‘ढिंग एक्‍स्प्रेस’ हिमा

किशोर पेटकर
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

क्रीडांगण
 

आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोवळी हिमा दास पुढे सरसावली. ॲथलेटिक्‍समधील आपल्या कमाईचा हिस्सा तिने पूरग्रस्तांच्या मदतनिधीस दान केला. या मुलीचे वय फक्त १९ वर्षे आहे. लहान वयातील तिची प्रगल्भता कौतुकास पात्र ठरली. तिच्या दानशूरपणाची चर्चा सुरू असताना या ‘गोल्डन गर्ल’ने युरोपातील मैदाने गाजविली. २० दिवसांच्या कालावधीत झालेल्या पाच स्पर्धांत पाच सुवर्णपदके जिंकणारी ही मुलगी देशात ‘सिलेब्रिटी’ झाली आहे. राष्ट्रपतींपासून साऱ्यांनीच या जिद्दी मुलीचे कौतुक केले, तिची पाठ थोपटली. देश तिच्याकडे ऑलिंपिकमधील आशास्थान या नजरेने पाहत आहे. आसाममधील नागाव जिल्ह्यातील ढिंग शहरानजीकचे कांढुलीमारी हे हिमा दासचे गाव. जागतिक ट्रॅकवर धावताना यशाला गवसणी घालत हिमा ‘ढिंग एक्‍स्प्रेस’ बनली आहे. जागतिक पातळीवर सफल धाव घेतल्यामुळे या मुलीचा ब्रॅंड व्हॅल्यू सध्या कमालीचा वधारला आहे. काही महिन्यांपूर्वी एका करारासाठी ३० ते ३५ लाख रुपये मिळत असत, पण ही रक्कम आता ६० लाख रुपयांवर गेली आहे. तिची गुणवत्ता आणि कामगिरी बोलकी आहे. त्यामुळेच नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीस तिने आकृष्ट केले आहे. यशस्वी कारकिर्दीमुळे पैसा आला, मात्र हिमाचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. यश तिच्या डोक्‍यात भिनलेले नाही. परिस्थितीची तिला जाणीव आहे, म्हणूनच आपल्या राज्यातील पूरग्रस्तांना तिने सढळहाताने मदत केली आहे. आसाममध्ये पुराचे थैमान सुरू असताना हिमा युरोपातील धावण्याचे ट्रॅक गाजवत होती. आपल्या राज्याला वेढलेल्या पाण्यामुळे ती चिंतित होती. दोन-तीन वर्षांपूर्वी ही सर्वसामान्य मुलगी आंतरराष्ट्रीय मैदानापासून कोसो दूर होती. बाहेरच्या जगाशी जास्त संपर्कच नव्हता. अफाट प्रतिभेच्या जोरावर हिमाने उत्तुंग झेप घेत, देश, राज्याबरोबर आपल्या गावालाही कीर्ती प्राप्त करून दिली आहे. तिला इंग्लिश येत नाही, मात्र परदेशात धावताना ती डगमगली नाही. आसामी भाषा बोलणारी आणि कच्चं हिंदी बोलणारी ही मुलगी अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर देशात ‘सुपरस्टार’ झाली आहे. तिला मानाचा सलाम करायलाच हवा.

