पूजाचा ‘गोल्डन’ ठोसा!

किशोर पेटकर
सोमवार, 13 मे 2019

क्रीडांगण
 

वडील रागवतील या भीतीने पूजा राणी हिने आपली बॉक्‍सिंग कारकीर्द सुरुवातीस लपविली. मुलीने बॉक्‍सिंग केल्यास तिच्या स्वभावात बदल होईल, ती जास्त तापट होईल, तसेच दुखापतीही होतील असे पूजाच्या वडिलांना वाटत होते. उपजत गुणवत्ता ठासून भरलेल्या पूजाने प्रशिक्षकांच्या मदतीने कारकिर्दीस योग्य दिशा दाखविली. अडथळ्यांवर मात करत आशियायी बॉक्‍सिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत महिलांच्या ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. आज पूजाने जिंकलेली सारी पदके तिच्या वडिलांसाठी अभिमानास्पद ठरली आहेत. बॅंकॉकमध्ये आशियायी स्पर्धेत जागतिक विजेत्या चिनी महिला बॉक्‍सरला ‘गोल्डन’ ठोसा लगावून विजेतेपद मिळविणाऱ्या पूजाची वाटचाल अडथळ्यांची ठरली. तिचे हे आशियायी बॉक्‍सिंग स्पर्धेतील तिसरे पदक आहे, मात्र सोनेरी झळाळी मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली. हरियानातील भिवानी येथील नीम्रीवाली गावच्या या मुलीने मोठी झेप घेतली आहे. सध्या ती २८ वर्षांची आहे. वयागणिक तिचा अनुभव आणि परिपक्वता जास्तच परिणामकारक ठरत आहे. बॅंकॉकला अंतिम लढतीत पूजाने चीनच्या वॅंग लीना हिला हरविले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवी दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत या चिनी खेळाडूने सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हा पूजा स्पर्धेसाठी पात्र ठरू शकली नव्हती. ती सल भारतीय बॉक्‍सरला सतावत होती. यावेळेस पूजाने भरपूर मेहनत घेतली. ८१ किलो वजनी गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळवत तिने आशियायी बॉक्‍सिंग रिंगणात उतरण्यापूर्वी आवश्‍यक आत्मविश्‍वास प्राप्त केला. 

प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा
 पूजाच्या यशस्वी वाटचालीत तिच्या प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भिवानीतील हवासिंग अकादमीत सराव करताना, तेथील प्रशिक्षक संजयसिंग यांना पूजाच्या गुणवत्तेने आकर्षित केले. ही मुलगी ‘चॅंपियन’ ठरू शकते हा विश्‍वास त्यांना होता. पोलिस अधिकारी असलेल्या पूजाच्या वडिलांचे मन वळविण्याचे कामही संजयसिंग यांनीच केले. पूजाच्या वडिलांची मनधरणी करण्यासाठी सुमारे सहा महिने लागले. त्या कालावधीत पूजाने बॉक्‍सिंगसाठी प्रशिक्षकांच्या घरीच राहणे पसंत केले, कारण बॉक्‍सिंग करताना लागलेल्या ठोशांमुळे चेहऱ्यावर उमटलेले व्रण तिच्या वडिलांनी हेरले असते, तर कदाचित बॉक्‍सिंग कायमचे बंद झाले असते. अखेरीस वडिलांसमोर मुलीची जिद्द जिंकली, तेव्हापासून पूजाचे बॉक्‍सिंग अधिकच उठावदार ठरले. साधारणतः २००९च्या सुमारास महाविद्यालयात असताना पूजाची शरीरयष्टी बॉक्‍सिंगसाठी लायक असल्याचे मत तिच्या एका शिक्षकाच्या पत्नीने व्यक्त केले. तिनेच पूजाला हातात बॉक्‍सिंग ग्लोव्हज चढविण्यास प्रोत्साहित केले. पूजा आंतरमहाविद्यालयीन बॉक्‍सिंग स्पर्धा गाजवू लागली. तेथूनच तिच्या कारकिर्दीने वेग घेतला. 

वजनी गट बदलला
 पूजाची कारकीर्द तशी सोपी नाही. तिला मोठ्या दुखापतींचाही सामना करावा लागला. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्पर्धा तोंडावर असताना दिवाळीच्या कालावधीत फटाके उडविताना तिचा हात भाजला. हात पूर्ववत होण्यासाठी सुमारे चार महिने लागले. दोन वर्षांपूर्वी तिचा खांदा जायबंदी झाला. त्यामुळे पुनरागमन लांबले. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला, तर पूजाला तो योग्य वाटला नाही. तिने दुखावलेल्या खांद्यासाठी फिजिओथेरपी उपचार करण्यास प्राधान्य दिले. तिच्यासाठी हा निर्णय ‘मास्टर स्ट्रोक’ ठरला. उपचाराच्या कालावधीत तिचे वजन ७७ किलोपर्यंत वाढले, त्यामुळे आशियायी बॉक्‍सिंग स्पर्धेत ८१ किलो वजनी गटात खेळण्याचे ठरविले. गट बदलल्याचा परिणाम झाला नाही, उलट तिला सुवर्णपदक मिळाले. पूजा मूळची ७५ किलो वजनी गटातील आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील सहापैकी पाच विजेतीपदे तिने याच गटात मिळविली आहेत. शिवाय आशियायी क्रीडा स्पर्धेतील ब्राँझ, तसेच आशियायी बॉक्‍सिंगमधील यापूर्वीची पदके तिने ७५ किलो वजनी गटातच जिंकली होती. पूजाने आता टोकियो ऑलिंपिकचे लक्ष्य बाळगले आहे. मात्र, त्यासाठी तिला वजनी गट बदलावा लागेल. ऑलिंपिकमध्ये ८१ किलोचा गट नाही, त्यामुळे पूजा पुन्हा आपल्या नेहमीच्या ७५ किलो वजनी गटातील रिंगणात उतरणार आहे.

संबंधित बातम्या