अजाणतेपणा की निष्काळजीपणा?

किशोर पेटकर
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

क्रीडांगण
 

काही बाबी आपणास माहीत असतात, पण अजाणतेपणाचा आव आणत चुकीचे कृत्य केले जाते. प्रकरण अंगाशी आले, की कबुलीसह माफी मागितली जाते. भारतीय क्रिकेटमध्ये नुकतीच एक घटना उघडकीस आली. भारताचा युवा कसोटीपटू पृथ्वी शॉ याने प्रतिबंधक द्रव्य असलेले औषध सेवन केले. त्याच्या मूत्राची चाचणी झाली, तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उत्तेजक प्रतिबंधक समितीने त्याला दोषी ठरविले. कसोटी पदार्पणात शतकी खेळी केलेल्या मुंबईच्या या १९ वर्षीय शैलीदार फलंदाजावर आठ महिन्यांची बंदी आली. त्यामुळे तो आता १५ नोव्हेंबरपर्यंत स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असेल. या कालावधीत पृथ्वीला देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेतील सर्व सामने, तसेच एस. मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील काही सामन्यांना मुकावे लागेल. उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत पृथ्वीच्या शरीरात बंदी असलेल्या ‘टर्ब्यूटलाईन’ या प्रतिबंधक द्रव्याचा अंश सापडला. अजाणतेपणी आपण या द्रव्याचे औषधाच्या माध्यमातून सेवन केल्याची कबुली पृथ्वीने ‘बीसीसीआय’ला दिली. पृथ्वीचे लहान वय लक्षात घेत ‘बीसीसीआय’ने हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळण्यावर भर दिला. त्यांनी पृथ्वीचा खुलासा मान्य करून निलंबन आठ महिन्यांपुरते मर्यादित ठेवले. 

गंभीर निष्काळजीपणा
 यावर्षी फेब्रुवारीत मध्यप्रदेशमधील इंदूर येथे एस. मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत मुंबईच्या संघातून पृथ्वी खेळत होता. त्यावेळी सर्दीमुळे तो बेजार होता, तसेच खोकलाही त्याला सतावत होता. त्यातून लवकर बरे होण्यासाठी त्याने वडिलांच्या सांगण्यावरून औषधालयातून औषध विकत घेऊन सेवन केले. २२ फेब्रुवारी रोजी त्याचे मूत्र तपासणीसाठी नेण्यात आले. औषधातील प्रतिबंधक द्रव्य त्याच्या मूत्राच्या नमुन्यात सापडले. सारे प्रकरण लक्षात घेता, पृथ्वी पूर्णतः निष्पाप आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण ‘बीसीसीआय’ची उत्तेजक प्रतिबंधक समिती वारंवार क्रिकेटपटूंना प्रतिबंधक द्रव्याबाबत सूचना करत असते. कोणत्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोणते नाहीत याचे मार्गदर्शन वारंवार केले जाते. प्रत्येक मोसमाच्या प्रारंभी सर्व संघटनांना प्रतिबंधक औषधे, योग्य औषधे, योग्य आहार आणि तत्सम बाबींविषयक यादी पाठविली जाते. संबंधित संघांच्या फिजिओथेरपिस्ट, तसेच खेळाडूंसाठी कार्यशाळा घेतल्या जातात. स्पर्धा सुरू असताना किंवा सरावाच्या कालखंडात सारे खेळाडू फिजिओंच्या सल्ल्यानुसारच औषधे घेतात, उपचार पद्धतींना सामोरे जातात. मुंबईच्या संघासमवेत ‘बीसीसीआय’च्या तत्त्वप्रणालीची माहिती असलेला फिजिओथेरेपिस्ट होता. परंतु, पृथ्वीने त्याच्या सल्ल्यानुसार औषध घेण्याऐवजी वडिलांनी सुचविलेले औषध घेतले. नेमके कोणते औषध घ्यावे याची माहिती फिजिओंना असते. पृथ्वीचे वडील त्याबाबत पूर्णतः अनभिज्ञ होते. एकंदरीत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या पृथ्वीचा हा गंभीर निष्काळजीपणा आहे. 

सुधारण्यास वाव
 ‘बीसीसीआय’ने उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी केलेली कारवाई पाहता, पृथ्वी मोठ्या शिक्षेपासून बचावला आहे. त्याचे वय लक्षात घेऊन, ‘बीसीसीआय’ने ताकीद देत पृथ्वीवर १६ मार्च २०१९ या मागील तारखेपासून बंदी लादली. पृथ्वीची क्रिकेट गुणवत्ता लक्षात घेता, मोठी शिक्षा झाली असती, तर त्याच्या कारकिर्दीवर प्रतिकूल परिणाम झाला असता. औषधातून शरीरात उत्तेजक द्रव्य क्रीडापटूंच्या शरीरात सापडल्याची यापूर्वीची उदाहरणे आहेत. औषधे दोन प्रकारची असतात. काहींत प्रतिबंधित उत्तेजक द्रव्याचा अजिबात समावेश नसतो. क्रीडापटूंनी हेच औषध घ्यायचे असते, तरीही खेळाडू बोध घेत नसल्याचे दिसून येत आहे. खरे म्हणजे उत्तेजकांबाबत जागरूक राहणे ही खेळाडूंचीही जबाबदारी असते. उत्तेजकांबाबत त्यांना वेळोवेळी ‘शिक्षण’ दिले जाते. मान्यताप्राप्त फिजिओ संघासमवेत असतो, तरीही क्रीडापटू अतिशहाणपणा करतात आणि लांच्छन ओढवून घेतात. त्यामुळे खेळाडूच्या प्रतिभेवर काळा डाग लागतो. पृथ्वीला आता सुधारण्यास वाव आहे. वेळीच वर्तन सुधारून खेळावर लक्ष केंद्रित केल्यास त्याचाच फायदा होईल. यश डोक्यात भिनल्यामुळे क्रीडा मैदानावरील कारकीर्द उन्मळून पडल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. 

संबंधित बातम्या