युवा निहालची घोडदौड

किशोर पेटकर
सोमवार, 8 जुलै 2019

क्रीडांगण
 

केरळमधील ग्रॅंडमास्टर निहाल सरीन याने वयाच्या १४ व्या वर्षी बुद्धिबळपटूंसाठी ‘माईलस्टोन’ असलेला २६०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला आहे. असा पराक्रम करणारा तो भारताचा सर्वांत युवा बुद्धिबळपटू ठरला आहे. ग्रॅंडमास्टर परिमार्जन नेगी याने २००९ मध्ये २६०० एलो गुण गाठले होते, तेव्हा तो १५ वर्षांचा होता. ‘फिडे’ने एक जूनला जाहीर केलेल्या मानांकन यादीत निहालच्या खाती २६०६ एलो गुणांची नोंद होती. अतिशय कुशाग्र निहालकडे लहान वयातच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात आदराने पाहिले जाते. त्याची कामगिरीच तेवढी बोलकी आहे. जगातील बलाढ्य बुद्धिबळपटूंना या कोवळ्या खेळाडूने झुंजविले असून बुद्धिबळ जाणकारांकडून ‘वाह वा’ मिळविली आहे. निहालने गतवर्षी टाटा स्टील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत कमाल केली. 
भारताचा पाच वेळचा जगज्जेता ‘सुपर ग्रॅंडमास्टर’ विश्‍वनाथन आनंद याच्यासह नावाजलेल्या बुद्धिबळपटूंना विजयापासून दूर ठेवत बरोबरीचा प्रस्ताव मान्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर आनंदने या युवा बुद्धिमान खेळाडूचे मनापासून कौतुक केले. एक दिवस निहाल नक्कीच जगज्जेता बनू शकतो, अशी भविष्यवाणी आनंदने केली आहे. पुढील वाटचाल खडतर असेल, पण विश्‍वनाथन आनंदसारख्या दिग्गज बुद्धिबळपटूस प्रभावित करणाऱ्या निहालमध्ये विशेष असे काही आहे हे नक्कीच. निहालमध्ये आपल्याला अफाट गुणवत्ता दिसत असल्याचे मत आनंदने व्यक्त केले आहे.

ग्रॅंडमास्टर किताबास गवसणी
निहाल सरीनने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा गाजविल्या आहेत. युक्रेनचा ग्रॅंडमास्टर दिमित्री कोमारोव यांच्या मार्गदर्शनाखाली केरळमधील त्रिसूर येथे जन्मलेल्या खेळाडूंचे बुद्धिबळ चांगलेच बहरले. त्यानंतर त्याला ग्रॅंडमास्टर श्रीनाथ नारायणन यांचेही मार्गदर्शन लाभले. आता तो स्वतःच वैयक्तिक खेळाचे मूल्यमापन करतो, चुका शोधतो, त्यावर उपाययोजना करतो आणि त्यातूनच तो तरबेज झाला आहे. २०१८ मध्ये त्याच्या ग्रॅंडमास्टर किताबावर शिक्कामोर्तब झाले. हा किताब पटकाविणारा निहाल भारताचा ५३ वा बुद्धिबळपटू ठरला. गेल्या वर्षी मार्चमध्ये ग्रॅंडमास्टर किताबासाठी आवश्‍यक तिसरा नॉर्म मिळवत निहालने वाटचाल योग्य दिशेने राखली होती. २०१६ मध्ये तो पहिल्यांदा भारताबाहेर आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळला. सुरुवातीस इंटरनॅशनल मास्टर किताब हे त्याचे लक्ष्य राहिले, त्यानंतर वर्षभरात त्याने ग्रॅंडमास्टरची उपाधी प्राप्त केली. दबाव विरहित खेळ, कमालीची एकाग्रता, परिणामकारक चाली हे निहालचे वैशिष्ट्य आहे. क्‍लासिकल बुद्धिबळाबरोबर झटपट प्रकारातील रॅपिड, ब्लिट्‌झ प्रकारातही त्याचा खेळ खुलतो. ब्लिट्‌झमध्ये तो आशियाई आणि जागतिक पातळीवर विजेता ठरलेला आहे.

वडिलांमुळे बुद्धिबळात
निहालचा जन्म १३ जुलै २००४ रोजी झाला. पंधराव्या वाढदिवसापूर्वीच त्याने बुद्धिबळात नावलौकिक मिळविला आहे. त्याचे वडील सरीन अब्दुलसलाम व आई शिजीन यांची पार्श्‍वभूमी वैद्यकीय. त्रिसूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सरीन दांपत्य प्रोफेसरपदी कार्यरत आहेत. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे निहाल वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धिबळ खेळू लागला. शालेय सुट्टीत घरी बसून निहाल कंटाळू नये यासाठी अब्दुलसलाम यांनी मुलास बुद्धिबळ ‘बोर्ड’कडे वळविले. कोट्टायम येथे असताना लहानग्या निहालला आजोबा उम्मर यांची साथ लाभली. आजोबा हेच त्याचे प्रारंभिक मार्गदर्शक ठरले. शाळेत पी. मॅथ्यू यांच्याकडून तो शास्त्रोक्त बुद्धिबळ शिकला. वयाच्या सातव्या वर्षी तो स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळू लागला. उपजत नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेल्या निहालने ‘लाँचपॅड’ मिळाल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. केरळमधील स्पर्धा गाजवत तो वयोगट पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करू लागला. पाच वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झालेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत निहालने १० वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले. या कामगिरीने ‘फिडे’कडून त्याला कॅंडिडेट मास्टर किताबाची बक्षिसीही मिळाली होती.

संबंधित बातम्या