‘चॅंपियन्स’ लिव्हरपूल!

किशोर पेटकर
सोमवार, 17 जून 2019

क्रीडांगण
 

इंग्लंडच्या लिव्हरपूल फुटबॉल क्‍लबने तब्बल चौदा वर्षांनंतर चॅंपियन्स लीग स्पर्धा जिंकून युरोपातील सर्वोत्तम संघाचा मान मिळविला. स्पेनमधील माद्रिद येथे दोन इंग्लिश संघांत अंतिम लढत झाली. टॉटनहॅम हॉट्‌सपरने प्रथमच अंतिम फेरी गाठली. पराभूत होण्यापूर्वी त्यांनी लिव्हरपूल संघाला झुंजविले, पण अखेरीस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सामन्याच्या १०८ व्या सेकंदास महंमद सालाह याने पेनल्टी फटका अचूक मारल्यामुळे लिव्हरपूलला सुरुवातीसच आघाडी मिळाली. त्यानंतर सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना दिव्होक ओरिजी याने केलेल्या गोलमुळे लिव्हरपूल संघ २००५ नंतर प्रथमच चॅंपियन्स लीग स्पर्धेतील विजेता ठरला. गतवर्षी इंग्लंडच्या या मातब्बर संघाला चॅंपियन्स लीग करंडकाने हुलकावणी दिली होती. रियल माद्रिदने तेराव्यांदा करंडक पटकाविताना लिव्हरपूलला हरविले होते. तेव्हा अर्ध्या तासाच्या खेळात त्यांना इजिप्तचा हुकमी आघाडीपटू महंमद सालाह याला दुखापतीमुळे मुकावे लागले होते, त्यामुळे लिव्हरपूलचे आव्हान तोकडे ठरले. यंदा पूर्ण तंदुरुस्त सालाह याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. चॅंपियन्स लीग अंतिम लढतीपूर्वी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये ‘द रेड्‌स’ संघाचे विजेतेपद अगदी थोडक्‍यात हुकले. विजेत्या मॅंचेस्टर सिटीने त्यांना एका गुणाच्या फरकाने मागे टाकले. चॅंपियन्स लीगमध्ये यंदा लिव्हरपूलने टॉटनहॅम हॉट्‌सपर संघ धक्कादायक निकाल नोंदविणार नाही याची खबरदारी घेतली, त्यामुळे गतवर्षीची पुनरावृत्ती टळली.

सहाव्यांदा विजेते
लिव्हरपूल संघाचा युरोपियन फुटबॉलमध्ये सत्तर-ऐंशीच्या दशकात मोठा दबदबा होता. त्यानंतर या संघाचा करिष्मा कमी होत गेला. दीर्घ प्रतीक्षेनंतर या संघाने यंदा चॅंपियन्स लीग स्पर्धेत सहाव्यांदा बाजी मारली. चॅंपियन्स लीग स्पर्धा स्पेनच्या रियल माद्रिदने सर्वाधिक १३ वेळा जिंकली आहे. त्यानंतर इटलीच्या एसी मिलान संघाने सात वेळा करंडक पटकाविला आहे. आता लिव्हरपूल संघ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. प्रत्येकी पाच वेळा चॅंपियन्स लीग स्पर्धा जिंकलेल्या बायर्न म्युनिक व बार्सिलोना संघांना त्यांनी मागे टाकले आहे. गेल्या चार वर्षांत रियल माद्रिदने तीन वेळा, तर ब्रार्सिलोना संघाने एक वेळ चॅंपियन्स लीग स्पर्धा जिंकली होती. यावेळी लिव्हरपूलने स्पॅनिश वर्चस्व उलथवून टाकले. उपांत्य फेरीत त्यांनी बार्सिलोना संघाला नमविले, तर रियल माद्रिदचे आव्हान ‘राउंड ऑफ १६’ फेरीतच आटोपले होते. लक्षणीय बाब म्हणजे, अंतिम सामना दोन इंग्लिश फुटबॉल संघांत झाला. लिव्हरपूलने हल्लीच्या काळात स्पर्धा जिंकली नव्हती. इंग्लिश फुटबॉल लीगचे विजेतेपद त्यांनी २०११-१२ मोसमात पटकाविले होते. त्यानंतर त्यांना करंडकासह जल्लोष करता आला नव्हता. त्यामुळे ‘ॲनफिल्ड’वरील त्यांचे चाहतेही हिरमुसले होते. चॅंपियन्स लीग करंडकामुळे १२७ वर्षांची मोठी परंपरा असलेल्या या क्‍लबमध्ये नवा जोश संचारला आहे.

प्रशिक्षक क्‍लोप यांची छाप
जर्मन फुटबॉल मार्गदर्शक जुर्गेन क्‍लोप यांनी चार वर्षांपूर्वी ‘ॲनफिल्ड’वर लिव्हरपूल संघाचे प्रशिक्षक या नात्याने पदार्पण केले. या संघाला ‘चॅंपियन’ करणे हे मुख्य उद्दिष्ट होते, त्यास चार मोसमांचा कालावधी लागला. क्‍लोप यांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हरपूलला गतवर्षी चॅंपियन्स लीग स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अखेरीस या ५१ वर्षीय प्रशिक्षकाची ध्येयपूर्ती झाली. चॅंपियन्स लीग जिंकणारे ते पाचवे जर्मन प्रशिक्षक आहेत. 
स्टुटगार्टमध्ये जन्मलेल्या क्‍लोप यांनी जर्मनीतील मैन्झ ०५ संघाचे सात वर्षे प्रशिक्षकपद सांभाळले, नंतर बोरुसिया डॉर्टमुंडचेही ते सात वर्षे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने दोन वेळा बुडेस्लिगा स्पर्धा जिंकली. मात्र, २०१३ च्या चॅंपियन्स लीगमध्ये त्यांना उपविजेतेपद मिळाले होते. २०१५ मध्ये लिव्हरपूलने त्यांच्याशी करार केला. त्यानंतर लागोपाठ दोन वेळा त्यांनी इंग्लिश क्‍लबला चॅंपियन्स लीगच्या अंतिम फेरीत नेत छाप पाडली. जर्मनी आणि इंग्लंडमधील संघांचे प्रशिक्षक या नात्याने सहा अंतिम लढती गमावल्यानंतर क्‍लोप यांची यंदा विजेतेपदाची स्वप्नपूर्ती झाली. 

संबंधित बातम्या