जिगरबाज चित्रा

किशोर पेटकर
सोमवार, 6 मे 2019

क्रीडांगण
 

खंबीर आत्मविश्‍वास, चिकाटी, जिद्द, जिगर आणि इच्छाशक्ती यांचा सुरेख संगम साधत केरळच्या पी. यु. चित्रा हिने ॲथलेटिक ट्रॅकवर सफल धाव घेतली आहे. कतारमधील दोहा येथे झालेल्या आशियायी ॲथलेटिक्‍स स्पर्धेत तिने महिलांच्या १५०० शर्यतीत सुवर्णपदक राखले. दोन वर्षांपूर्वी ओडिशातील भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियायी स्पर्धेत चित्राने अविस्मरणीय धाव घेत जपानी, तसेच चिनी धावपटूंना मागे टाकले होते. यंदा बहारीनच्या दोघा धावपटूंना मागे टाकत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. भुवनेश्‍वर येथे तिने ४ मिनिटे १७.९२ सेकंद वेळ नोंदविली होती, दोहा येथे तिने प्रगती साधताना १५०० मीटर अंतर ४ मिनिटे १४.५६ सेकंद वेळेत पार केले. पालाक्कीझिल उन्नीकृष्णन चित्रा हे पलक्कडच्या या २३ वर्षीय धावपटूचे पूर्ण नाव. वडील पी. टी. उन्नीकृष्णन आणि आई वसंताकुमारी दोघेही मजूर. एकूण चार मुले, त्यापैकी चित्रा एक. या मुलीने गरिबीवर मात करत आशियायी विजेतेपदास गवसणी घातली. तिची कारकीर्द जिगरबाज आहे. दोन वर्षांपूर्वी जागतिक स्पर्धेसाठी निवड करताना तिच्यावर अन्याय झाला, पण चित्रा डगमगली नाही. वेगाने धावणे तिने कायम ठेवले. भुवनेश्‍वरला तिने पहिल्यांदा आशियायी सुवर्णपदक जिंकले. त्यावेळेस चित्रापाशी दर्जेदार ‘स्पाईक्‍स’ नव्हते, जे होते ते अतिशय जीर्ण होते. मैत्रीण के. के. विद्या हिच्याकडून उसनवारीवर ‘स्पाईक्‍स’ची जोडी घेऊन तिने १५०० मीटर शर्यतीतील वेगवान आशियायी महिला हा मान मिळविला.

अनवाणी धावत यश
 पलक्कड जिल्ह्यातील मुंडूर स्कूलमध्ये शिकत असताना चित्राने धावण्यास सुरुवात केली. शिडशिडीत, काटक, तसेच आवश्‍यक आहार नसल्यामुळे अशक्त असूनही चित्रा शालेय पातळीवर वेगाने धावत असे. शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक एन. एस. सिजीन यांनी चित्राची उपजत गुणवत्ता हेरली. तेव्हा ती दहा वर्षांची होती. तेव्हापासून सिजीन हेच चित्राचे मार्गदर्शक आहेत. सुरुवातीस अनवाणी धावत तिने ३००० मीटर शर्यतीत सुवर्णपदकास गवसणी घातली. चित्रा दुबळी होती, स्पाईक्‍स पेलण्याइतपत क्षमता तिच्या पायात नव्हती, त्यामुळे तिला अनवाणी धावावे लागले, असा खुलासा सिजीन यांनी नंतर केला होता. चित्रा मात्र दृढनिश्‍चयी होती. पायातून रक्त येत असूनही तिने शालेय स्पर्धा गाजविली. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. शाळेत सरावानंतर आवश्‍यक आहार खेळाडूंना दिला जात असे. त्यामुळे तिची शरीरयष्टी सुधारली आणि अधिक वेग घेणे शक्‍य होऊ लागले. २००९ पासून राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदकांची लयलूट केली. आशियायी शालेय ॲथलेटिक्‍स स्पर्धेतही तिने ३००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. चित्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर आता १५०० मीटर शर्यतीवर लक्ष केंद्रित केले आहे.

अन्यायाचा सामना
चित्राने २०१७ मध्ये आशियायी सुवर्णपदक जिंकले, त्यामुळे लंडनमधील जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेसाठी तिची भारतीय संघातील निवड पक्की मानली जात होती, पण तिला संघात स्थान मिळालेच नाही. जागतिक स्पर्धेसाठी तिने आवश्‍यक पात्रता वेळ दिली नसल्याचे कारण देत भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाने तिला डावलले. निवड न होणे हा अन्यायच होता. चित्राच्या वतीने तिचे मार्गदर्शक सिजीन यांनी केरळ उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने चित्राची बाजू उचलून धरली, परंतु जागतिक स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची तारीख तोपर्यंत उलटली होती. परिणामी चित्रा जागतिक स्पर्धेत धावू शकली नाही. आता पुन्हा एकदा आशियायी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे, दोहा येथेच होणाऱ्या जागतिक स्पर्धेत १५०० मीटरमध्ये धावण्याची संधी चित्राला आहे. गेल्या वर्षी जाकार्ता येथे झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत चित्राला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती काही काळ सरावापासून दूर राहिली. आशियायी ॲथलेटिक्‍स स्पर्धेत सोनेरी धाव घेत केरळच्या या प्रतिभाशाली मुलीने झोकात पुनरागमन केले आहे. 

संबंधित बातम्या