्यानंतर २०१४ मध्ये डायनॅमो झाग्रेबच्या मार्को पियासा याने हॅटट्रिक नोंदविली, तेव्हा तो १९ वर्षे २१९ दिवसांचा होता. यूईएफए कप स्पर्धेत ॲटलेटिको माद्रिदच्या सर्जिओ आग्युरो याने ऑक्‍टोबर २००७ मध्ये १९ वर्षे १२४ दिवसांचा असताना सामन्यात तीन गोल केले होते. केवळ हॅटट्रिकमुळे नव्हे, तर बेंफिका क्‍लबतर्फे २०१८-१९ मोसमात खेळताना राखलेल्या सातत्यामुळे मोठे क्‍लब त्याच्याकडे आकर्षित झाले आहेत. बेंफिकासाठी त्याने उपयुक्तता सिद्ध केली आहे. 

लहान वयात मोठी मजल
 जुआंव फेलिक्‍स याचा जन्म १० नोव्हेंबर १९९९ रोजी झाला. पोर्तुगालची राजधानी लिस्बनपासून २९० किलोमीटरवर असलेले व्हिझेव हे त्याचे जन्मगाव. आठ वर्षांचा असताना पोर्तो क्‍लबच्या अकादमीत त्याच्या कारकिर्दीस दिशा गवसली. पोर्तो क्‍लबकडून तो सात मोसम खेळला. चार वर्षांपूर्वी त्याने लिस्बनची वाट धरली, तेथील बेंफिका क्‍लबमध्ये दाखल झाला. वयाच्या १६व्या वर्षी जुआंव फेलिक्‍सने बेंफिका ब संघाचे प्रतिनिधित्व केले. पोर्तुगालमधील द्वितीय विभागीय स्पर्धेत पदार्पण करणारा आणि गोल नोंदविणारा सर्वांत कमी वयाचा फुटबॉलपटू हे विक्रम त्याच्या नावे नोंदीत झाले. गतवर्षी बेंफिकाच्या मुख्य संघात त्याला बढती मिळाली. पोर्तुगीज अव्वल साखळी (प्रीमिएरा लिगा) स्पर्धेत जुआंव फेलिक्‍सने गतवर्षी बोव्हिस्ताविरुद्ध पदार्पण केले. पोर्तुगालच्या सीनियर राष्ट्रीय संघाच्या उंबरठ्यावर तो आहे. देशाचे ज्युनिअर वयोगटात प्रतिनिधित्व करतानाही जुआंव फेलिक्‍सने छाप पाडली आहे. कदाचित २०२२ मधील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकेल.

चेंडूवर हुकमत
 जुआंव फेलिक्‍सच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे, चेंडूवरील त्याची अफलातून हुकमत. त्याच्यावर कितीही कडक पहारा असला, तरी तो चेंडू ताब्यात राखत प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात लीलया धडक मारतो. बचावपटूंना चकवा देत चेंडूसह वळणदार मुसंडी मारण्याची त्याची शैली प्रेक्षणीय ठरते. सध्या तो फक्त १९ वर्षांचा आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे, त्यामुळेच स्पेन, इंग्लंड, इटलीतील बडे क्‍लब या प्रतिभाशाली आघाडीपटूत गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. बेंफिका क्‍लबकडून खेळताना त्याची ७९ क्रमांकाची जर्सी पोर्तुगालमध्ये लोकप्रिय झाली आहे. हा आक्रमक मध्यरक्षक स्ट्रायकर किंवा विंगर या जागीही सराईतपणे खेळतो. युरोपा लीग स्पर्धेमुळे जुआंव फेलिक्‍सचा जलवा युरोपातील, तसेच जगभरात फुटबॉलप्रेमींना अनुभवायला मिळाला. सध्यातरी तो बेंफिकाच्या ‘एस्तादिओ दा लूझ’वर गर्दी खेचत आहे.  
 

संबंधित बातम्या