आश्‍वासक भालाफेकपटू

किशोर पेटकर
सोमवार, 8 जुलै 2019

क्रीडांगण
 

भारतीय ॲथलेटिक्‍समध्ये भालाफेकीचा उल्लेख करताच नजरेसमोर नीरज चोप्रा येतो. नीरजची कामगिरी अलौकिक आहे. २० वर्षांखालील जागतिक विजेता, आशियाई, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला नीरज जगातील आघाडीचा पुरुष भालाफेकपटू आहे. पण सध्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. ८८.०६ मीटरचा राष्ट्रीय विक्रम नीरजच्या खाती आहे. सध्या नीरजच्या अनुपस्थितीत आणखी एक भारतीय भालाफेकपटू डोके वर काढत आहे. शिवपाल सिंग हे या भालाफेकपटूचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय मैदानावर त्याची नुकतीच कुठे सुरुवात आहे, पण या वर्षी त्याची कामगिरी आश्‍वासक ठरली आहे. या वर्षी मे महिन्यात नीरजच्या ‘एल्बो’वर शस्त्रक्रिया झाली. भारताचा हा अव्वल भालाफेकपटू कधी पुनरागमन करेल याची निश्‍चिती नाही. नीरजच्या अनुपस्थितीत २४ वर्षीय शिवपालने आशियाई पातळीवर प्रगती प्रदर्शित केली. त्यामुळे ॲथलेटिक्‍समधील भारतीय पाठीराखे सुखावले आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये आशियाई अजिंक्‍यपद ॲथलेटिक्‍स स्पर्धेत शिवपालने दोहा येथे ८६.२३ मीटर अंतरावर भाला फेकून रौप्यपदक जिंकले. तेव्हापासून तो चर्चेत आहे. त्याची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. दोहा येथे शिवपालने तैवानचा आशियाई विक्रमधारक चाओ-त्सुन चेंग याच्यानंतर दुसरा क्रमांक मिळविला. जागतिक पातळीवर नुकतेच त्याने सर्वोत्तम मानांकन नोंदविले आहे. २२ वरून तो १४ व्या क्रमांकावर आला आहे.

कामगिरीत सुधारणा
दोहा येथे शिवपालने कामगिरीतील सुधारणा प्रदर्शित केली. भारताचे भालाफेक प्रशिक्षक जर्मनीचे युवे हॉन यांचे शिवपालला मार्गदर्शन लाभले. हॉन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवपालने जबरदस्त प्रगती साधली आहे. नीरजच्या यशातही हॉन यांचा मोलाचा वाटा आहे. युवे हॉन हे भालाफेकीतील महान व्यक्तिमत्त्व आहे. १९८४ मध्ये त्यांनी १०४.८० मीटर अंतरावर भाला फेकून विश्‍वविक्रमी कामगिरी नोंदविली होती. शिवपालने मेहनतीच्या बळावर हॉन यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत कामगिरी सुधारली आहे. ८६ मीटर पार केलेल्या शिवपालने प्रशिक्षक हॉन यांनाही सुखद धक्का दिला आहे. गेल्या वर्षी जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शिवपालने ७४.११ मीटरवर भाला फेकला. पहिल्या फेकीत तो दुखापतग्रस्त झाला. या वर्षी तो सावरला. पतियाळा येथील फेडरेशन कप ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ८२.५६ मीटरची नोंद केली, तर दोहा येथील कामगिरीत जास्तच प्रगती दिसली. शिवपाल भारतीय हवाई दलात कार्यरत आहे. येत्या दोन वर्षांत ९० मीटर अंतर कापण्याचे लक्ष्य त्याने बाळगले आहे. जूनमध्ये त्याने ओस्लो येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत भाग घेतला. तेथे ८०.८७ मीटरची नोंद केली. शिवपालची ही पहिलीच डायमंड लीग स्पर्धा ठरली. या वर्षीची कामगिरी पाहता, शिवपालमध्ये अपेक्षापूर्ती करण्याची क्षमता दिसते. त्याने भाला फेकीत सातत्य राखणे आवश्‍यक आहे. भाला फेकण्यापूर्वी, शिवपालची धाव वेगवान असते. दूरवर भाला फेकण्याची मालिका कायम राहिल्यास शिवपालला ‘टॉप टेन’ खेळाडूंत निश्‍चितच स्थान मिळू शकते. पाठदुखी बळावली नाही, तर तो मोठी मजल गाठू शकतो.

काकांचे मार्गदर्शन
उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून ३० किलोमीटरवर असलेले चंदौली हे शिवपालचे गाव. काका जगमोहन सिंग व शिवपूजन, तसेच वडील रामसराय गावातील शेतजमिनीत भाला फेकण्याचा सराव करत असत. त्यांना पाहून शिवपालने या खेळात मन लावले. जगमोहन हे माजी राष्ट्रीय भालाफेकपटू. काकांना युवा शिवपालची भालाफेकीतील शैली भावली व त्यांनी त्याला याच खेळात कारकीर्द करण्याचा सल्ला दिला. साधारणतः १४ वर्षांचा असताना काकांच्या मार्गदर्शनाखाली शिवपालचे भालाफेकीतील प्रशिक्षण सुरू झाले. कडक शिस्तीच्या जगमोहन यांच्या निगराणीत शिवपालचा भालाफेकीतील प्रवास सुरू झाला. त्यांनाच तो खेळातील आदर्श मानतो. राज्य पातळीवर यश मिळविल्यानंतर शिवपाल राष्ट्रीय मैदानावर चमकू लागला. राष्ट्रीय शिबिरात आल्यानंतर शिवपालच्या गुणवत्तेस व्यापक व्यासपीठ मिळाले.

संबंधित बातम्या