शेतात पाहिले स्वप्न
 नागाव जिल्ह्यातील ढिंग गावातील बहुतेक जण शेतकरीच आहेत. हिमाचे वडील रणजित दास यांचीसुद्धा शेती आहे. ते मोठे शेतकरी नसले, तरी कुटुंब चालविण्याइतपत सुबत्ता रणजित यांच्यापाशी आहे. त्यांना पाच मुले. त्यात हिमा ही सर्वांत लहान, अतिशय धडपडी. लहानपणापासून वडिलांना शेतकामात मदत करण्यात हिमा अग्रेसर असायची. बहुतांश वेळ शेतात आणि खेळण्या-बागडण्यातच जात असे. पालकांनीही कधी तिला नाउमेद केले नाही. मुलीच्या उत्साही वृत्तीस खतपाणी घातले. शेतात काम करत असतानाच हिमाने मोठी भरारी घेण्याचे स्वप्न पाहिले. परिश्रमाची सवय असल्यामुळे शरीरही तंदुरुस्त आणि सुदृढ झाले. नवीन गोष्टी शिकणे आणि कृती प्रत्यक्षात आणणे तिला आवडायचे. शेतात वडिलांबरोबर सावलीप्रमाणे वावरणारी हिमा मागे हटली नाही. दहावीत असताना ती शेतात ट्रॅक्‍टर चालवायला लागली. त्यापूर्वी ती नांगरही मोठ्या धिटाईने फिरवत असे. ॲथलेटिक्‍समधील कारकिर्दीबरोबरच तिने शिक्षणालाही दिशा दिली. यावर्षी मेमध्ये हिमा बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली.

धाडसी मुलगी!
 हिमा नेहमीच अन्यायाचा तीव्र तिरस्कार करते. तिला सामाजिक बांधिलकीची जाणीवही आहे. क्रीडापटू असली, तरी ती हाडाची कार्यकर्ती आहे. ढिंग गावातील दारूच्या गुत्त्यांमुळे पुरुष मंडळींची पावले शेताऐवजी भलतीकडेच वळू लागलीत हे पाहून हिमाला चीड आली. ती तेव्हा विद्यार्थिदशेत होती. मोठ्या धैर्याने तिने दारुबंदीविरुद्ध लढा पुकारला. या कामात तिला गावातील अन्य महिलांचीही साथ लाभली. देशी दारूची दुकाने बंद पाडण्याच्या मोहिमेत ती अग्रभागी राहिली आणि त्यात यशस्वीही ठरली. हे सत्कार्य पूर्णत्वास नेताना ती अजिबात डगमगली नाही. आंतरराष्ट्रीय यश मिळाले, पण तिच्यापाशी अहंभाव नाही. सततच्या स्पर्धा, गुवाहाटी-कोलकत्यातील सराव, राष्ट्रीय शिबिरे यामुळे तिला गावात वारंवार जाता येत नाही. ढिंगमध्ये येण्याचा योग येतो, तेव्हा ती गावात रमते. तेथील संस्कृतीशी एकरूप होते. जेवणात भातावर यथेच्छ ताव मारते.

कारकिर्दीत ‘टर्निंग पॉइंट’
 हिमा शाळेत असताना मुलांसमवेत फुटबॉल खेळायची. ती तरबेज ‘स्ट्रायकर’ होती. वडील रणजितही फुटबॉल खेळायचे. ती अपघातानेच धावपटू झाली. फुटबॉल खेळत असताना हिमा खूप वेगाने धावायची. तिला रोखणे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना कठीणच ठरायचे. फुटबॉलमधील धावण्याचा वेग पाहून शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी हिमाला धावपटू होण्याचे सुचविले. देशात फुटबॉलमध्ये महिलांना मोठा वाव नाही ही बाब हिमानेही जाणली. फुटबॉल मैदानापेक्षा धावण्याच्या ट्रॅकवर नशीब आजमावूया या विचाराने तिने वाट बदलली आणि देशाला एक वेगवान धावपटू गवसली. फुटबॉलमधून ॲथलेटिक्‍समध्ये आल्यानंतर या जिगरबाज मुलीने अवघ्या दोन वर्षांतच जागतिक सुवर्णपदक जिंकून राष्ट्रध्वज दिमाखात फडकाविला. प्रारंभी १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत वेगाने धावणारी हिमा ४०० मीटर अंतरही तेवढ्याच चपळतेने पार करते. निपॉन दास यांच्या रूपाने हिमाला किमयागार ‘गुरू’ लाभले आहेत. ग्रामीण आणि कच्च्या गुणवत्तेवर सुरेख पैलू पाडण्याचे काम निपॉन यांनी यशस्वीपणे केले. ॲथलेटिक्‍समधील चांगल्या सुविधा आणि प्रतिथयश प्रशिक्षणासाठी हिमाला गाव सोडावे लागले. वय लहान होते, पण आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने आव्हान स्वीकारले. पालकांचा मुलीवर पूर्ण विश्‍वास होता. हिमा गुवाहाटीत आली. तेथील सारुसाजाई क्रीडा संकुलात तिचे प्रशिक्षण सुरू झाले, तेव्हा हिमा साधारणतः १६ वर्षांची होती. कुटुंबीयांपासून दूर राहत ती आणखीनच कणखर आणि प्रगल्भ झाली. 

