लॉर्ड्‌सवर इंग्लंडची स्वप्नपूर्ती!

किशोर पेटकर
सोमवार, 22 जुलै 2019

क्रीडांगण
 

क्रिकेटमधील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लॉर्ड्‌स मैदानावर इंग्लंडचे विश्‍वविजेतेपदाचे ग्रहण सुटले. क्रिकेट हा खेळ मैदानावर इंग्रज साहेबांनी आणला, पण त्यांना प्रतिष्ठेचा विश्‍वकरंडक कधीच जिंकता आला नाही. एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडकात आंग्ल संघाने तीन वेळा अंति फेरी गाठूनही उपविजेतेपदावर समाधान मानले होते. १४ जुलै २०१९ हा दिवस मात्र इंग्लिश क्रिकेटसाठी अविस्मरणीय ठरला. तब्बल २७ वर्षांनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठत त्यांनी जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरले. क्रिकेट हा अनिश्‍चिततेने ठासून भरलेला खेळ आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा लॉर्ड्‌सवर आला. न्यूझीलंडने दिलेले २४२ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या तोंडी फेस आला. त्यांचे सर्व गडी २४१ धावांत बाद झाले आणि नंतर सुरू झाला सुपर ओव्हरचा थरार. एका षटकात दोन्ही संघांनी प्रत्येकी १५ धावा केल्यामुळे कोंडी कायम राहिली. मात्र, अखेरीस इंग्लंडचा संघ नशीबवान ठरला. ५० षटकांच्या सामन्यात इंग्लंडच्या खाती एकूण २२ ‘बाऊंड्री’ होत्या, तर न्यूझीलंडने १४ वेळा चेंडू सीमापार केला होता. त्यामुळे नियमानुसार जास्त चौकार मारल्यामुळे इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याच्या हाती विश्‍वकरंडक आला. त्यामुळे या संघाला अव्वल मानांकन सार्थ ठरविता आले. 

अखेर चौथ्यांदा ‘लकी’
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेस १९७५ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर २०१५ पर्यंत ऑस्ट्रेलियाने पाच वेळा, वेस्ट इंडिज व भारताने प्रत्येकी दोन वेळा, श्रीलंका, पाकिस्तानने प्रत्येकी एक वेळ जगज्जेतेपद पटकाविले. पण इंग्लंडचा संघ प्रतिष्ठेचा करंडक जिंकण्यापासून दूरच राहिला. तीन वेळा त्यांना संधी होती, पण करंडक मिरवण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. १९७९ मध्ये लॉर्ड्‌सवर त्यांना वेस्ट इंडिजने ९२ धावांनी हरविले. १९८७ मध्ये कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर इंग्लंडने ऑस्ट्रेलियास झुंजविले, परंतु सात धावांच्या फरकाने माघार घ्यावी लागली. १९९२ मध्ये मेलबर्नला जिगरबाज इम्रान खानच्या पाकिस्तानी संघासमोर इंग्लंडचे आव्हान तोकडे ठरले. २२ धावांनी त्यांना हार स्वीकारावी लागली. त्यानंतर विश्‍वकरंडकाची उपांत्य फेरी गाठणेही इंग्लंडला अवघड ठरले. यावेळीही त्यांना जगज्जेतेपदाने हुलकावणी दिली असती, पण जास्त चौकार मारल्यामुळे हा संघ ‘लकी’ ठरला. इंग्लंडमध्ये फुटबॉलच्या लोकप्रियतेसमोर तेथील क्रिकेट काही प्रमाणात मागे सरकले आहे. महिलांच्या क्रिकेटमध्ये हा देश जगज्जेता झालेला आहे, आता तेथील पुरुष क्रिकेटला विश्‍वविजेतेपदामुळे एक वेगळी दिशा गवसणार आहे. लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रतिष्ठेची ‘ॲशेस’ मालिका होणार आहे. त्यावेळी इंग्लंडच्या संघावर जास्त झोत राहील. इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना मोठे ‘स्टार’पद नाही. भारतासारखे त्यांना चाहत्यांचे फार मोठे पाठबळही नाही. तेथील काऊंटी क्रिकेटचा लौकिकही हरपला आहे. या पार्श्‍वभूमीवर २०१९ मधील विश्‍वविजेतेपद इंग्लिश क्रिकेटसाठी स्फूर्तिदायक असेल.

