जेरेमीने उंचावला आलेख!

किशोर पेटकर
सोमवार, 6 मे 2019

क्रीडांगण
 

जेरेमी लालरिननुंगा हा भारताचा सोळा वर्षीय प्रतिभाशाली वेटलिफ्टर. गतवर्षी ऑक्‍टोबरमध्ये अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथे झालेल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. कनिष्ठ गटातील या गुणवान वेटलिफ्टरने आता मोठ्या गटातही छाप पाडण्यास सुरुवात केली असून त्याचा उंचावलेला आलेख लक्षवेधक आहे. मिझोराममधील ऐजॉल येथील या नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेल्या वेटलिफ्टरने वजन गट बदलूनही स्पृहणीय कामगिरी कायम राखली आहे. युवा ऑलिंपिक स्पर्धेत जेरेमी ६२ किलो गटात सहभागी झाला होता, तेव्हा त्याने स्नॅच आणि क्‍लीन अँड जर्क या दोन प्रकारात मिळून एकूण २७४ किलो वजन उचलले होते. जेरेमी आता ६७ किलो वजन गटात भाग घेत आहे. प्रतिस्पर्धी तगडे असूनही जेरेमीचा आत्मविश्‍वास तसूभरही कमी झालेला नाही. चीनमधील निंग्बो येथे झालेल्या आशियायी अजिंक्‍यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत जेरेमीने प्रगतीची झलक सादर केली. या स्पर्धेत तो ६७ किलो वजन गटातील ‘ब’ गटात सहभागी होता. एकूण २९७ किलो वजन उचलून त्याने नव्या वजन गटातही नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. या स्पर्धेत जेरेमीने युवा जागतिक, तसेच आशियायी विक्रमासही मागे टाकले. स्नॅच प्रकारात १३४ किलो, तर क्‍लीन अँड जर्क प्रकारात १६३ किलो वजन उचलून जेरेमीने प्रशिक्षक विजय शर्मा यांचा विश्‍वास सार्थ ठरविला. २०२० मध्ये टोकियोत ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे, मात्र विजय शर्मा यांना जेरेमीकडून २०२४ मधील ऑलिंपिक स्पर्धेत पदकाची अपेक्षा आहे. अनुभवागणिक तो अधिकच प्रगल्भ होईल आणि आणखी पाच वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये जेरेमी नक्कीच पदक जिंकू शकतो, असा विश्‍वास प्रशिक्षकांना वाटत आहे. 

योग्य दिशेने वाटचाल
 ब्युनॉस आयर्समधील युवा ऑलिंपिकनंतर जेरेमीच्या कारकिर्दीची वाटचाल योग्य दिशेनेच राहिली. आव्हान पेलताना त्याने ६२ ऐवजी ६७ किलो वजन गटास प्राधान्य दिले. गेल्या फेब्रुवारीत तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच ६७ किलो वजन गटात सहभागी झाला. थायलंड येथील स्पर्धेत जेरेमीने २८८ किलो वजन पेलून रौप्यपदकाची कमाई केली व नवा राष्ट्रीय विक्रमही रचला. आता चीनमधील स्पर्धेत २९७ किलो वजनापर्यंत त्याने मजल मारली. प्रत्येक स्पर्धेगणिक त्याची वजन उचलण्याची क्षमता वाढत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत जेरेमीने आंतरराष्ट्रीय पातळीवर नऊ किलो वजन जास्त उचलून चुणूक दाखविली. प्रशिक्षक विजय शर्मा यांच्यानुसार, येत्या काही महिन्यात जेरेमी ३०० किलो वजन उचलण्याचे धाडस करू शकतो. येत्या जुलैमध्ये जेरेमी राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेणार आहे, त्यावेळी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करण्याची संधी त्याला राहील.

ऐजॉल ते पतियाळा, व्हाया पुणे
 जेरेमी याचे वडील ऐजॉलमधील बॉक्‍सर. पाच भावंडांत जेरेमी तिसरा. वडिलांबरोबर तोही बॉक्‍सिंग सरावासाठी जात असे, पण त्याचे पाय वळले वेटलिफ्टिंग हॉलकडे. तेथे वयाच्या दहाव्या वर्षीच जेरेमी तुलनेत जास्त वजन उचलण्यावर भर देऊ लागला. 
कोवळ्या वेटलिफ्टरची गुणवत्ता लष्कराच्या ‘आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट’च्या पारखी प्रशिक्षकांनी हेरली. २०१२ मध्ये तो पुण्यातील ‘आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट’च्या प्रशिक्षण शिबिरात दाखल झाला. तेथे त्याला झार्झोकिमा यांचे प्रगल्भ मार्गदर्शन लाभले. अफाट गुणवत्ता, प्रबळ आत्मविश्‍वास, हुशारी आणि नवी गोष्ट आत्मसात करण्याची खुबी या बळावर पुण्यात जेरेमीचे कौशल्य विकसित झाले. राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेणाऱ्या जेरेमीने राष्ट्रीय प्रशिक्षकांना प्रभावित केले. २०१६ मध्ये तो पतियाळा येथील राष्ट्रीय शिबिरात रुजू झाला. तेव्हापासून तो प्रमुख राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. प्रत्येक स्पर्धेत शंभर टक्के क्षमतेने वजन उचलण्याचे ध्येय आणि मागील कामगिरीत सुधारणा राखण्याचे लक्ष्य या बळावर जेरेमीने अपेक्षा उंचावल्या आहेत. 

संबंधित बातम्या