जागतिक सुवर्णपदक!
 बाहेरचे जग विशेष न पाहिलेल्या हिमाने गतवर्षी पराक्रमी कामगिरी केली. फिनलंडमध्ये झालेल्या २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत हिमाने मुलींच्या ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. ती प्रकाशझोतात आली. भारतीयांना तिचे नाव माहीत झाले. जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत पदके जिंकणारे मोजकेच भारतीय आहे. हिमासह मोजून सहा जण, तर जागतिक धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण जिंकणारी हिमा पहिलीच भारतीय आहे. ॲथलेटिक्‍समध्ये आल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत हिमाने साधलेली प्रगती अनन्यसाधारण ठरली. यावरून तिचा दृढनिश्‍चय लक्षात येतो. फक्त सुसाट वेगाने धावायचे हे तिचे लक्ष्य असते. आसामसाठीही हिमाची धाव भूषणावह ठरली आहे. १९६६ मध्ये बॅंकॉक आशियायी स्पर्धेत भोगेश्‍वर बरुआ यांनी ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २०१८ मध्ये हिमाने सोनेरी धाव घेत आसामचा लौकिक वाढविला. ती आता आसामची ‘सदिच्छादूत’ आहे. गतवर्षी ती अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित झाली. २०१७ मध्ये हिमा जागतिक युवा स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत धावली होती, तेव्हा तिला पाचवा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर तिने ४०० मीटर शर्यतीवर लक्ष केंद्रित करत जागतिक विजेती होण्याइतपत भरारी घेतली. गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत तिला विशेष पराक्रम बजावता आला नाही, मात्र जाकार्ता येथील आशियायी क्रीडा स्पर्धेत तिने चुणूक दाखवत गळ्यात पदके मिरविली.
डोळ्यांत अश्रू...
 हिमा आज ‘स्टार’ असली, तरी काही महिन्यांपूर्वी तिला निराशेचा सामना करावा लागला होता. या जिगरबाज मुलीस दुखापतीचा धक्का सहन करावा लागला होता. यावर्षी एप्रिलमध्ये दोहा येथे झालेल्या आशियायी अजिंक्‍यपद स्पर्धेत हिमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. ४०० मीटर शर्यतीत पाठदुखीमुळे तिचा घात झाला. पदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले, तेव्हा चेहऱ्यावरील निराशा लपवत असताना तिच्या डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. त्या घटनेनंतर हिमा खचली नाही, उलट त्वेषाने तिने स्वत:ला सरावात जुंपून घेतले. त्याचे यशस्वी निकाल आता पाहायला मिळत आहेत. युरोप दौऱ्यात २०० मीटरमधील चार शर्यतीत आणि ४०० मीटरमधील एका शर्यतीत ती अव्वल ठरली. अपयशावर मात करणे हे मोठे आव्हान असते. येथे विजेत्यांना मान मिळतो, पराभूतांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे हिमासाठी आशियायी स्पर्धेतील अपयशानंतरचा कालखंड ‘नाजूक’ होता. प्रशिक्षकांचा तिच्यावर विश्‍वास होता. उपजत गुणवत्ता होतीच. हिमाच्या आत्मविश्‍वासाला तडा न देता तिची कारकीर्द पुन्हा योग्य ट्रॅकवर आली आहे.    

संबंधित बातम्या