चढ-उताराचा प्रवास
विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंड हा परिपूर्ण संघ होता, मात्र विश्‍वकरंडक जिंकण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास चढउताराचा ठरला. स्पर्धेपूर्वी तेच संभाव्य विजेते होते. साखळी फेरीत श्रीलंका व ऑस्ट्रेलियाकडून सलग पराभव पत्करावे लागल्यामुळे इंग्रज साहेबांची गाडी गचके खाऊ लागली. शेवटच्या दोन साखळी लढतीत अनुक्रमे भारत व न्यूझीलंडला हरवून त्यांनी उपांत्य फेरी पक्की केली. अफगाणिस्तानविरुद्ध मॅंचेस्टर येथे त्यांनी ६ बाद ३९७ धावा करताना उत्तुंग टोलेबाजी केली, पण अंतिम लढतीत २४१ धावा करताना त्यांना धाप लागली. एकंदरीत, अष्टपैलू खेळाडूंच्या जोरावर इंग्लंडचा संघ जिंकला. त्यांची गोलंदाजी जास्त धारदार ठरली. ख्रिस वोक्‍स, जोफ्रा आर्चर, मार्क वूड या वेगवान गोलंदाजांनी सातत्य राखले. फिरकीपटू मोईन अलीच्या जागी स्थान मिळाल्यानंतर मध्यमगती लियाम प्लंकेटने डावातील मधल्या षटकात चोख कामगिरी बजावली. बेन स्टोक्‍सच्या मध्यमगती माऱ्यामुळे इंग्लंडपाशी अतिरिक्त गोलंदाजाचा पर्याय राहिला. फिरकीपटू आदिल रशीदने दिलेली भूमिका व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियास २२३ धावांत गुंडाळणे इंग्लंडला सोपे ठरले. फलंदाजांनी अधूनमधून दगा दिल्यामुळे इंग्लंडला साखळी फेरीत धक्के बसले. श्रीलंकेविरुद्ध २३३ धावांचा पाठलाग करताना यजमान संघ गडबडला, मात्र ते वेळीच सावरले. सलामीवीर जेसन रॉय, जॉन बेअरस्टो, ज्यो रूट, इयॉन मॉर्गन त्यांचे फलंदाजीतील आधारस्तंभ ठरले. याशिवाय जोस बटलर आणि बेन स्टोक्‍स यांच्यामुळे इंग्लंडची फलंदाजी सखोल ठरली. या बळावर संभाव्य विजेते ही ओळख त्यांनी प्रत्यक्षात आणली.

भेदक आर्चर परिणामकारक
बार्बाडोसमधील ब्रिजटाऊन येथे जन्मलेल्या जोफ्रा आर्चरची उपलब्धी इंग्लंडसाठी बोनस ठरली. त्याच्या दाहक माऱ्यामुळे त्यांची गोलंदाजी जास्तच भेदक ठरली. आर्चर सुरुवातीस इंग्लंडच्या विश्‍वकरंडक संघाच्या नियोजनात नव्हता. डेव्हिड विलीच्या जागी त्याला संधी देण्यात आली, ‘स्ट्राईक बॉलर’ हा विश्‍वास त्याने सार्थ ठरविला. त्याचे आखूड टप्प्यांचे चेंडू स्पर्धेच्या कालावधीत चर्चेचा विषय ठरले. दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला, ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्‍स केरी यांना आर्चरच्या भन्नाट गोलंदाजीने तीव्र दंश केला. अंतिम लढतीतील सुपर ओव्हरमध्ये जिमी नीशमने षटकार खेचूनही आर्चरने नंतरचे चार चेंडू टाकताना दिशा व टप्पा योग्यपणे राखला. तणावाच्या प्रसंगी तो शांत राहिला. भविष्यात तो इंग्लंडसाठी ‘मॅच विनर’ गोलंदाज ठरू शकतो. त्याची आणि ख्रिस वोक्‍सची जोडी चांगली जमली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना पहिल्या दहा षटकांत जास्त फटकेबाजी करता येत नाही.

