‘क्रिकेटपटू’ ॲश्‍लीचे टेनिस यश

किशोर पेटकर
सोमवार, 1 जुलै 2019

क्रीडांगण
 

ऑस्ट्रेलियाच्या ॲश्‍ली बार्टी हिची क्रीडा मैदानावरची कारकीर्द अफलातून आहे. ज्युनिअर मुलींच्या जागतिक महिला टेनिस क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकापर्यंत झेपावल्यानंतर तिला सीनियर गटात अपेक्षापूर्ती करता आली नाही. २०१४ मध्ये अमेरिकन ओपनमध्ये पहिल्या फेरीतच गारद झाल्यानंतर तिने खेळण्याचे मैदानच बदलले. ही अष्टपैलू खेळाडू महिलांचे व्यावसायिक क्रिकेट खेळू लागली. २०१५-१६ च्या मोसमात तिने ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धेत ब्रिस्बेन हीट संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१५ मध्ये ती क्वीन्सलॅंडकडून प्रथम श्रेणी एकदिवसीय क्रिकेटही खेळली. महिला क्रिकेटपटू या नात्याने कारकीर्द आकार घेत असतानाच ॲश्‍लीने पुन्हा टेनिस रॅकेट हाती घेतले आणि क्रिकेटची बॅट बाजूला ठेवली. जून २०१६ मध्ये तिने व्यावसायिक महिला टेनिसमध्ये पुनरागमन केले. त्या वेळस जागतिक क्रमवारीत ती ६२३ व्या स्थानी होती. या २३ वर्षीय महिलेने जिगरबाज प्रगती साधताना यंदा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकाविला. तिची ही वाटचाल स्वप्नवत आहे. यापूर्वी फ्रेंच ओपनच्या मातीच्या कोर्टवर दुसरी फेरी पार न केलेल्या या ऑस्ट्रेलियन महिलेने जिद्दी खेळाच्या बळावर विजेतेपदाचा करंडक कवेत घेतला. चेक प्रजासत्ताकाच्या मार्केटा व्होंड्रौसोवा हिला ६-१, ६-३ असे लीलया हरवत ॲश्‍लीने कारकिर्दीत प्रथमच एकेरीत ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला. क्रिकेट की टेनिस अशा द्विधा मनःस्थितीत सापडल्यानंतर तिने ‘फर्स्ट लव्ह’ असलेल्या टेनिसला प्राधान्य दिले. मध्यंतरी ‘ब्रेक’ घेतल्यानंतर तिला क्रिकेट या सांघिक खेळामुळे सावरता आले. नवा आत्मविश्‍वास गवसला आणि त्या बळावर खेळात प्रगती साधत ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाचे स्वप्न साकारले. पॅरिसमधील मातीच्या कोर्टवरील सफल घोडदौडीमुळे ॲश्‍लीला जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम स्थान मिळविता आले. नाओमी ओसाकानंतर ती आता दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेत तिला आठवे मानांकन होते.

४६ वर्षांनंतर...
 ॲश्‍लीचे रोलाँ गॅरोवरील फ्रेंच ओपन विजेतेपद आगळे ठरले. तब्बल ४६ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन महिलेने क्‍ले कोर्टवर ग्रॅंड स्लॅम यश साकारले. ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट हिने १९७३ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीचा किताब पटकाविला होता. मार्गारेट कोर्टने एकंदरीत पाच वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूर हिने फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली होती, पण तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ॲश्‍लीने संधी गमावली नाही. आक्रमक खेळाची मालिका कायम राखत तिने मार्केटा हिला निष्प्रभ केले. स्पर्धेत ॲश्‍लीने ३८ बिनतोड सर्व्हिसद्वारे धारदार खेळाचे प्रदर्शन घडविले. मातीच्या कोर्टवर ॲश्‍लीचा खेळ खुलत नव्हता, या स्पर्धेत गतवर्षी ती दुसऱ्याच फेरीत गारद झाली होती. यंदा तिने कमाल केली. तिची कामगिरी ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटूंना स्फूर्ती देणारी आहे.

खेळात प्रगती
 पुन्हा टेनिसमध्ये परतणे हा आपला सर्वोत्तम निर्णय होता, असे ॲश्‍ली मानते. २०१४ पर्यंत ॲश्‍ली टेनिस कोर्टवर अडखळताना दिसत होती. २०११ मध्ये तिने विंबल्डन स्पर्धेत मुलींच्या एकेरीत विजेतेपद मिळविले होते. मात्र, नंतर तिला अपेक्षांचा दबाव पेलवला नाही. पुनरागमनात तिला सूर गवसला. गेल्या वर्षी तिने अमेरिकन ओपनमध्ये महिला दुहेरीत बाजी मारली. तिचा हा कारकिर्दीतील पहिला ग्रॅंड स्लॅम करंडक ठरला. याच स्पर्धेत एकेरीत तिने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली. यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारत तिने चौदाव्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली. त्यापूर्वी सिडनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती उपविजेती ठरली होती. मार्च महिन्यात ॲश्‍लीने मायामी ओपन स्पर्धा जिंकली. त्या आत्मविश्‍वासाच्या बळावर ती फ्रेंच ओपनच्या मातीच्या कोर्टवर उतरली. त्यापूर्वी दुखावलेल्या हातावरही तिने योग्य उपचार करून घेतले. तिने झुंजार खेळाद्वारे प्रथमच एकेरीत ग्रॅंड स्लॅम यशाची चव चाखली.

संबंधित बातम्या