महिला जगज्जेतेपदासाठी चुरस

किशोर पेटकर
सोमवार, 17 जून 2019

क्रीडांगण
 

फुटबॉलमध्ये पुरुषांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेचे वलय फार मोठे असते. तुलनेत महिलांच्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेकडे दुर्लक्षच होते. मात्र, फुटबॉलमधील महिलांची गुणवत्ता आणि त्यांचे स्पृहणीय कौशल्य नजरेआड करता येत नाही. सात जूनपासून फ्रान्समध्ये महिलांची विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा सुरू झाली. यंदा स्पर्धेची आठवी आवृत्ती आहे. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे सध्या जोरदार वारे भारतात वाहत आहे, त्यामुळे देशात या स्पर्धेबाबत फारच कमी चर्चा झाली. भारताचा महिला फुटबॉल संघही बराच मागे आहे. मात्र, जगभरात महिलांचे फुटबॉल अतिशय पुढारलेले आहे. महिला फुटबॉलमध्ये अमेरिका संघ बलाढ्य आहे. तब्बल तीन वेळा त्यांनी विश्‍वकरंडक जिंकला आहे. जर्मनीने दोन वेळा, तर नॉर्वे व जपानने प्रत्येकी एक वेळ जगज्जेतेपद मिळविले आहे. येत्या सात जुलैला फ्रान्समधील लियॉन शहरात स्पर्धेची अंतिम लढत होईल. त्यावेळी अमेरिका चौथ्यांदा बाजी मारणार, की नवा संघ करंडक उंचावणार या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल. अमेरिकेने मागील दोन विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. २०११ मध्ये त्यांना पेनल्टी शूटआऊटवर जपानने हरविले, मात्र चार वर्षांपूर्वी कॅनडात झालेल्या स्पर्धेत अमेरिकेने सव्याज वचपा काढला. जपानचा धुव्वा उडवून अमेरिकेने तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला. यंदा फ्रान्समधील नऊ शहरात सामने होत आहेत. एकूण ५२ लढती होणार असून अमेरिकेसह, जर्मनी, जपान, इंग्लंड, यजमान फ्रान्स यांचा करंडकासाठी दावा असेल. 

२४ संघ मैदानात
 फ्रान्समधील महिलांच्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या मैदानात २४ संघ आहेत. युरोपातील सर्वाधिक नऊ संघ आहेत. यामध्ये यजमानांसह इंग्लंड, जर्मनी, इटली, नेदरलॅंड, नॉर्वे, स्कॉटलंड, स्पेन, स्वीडन हे देश आहेत. त्याखालोखाल आशिया विभागाचा क्रम आहे. ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि थायलंड हे पाच देश आशियाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अमेरिका-मध्य अमेरिकेतून कॅनडा, जमैका व अमेरिका, आफ्रिकेतून कॅमेरून, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतून अर्जेंटिना, ब्राझील, चिली हे देश, तर ओसेनिया गटातून न्यूझीलंडने स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. १९९१ मध्ये चीनमध्ये सर्वप्रथम महिला विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा झाली. तेव्हापासून अमेरिका, जर्मनी, नॉर्वे, स्वीडन, ब्राझील, चीन, जपान हे देश प्रत्येक स्पर्धेत खेळले आहेत. यंदा जमैका, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, चिली या देशांनी स्पर्धेत पदार्पण केले आहे. अमेरिकेची स्पर्धेतील कामगिरी स्पृहणीय आहे. २०१५ पर्यंतच्या स्पर्धेत हा देश एकूण ४३ सामने खेळला असून ३३ विजय, सहा बरोबरी, चार पराभव व ११२ गोल अशी त्यांची कौतुकास्पद आकडेवारी आहे. त्याखालोखाल जर्मनीचा क्रम आहे. त्यांनी ३९ सामन्यांत २६ विजय, पाच बरोबरी, आठ पराभव अशी कामगिरी करताना १११ गोल नोंदविले आहेत.

विक्रमी मार्ता
 पुरुष फुटबॉलमध्ये ब्राझीलचा दबदबा आहे. त्यांनी सर्वाधिक पाच वेळा जगज्जेतेपद मिळविले आहे, पण या देशाचा महिला संघ जागतिक विजेतेपदापासून दूरच आहे. त्यांनी एकदाच अंतिम फेरी गाठली, मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २००७ मध्ये ब्राझीलच्या महिलांना जर्मनीने दोन गोलांनी हरविले होते. ब्राझीलच्या महिला विजेतेपदाच्या शर्यतीत पिछाडीवर असल्या, तरी या संघाची हुकमी स्ट्रायकर मार्ता हिची कामगिरी विक्रमी आहे. यंदा ही ३३ वर्षीय खेळाडू सलग पाचव्यांदा विश्‍वकरंडक स्पर्धेत सहभागी होत आहे. स्पर्धा सहभागात ती जर्मनीच्या बिर्जिट प्रिन्झ हिच्या विक्रमाशी बरोबरी साधेल. विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक १५ गोल करण्याचा विश्‍वविक्रम मार्ता हिच्या नावावर आहे. निवृत्त झालेल्या प्रिन्झ आणि अमेरिकेची ॲबी वॅम्बॅच (प्रत्येकी १४ गोल) यांना मार्ताने चार वर्षांपूर्वीच मागे टाकले होते. सहा वेळा जगातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा मान मिळविलेल्या मार्ता हिला यंदा गोलसंख्या वाढविण्याची संधी मिळत आहे. 
 

संबंधित बातम्या