न्यूझीलंडचे ‘बॅडलक’
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याचा शांतपणा स्पर्धेच्या कालावधीत चांगलाच भावला. सलामीच्या जोडीचे अपयश वगळता ‘ब्लॅक कॅप्स’ संघाने दणकट खेळ केला. मात्र, विश्‍वकरंडक जिंकण्यात ते अपयशी ठरले. ‘बॅडलक’ने त्यांचा लॉर्ड्‌सवर घात केला. प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २४१ ही माफक धावसंख्या उभारूनही विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील किवी संघाने परिपक्वता दाखविली. कर्णधाराने कोणताच आक्रस्ताळेपणा केला नाही. संयमाने त्याने संघाचे नेतृत्व केले. भारताविरुद्ध उपांत्य लढतीतही २३९ धावा केल्यानंतर न्यूझीलंडने कमी धावसंख्येचे यशस्वीपणे संरक्षण केले होते. इंग्लंडविरुद्ध त्यांनी जवळपास विजय मिळविला होता. शेवटच्या षटकात स्टोक्‍सच्या बॅटला लागून ओव्हर थ्रोच्या चार अतिरिक्त धावा मिळाल्यामुळे इंग्लंडला जीवदान मिळाले आणि सलग दुसऱ्यांदा न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून सात विकेट्‌सनी हार पत्करावी लागल्यामुळे ‘किवी’ संघाला विश्‍वकरंडक हुकला होता. यंदा ते स्पर्धेतील ‘डार्क हॉर्स’ होते. दमदार सुरुवातीनंतर साखळी फेरीतील उत्तरार्धात सलग पराभवानंतरही त्यांनी आत्मविश्‍वास गमावला नाही. २०१५ मधील स्पर्धेत मार्टिन गप्टिलने धावांचा रतीब टाकला होता, पण यावेळच्या स्पर्धेत तो अपयशी सलामीवीर ठरला. पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची त्याची ‘सवय’ न्यूझीलंडसाठी घातक ठरली. मजबूत सलामी न मिळाल्यामुळे न्यूझीलंडला नंतर धावांसाठी झगडावे लागले. मध्यफळीत विल्यम्सन आणि अनुभवी रॉस टेलर यांच्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजीस स्थिरता लाभली. ५७८ धावा करणारा विल्यम्सन स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. दाहक गोलंदाजी न्यूझीलंडसाठी वरदान ठरली. ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन यांनी इंग्लिश वातावरणाचा चांगला लाभ घेतला. जिमी नीशम आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांची मध्यमगतीही उल्लेखनीय ठरली, तर मिचेल सॅंटनरने फिरकी गोलंदाजाची जबाबदारी चोख निभावली. मॅट हेन्री दोन वेळा सामन्याचा मानकरी ठरला. 

गोंधळलेली ‘टीम इंडिया’
साखळी फेरीत नऊपैकी सात सामने जिंकून अव्वल स्थान मिळविलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बाद फेरीत ढेपाळला. भारताने उपांत्य फेरी गाठली, तरीही हा संघ असमतोल ठरला. कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री स्पर्धेच्या कालावधीत गोंधळलेल्या अवस्थेतच दिसले. त्यास निवड समितीच्या अपरिपक्वेतेचीही साथ लाभली. समतोल संघ मैदानात उतरविणे त्यांना शेवटपर्यंत शक्‍य झाले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकानंतर सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाला. त्याच्या जागी यष्टिरक्षक व मधल्या फळीत खेळणाऱ्या ऋषभ पंतला इंग्लंडला पाठविण्यात आले. मध्यफळीतील विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर सलामीच्या नवोदित मयांक अगरवाल याची निवड झाली. चौथ्या क्रमांकावरील फलंदाज कोण याचे उत्तर शेवटपर्यंत गवसले नाही. विजय शंकर, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या आदींचा या क्रमांकासाठी प्रयोग झाला, दुर्दैवाने सारे नापास ठरले. उपांत्य लढतीत धोनीची चौथ्या क्रमांकावर आवश्‍यकता होती. रोहित शर्मा आणि विराट हे हुकमी फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर डावाला स्थैर्य देणारा फलंदाज हवा होता. एक बाजू लावून धरत संथपणे खेळणाऱ्या धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठविण्याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापनाला सुचला नाही. डावखुऱ्या रवींद्र जडेजाने झुंजार फलंदाजी करत नंतर धोनीसह किल्ला लढविला, परंतु न्यूझीलंडविरुद्धची उपांत्य लढत हातून निसटली. जडेजाला खेळविण्यास संघ व्यवस्थापन सुरुवातीस तयार नव्हते, मात्र भरवसा असलेला कुलदीप यादव निष्प्रभ ठरल्यानंतर अखेर जडेजास खेळविण्यात आले. बदली खेळाडू या नात्याने त्याची मैदानावरील चपळता जास्त काळ लपवून ठेवणे शक्‍य नसल्यामुळे हा अष्टपैलू संघात आला. रोहित आणि विराट वजा करता भारतीय फलंदाजी साफ लंगडी ठरली. रोहितने स्पर्धेत पाच शतके ठोकून नवा उच्चांक रचला. त्याने ६४८ धावांचा पाऊस पाडला, परंतु महत्त्वाच्या उपांत्य लढतीत त्याला, तसेच विराटला न्यूझीलंडच्या दाहक गोलंदाजीस तोंड देता आले नाही. लोकेश राहुलला सलामीस फार मोठी संधी होती, परंतु त्याने निराशा केली. अपवाद फक्त लिड्‌सवर श्रीलंकेविरुद्ध केलेल्या शतकी खेळीचा, त्यात लंकेच्या कमजोर गोलंदाजीचाही वाटा होता याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारताच्या स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेता, केवळ गोलंदाजांच्या स्पृहणीय कामगिरीमुळेच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली. छान मारा केलेला वेगवान जसप्रीत बुमरा लौकिकास जागला. त्याने, तसेच महंमद शमी यांनी परिस्थितीनुरूप मारा केल्यामुळे भारताला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाची नामुष्की टाळता आली. थोडक्‍यात, भारतीय संघ विश्‍वकरंडकासाठी दावेदार असल्याचे वाटलेच नाही.

