मॅंचेस्टर सिटीचा तिहेरी धमाका

किशोर पेटकर
मंगळवार, 11 जून 2019

क्रीडांगण
 

इंग्लंडचा मात्तब्बर फुटबॉल क्‍लब मॅंचेस्टर सिटीने २०१८-१९ मोसमात जबरदस्त कामगिरी प्रदर्शित केली. इंग्लिश फुटबॉलमध्ये एकाच मोसमात तीन करंडक पटकाविण्याचा पराक्रम या संघाने बजावला. पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला युरोपियन पातळीवरील चॅंपियन्स लीग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी पार करता आली नाही. मात्र, इंग्लिश फुटबॉलमध्ये त्यांनी जेतेपदाची आगळी हॅटट्रिक साधली. पेनल्टी शूटआऊटवर त्यांनी चेल्सी क्‍लबला हरवून सलग दुसऱ्या मोसमात इंग्लिश फुटबॉल लीग (ईएफएल) स्पर्धा जिंकली. नंतर अवघ्या एका गुणाच्या फरकाने लिव्हरपूल क्‍लबला मागे टाकत इंग्लिश प्रिमिअर लीग विजेतेपद राखले, तर एफए कप स्पर्धेच्या अंतिम लढतीत वॅटफोर्ड क्‍लबचा अर्धा डझन गोलांनी धुव्वा उडविला. इंग्लिश प्रिमिअर लीग स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकणारा मॅंचेस्टर सिटी हा २००९ नंतरचा पहिलाच संघ ठरला. प्रिमिअर लीगमधील ३८ सामन्यांत त्यांनी ३२ विजय नोंदवत ९८ गुणांची कमाई केली. महत्त्वपूर्ण असलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात सिटीने ब्रिटॉन क्‍लबचा ४-१ फरकाने पाडाव केला, त्यामुळे लिव्हरपूल संघाला ९७ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेतेपदासाठी मॅंचेस्टर सिटी व लिव्हरपूल या संघांतच चुरस राहिली. तिसऱ्या क्रमांकावरील चेल्सी क्‍लबने ७२ गुणांची प्राप्ती केली. 

धनाढ्य संघ
 इंग्लिश फुटबॉलमध्ये मोसमात ‘क्‍लीन स्विप’ नोंदविणारा मॅंचेस्टर सिटी हा धनाढ्य क्‍लब आहे. अबू धाबीतील उद्योगपती खाल्दूम अल मुबारक हे या क्‍लबचे मालक. सप्टेंबर २००८ मध्ये त्यांनी हा संघ विकत घेतला. तेव्हापासून खर्चाच्या बाबतीत संघ व्यवस्थापनाने हात आखडता घेतलेला नाही. मॅंचेस्टर सिटीने क्‍लबसाठी आखून दिलेल्या आर्थिक नियमावलीचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. युरोपियन फुटबॉलमधील प्रधान संघटना असलेल्या ‘यूईएफए’ने मॅंचेस्टर सिटी प्रकरण ‘क्‍लब आर्थिक नियंत्रण संस्थे’च्या चौकशी समितीकडे सोपविले आहे. यापूर्वी २०१४ मध्येही या कारणास्तव मॅंचेस्टर सिटीवर मोठी दंडात्मक कारवाई झाली होती. खर्चाच्या बाबतीत हात सैल सोडणाऱ्या मॅंचेस्टर सिटी संघाने दोन मोसमात सातत्य राखत चाहत्यांना खूष केले आहे. मोठी रक्कम मोजून खेळाडूंशी करार करण्यावर या क्‍लबचा भर असतो. सिटीने चॅंपियन्स लीग स्पर्धा एकदाच १९६९-७० च्या मोसमात जिंकली होती, त्यानंतर या प्रतिष्ठित करंडकाने त्यांना वाकुल्याच दाखविल्या आहेत. यंदा टॉटेनहॅम हॉट्‌सपर या इंग्लिश संघाने त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. इंग्लिश फुटबॉलमध्ये दबदबा राखलेल्या मॅंचेस्टर सिटीचे नवीन मोसमात चॅंपियन्स लीग विजेतेपदाचे लक्ष्य राहील. नव्या मोसमात हा संघ व्हिन्सेंट कोम्पनी या अनुभवी खेळाडूस मुकणार आहे. २००८ पासून सलग अकरा वर्षे बेल्जियमच्या या ३३ वर्षीय हुकमी बचावपटूने मॅंचेस्टर सिटीचे प्रतिनिधित्व केले. सिटीतर्फे ३६० सामने खेळल्यानंतर, तसेच १२ करंडक जिंकल्यानंतर  हा कर्णधार यंदाच्या मोसमाअखेरीस संघाचा निरोप घेणार आहे.

गार्डिओला यांचा परीसस्पर्श
 स्पेनचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू पेप गार्डिओला हे मॅंचेस्टर सिटीचे प्रशिक्षक आहेत. चिलीचे मान्युएल पेलेग्रिनी यांच्याकडून त्यांनी २०१६ मध्ये सिटीच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या परीसस्पर्शाने मॅंचेस्टर सिटीने मागील दोन मोसमात यश जास्त अनुभवले आहे. ४८ वर्षीय गार्डिओला हे अतिशय हुशार, कल्पक आणि प्रतिभासंपन्न प्रशिक्षक आहेत. यशस्वी संघ तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. गार्डिओला यांच्या प्रगल्भ मार्गदर्शनाखाली स्पेनच्या बार्सिलोना क्‍लबने २००८-२०१२ या कालावधीत १४ करंडक पटकाविले. त्यानंतर ते जर्मनीत गेले. तिथेही त्यांच्या प्रशिक्षणाचा करिष्मा पाहायला मिळाला. बायर्न म्युनिकने २०१३ ते २०१६ कालावधीत सात करंडक जिंकले. गार्डिओला यांचे जादुई प्रशिक्षण आता मॅंचेस्टर सिटी अनुभवत आहे. सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या मॅंचेस्टर सिटीने २४ प्रमुख स्पर्धा जिंकलेल्या आहेत. त्यापैकी सहा करंडक दोन मोसमांत गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकले आहेत.

संबंधित बातम्या