‘स्पर्स’ची कौतुकास्पद भरारी!

किशोर पेटकर
सोमवार, 20 मे 2019

क्रीडांगण
 

टॉटेनहॅम हॉट्‌सपर हा उत्तर लंडनमधील फुटबॉल संघ. चाहते या संघाला प्रेमाने ‘स्पर्स’ असे संबोधतात. गतमोसमातील इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये तिसऱ्या स्थानी राहिलेल्या या संघाने यंदा जबरदस्त भरारी घेतली. युरोपियन चॅंपियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना त्यांनी अफलातून निकाल नोंदविला. स्पेनची राजधानी माद्रिदमधील ‘वांडा मेट्रोपोलिटाना’वर येत्या एक जून रोजी चॅंपियन्स लीग विजेतेपदासाठी दोन इंग्लिश संघात धुमश्‍चक्री अपेक्षित आहे. पाच वेळच्या विजेत्या लिव्हरपूल संघाने स्पेनच्या बार्सिलोना संघाचा पाडाव करून नवव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. अर्जेंटिनाचे मॉरिसियो पोचेटिनो यांच्या मार्गदर्शनाखालील टॉटेनहॅमने उपांत्य लढतीत आश्‍चर्यकारक बाजी मारली. त्यांची गाठ नेदरलॅंड्‌सच्या एॲक्‍स संघाशी होती. टॉटेनहॅमला घरच्या मैदानावर ०-१ फरकाने हार पत्करावी लागली. नंतर ॲमस्टरडॅममधील ‘अवे’ सामन्यात लंडनमधील संघ ३५ मिनिटांच्या खेळात ०-२ असा पिछाडीवर होता. मात्र, सामन्याचा उत्तरार्ध अविस्मरणीय ठरला. टॉटेनहॅमने अनपेक्षित विजय खेचून आणला. यात ब्राझीलियन मध्यरक्षक लुकास मौरा याचा वाटा अलौकिक ठरला. या २७ वर्षीय खेळाडूने हॅटट्रिक नोंदवत ‘स्पर्स’ला अंतिम फेरीत नेले. मौरा याने तिसरा गोल सामन्यातील भरपाई वेळेतील सहाव्या मिनिटास केला. मौरा याने ‘इंज्युरी टाइम’मध्ये केलेल्या गोलमुळे टॉटेनहॅमच्या खाती ‘अवे’ गोल वाढला आणि त्यांची आगेकूच कायम राहिली. ॲमस्टरडॅममधील सामना २-२ असा गोलबरोबरीत राहिला असता, तर एॲक्‍स संघाने लिव्हरपूल संघाविरुद्ध गाठ नक्की केली असती, पण टॉटेनहॅमच्या अचाट खेळामुळे चार वेळच्या विजेत्या संघाच्या पदरी निराशाच आली.

पराभवाने सुरवात...
टॉटेनहॅम हॉट्‌सपरची यंदाच्या चॅंपियन्स लीगमधील मोहीम जिगरबाज आहे. पराभवातून झेपावत त्यांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. त्यासाठी संघाची जिद्द आणि खेळाडूंत आत्मविश्‍वास जागविणारे प्रशिक्षक पोचेटिनो यांचे खास कौतुक करायलाच हवे. मार्गदर्शक पोचेटिनो २०१४ पासून टॉटेनहॅमचे प्रशिक्षक आहेत. 
चॅंपियन्स लीगमधील मोहिमेत टॉटेनहॅमला पहिले दोन्ही सामने गमवावे लागले. इंटर मिलान व बार्सिलोना क्‍लबकडून हार पत्करल्याने ‘स्पर्स’ गटसाखळीतच गारद होण्याचे संकेत होते, मात्र त्यांनी इंटर मिलानला मागे टाकत गटात उपविजेतेपद मिळवून पुढील फेरी गाठली. बोरुसिया डॉर्टमंडविरुद्ध सहजपणे जिंकल्यानंतर इंग्लंडच्या मॅंचेस्टर सिटीला ‘अवे’ गोलच्या बळावर नमवत उपांत्य फेरी निश्‍चित केली. दक्षिण कोरियाचा सॉन ह्यूंग-मिन, फर्नांडो लॉरेन्ट यांची कामगिरीही उठावदार ठरली. मॅंचेस्टर सिटीविरुद्ध लॉरेन्टचा गोल निर्णायक ठरला होता. एॲक्‍स संघाविरुद्ध संघाचा प्रमुख स्ट्रायकर हॅरी केन पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही, पण त्याची ड्रेसिंग रूममधील केवळ उपस्थिती संघाला प्रेरित करणारी ठरली. 

अद्वितीय मुसंडी
दोन गोलांच्या पिछाडीवरून विजयाला गवसणी घालणे सोपे नव्हे. मात्र, ही किमया टॉटेनहॅम संघाने साधली. चॅंपियन्स लीग स्पर्धेच्या इतिहासात दोन गोलांनी मागे पडल्यानंतर विजय मिळविणारा टॉटेनहॅम हा अवघा दुसराच संघ ठरला. यापूर्वी १९९९ मध्ये उपांत्य लढतीत मॅंचेस्टर युनायटेड संघ दोन गोलांनी मागे होता, मात्र नंतर त्यांनी युव्हेंटसला नमवून अंतिम फेरीत जागा मिळविली. युरोपियन फुटबॉलमध्ये क्‍लब पातळीवर तिसऱ्यांदा दोन इंग्लिश संघ विजेतेपदासाठी मैदानावर आव्हान देणार आहेत. १९७२ मध्ये यूईएफए कपमध्ये टॉटेनहॅम व वॉल्व्हरहॅम्प्टन यांच्यात, तर २००८ मध्ये चॅंपियन्स लीगमध्ये मॅंचेस्टर युनायटेड व चेल्सी यांच्यात अंतिम लढत झाली होती.

संबंधित बातम्या