विजयाचा शिल्पकार स्टोक्‍स
विजयाचा शिल्पकार ठरला तो अष्टपैलू बेन स्टोक्‍स. अंतिम लढतीत डावाच्या मध्यास इंग्लंडची दमछाक झालेली असताना डावखुरा स्टोक्‍स धैर्याने लढला. त्याच्या नाबाद ८४ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडला सामना टाय करता आला. स्टोक्‍स हा मूळचा न्यूझीलंडचा. या अष्टपैलू खेळाडूचा जन्म न्यूझीलंडमधील कॅंटरबरी येथे झाला. मात्र, त्याचे क्रिकेट इंग्लंडमध्ये बहरले. स्टोक्‍सच्या अष्टपैलूत्वामुळे इंग्लंडला विश्‍वकरंडक स्पर्धेत फलंदाजीत वेळोवेळी सावरता आले. भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात जिंकल्यामुळे इंग्लंडला उपांत्य फेरीचे द्वार खुले झाले. एजबॅस्टनमधील त्या लढतीत स्टोक्‍सच्या जबरदस्त ७९ धावांमुळे संघाला ३३७ धावा करता आल्या. भारताला ३०६ धावांचीच मजल मारता आली. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत ८९ धावा करूनही स्टोक्‍सला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकता आला नव्हता. साखळी फेरीतील पराभवाचा बदला इंग्लंडने उपांत्य लढतीत घेताना ऑस्ट्रेलियास आठ गडी राखून सहजपणे हरविले. स्टोक्‍स अंतिम लढतीत जिद्दीने लढला. जोस बटलरच्या साथीत त्याने किल्ला लढविला, त्यामुळे न्यूझीलंडला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अयोग्य वर्तणुकीमुळे स्टोक्‍सवर चिखल उडाला होता, तो आता विश्‍वविजयी कामगिरीने धुतला गेलाय. शिवाय दोन वर्षांपूर्वी टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत विजेतेपद मिळविले होते, तेव्हा स्टोक्‍सला जास्त ‘मारहाण’ झाली होती. त्या अपयशावर आता स्टोक्‍सने मलमपट्टी केली आहे.

इंग्लंडची स्पर्धेतील वाटचाल
विरुद्ध दक्षिण आफ्रिका (लंडन) : १०४ धावांनी विजयी
विरुद्ध पाकिस्तान (नॉटिंगहॅम) : १४ धावांनी पराभूत
विरुद्ध बांगलादेश (कार्डिफ) : १०६ धावांनी विजयी
विरुद्ध वेस्ट इंडीज (साऊदॅम्प्टन) : ८ विकेट्‌सनी विजयी
विरुद्ध अफगाणिस्तान (मॅंचेस्टर) : १५० धावांनी विजयी
विरुद्ध श्रीलंका (लीड्‌स) : २० धावांनी पराभूत
विरुद्ध ऑस्ट्रेलिया(लॉर्ड्‌स) : ६४ धावांनी पराभव
विरुद्ध भारत (बर्मिंगहॅम) : ३१ धावांनी विजयी
विरुद्ध न्यूझीलंड (चेस्टर-ली-स्ट्रीट) : ११९ धावांनी विजयी
उपांत्य लढत : विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन) ः ८ विकेट्‌सनी विजयी
अंतिम लढत : विरुद्ध न्यूझीलंड (लॉर्ड्‌स) ः सामना व सुपर ओव्हरमध्ये टाय, जास्त ‘बाऊंड्री’मुळे विजयी

संबंधित बातम्या