रोलँ गॅरोवर नदालची तपपूर्ती!

किशोर पेटकर
सोमवार, 1 जुलै 2019

क्रीडांगण
 

मातीच्या कोर्टवरील महान टेनिसपटू हा लौकिक स्पेनच्या राफेल नदालने कधीच मिळविला आहे. ‘क्‍ले कोर्ट’वरील सम्राट ही उपाधी त्याच्या यथायोग्यच आहे. पुरुष टेनिसमधील या दिग्गज खेळाडूने रोलँ गॅरोवर यावर्षी नवा अध्याय लिहिला. फ्रेंच ओपन ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत एकेरी विजेतेपदाची तपपूर्ती करताना त्याने जबरदस्त जिद्द प्रदर्शित केली. सलग तिसऱ्या वर्षी पॅरिसमधील क्‍ले कोर्टवर बाजी मारताना ही स्पर्धा बाराव्यांदा जिंकण्याचा पराक्रम त्याने साधला. एकंदरीत त्याचा हा अठरावा ग्रॅंड स्लॅम एकेरी करंडक ठरला. टेनिसमधील आणखी एक महान खेळाडू स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याला गाठण्यासाठी नदालला आणखी दोन ग्रॅंड स्लॅम करंडक हवे आहेत. एकच ग्रॅंड स्लॅम स्पर्धा १२ वेळा जिंकणारा ३३ वर्षीय नदाल हा पहिलाच टेनिसपटू आहे. यंदा रोलँ गॅरोवर त्याने अंतिम लढतीत ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीम याला पराजित केले. गतवर्षीही त्याने याच प्रतिस्पर्ध्यास हरवून जेतेपदाचा करंडक उंचावला होता. नदालने यंदा सफाईदार खेळाने टेनिसप्रेमींना मंत्रमुग्ध केले. रॉजर फेडररविरुद्धची उपांत्य लढत ‘मास्टरक्‍लास’ ठरली. २० वेळच्या ग्रॅंड स्लॅम विजेत्यास त्याने सरळ तीन सेट्‌समध्ये पराजित केले. पॅरिसमधील मातीच्या कोर्टवर नदाल वेळोवेळी फेडररला भारी ठरलेला आहे. या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यास हरवून त्याने चार वेळा फ्रेंच ओपन जिंकले आहे. नदालला यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम लढतीत नोव्हाक जोकोविचकडून सरळ सेट्‌समध्ये हार पत्करावी लागली होती. पॅरिसमधील खेळ पाहता, आगामी विंबल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीत तो विजेतेपदाचा एक दावेदार असेल. ही स्पर्धा त्याने शेवटची नऊ वर्षांपूर्वी जिंकली होती.

९३ विजयांचा बादशाह
फ्रेंच ओपन स्पर्धा खेळली जाणाऱ्या रोलँ गॅरोवर डावखुऱ्या नदालचा थाट बादशाहचा असतो. या ठिकाणी तो २००५ पासून खेळत आहे. फक्त दोन वेळा पराभूत झाला आहे आणि तब्बल ९३ विजय नोंदविले आहेत. १५ वर्षांत १२ अंतिम लढती जिंकणे हा महापराक्रम आहे. नदालची पॅरिसच्या क्‍ले कोर्टवरील दिग्गज भरारी अबाधित राहण्याचे संकेत आहेत. एवढे सातत्य आणि जिंकण्याची भूक कायम राखण्यासाठी अफाट संयम आणि खेळावर हुकमत राखावी लागते. दुखापतींवर मात करत नदाल वेळोवेळी मुसंडी मारताना दिसला. फ्रेंच ओपनमध्ये त्याला फक्त दोन लढती गमवाव्या लागल्या. २००९ मध्ये चौथ्या फेरीत त्याला स्वीडनच्या रॉबिन सॉडरलिंग याने हरविले. त्याचा सव्याज वचपा काढताना नदालने २०१० मधील अंतिम लढतीत सॉडरलिंगला नमविले. २००९ मध्ये नदालला त्याचे दोन्ही गुडघे सतावत होते, त्याचाच परिणाम खेळावर झाला होता. दुखापतीतून सावरत त्याने पुन्हा उसळी घेतली. त्यानंतर त्याने फ्रेंच करंडक २०१० ते २०१४ या कालावधीत सलगपणे जिंकला. २०१५ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने त्याचे आव्हान संपुष्टात आणले. २०१६ मध्ये डाव्या मनगटाच्या दुखापतीमुळे नदालला तिसऱ्या फेरीत माघार घ्यावी लागली. मात्र, नव्या जोशाने तो २०१७ मध्ये पॅरिसला दाखल झाला आणि आता सलग तीन विजेतेपदांसह निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

धडाकेबाज खेळ
दुखापतींना हरविलेल्या आणि मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या ‘राफा’चा टेनिस कोर्टवरील धडाकेबाज खेळ पाहता, फेडररचा २० ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम संकटात आहे. प्रतिस्पर्ध्यांवर पूर्ण वर्चस्व राखत नदाल खेळत असताना त्याचे वाढते वय जाणवत नाही. यंदा क्‍ले कोर्टवर त्याची सुरुवात अपेक्षित नव्हती. माँटे कार्लो, बार्सिलोना, माद्रिद येथील मातीच्या कोर्टवर त्याला जेतेपदाने गुंगारा दिला. रोममध्ये जोकोविचला हरवून त्याने फ्रेंच ओपनपूर्वी सज्जता मिळविली. त्याने कारकिर्दीतील एकंदरीत ८२ वा करंडक जिंकून नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले.

संबंधित बातम्या