बर्नालने संधी साधली 

किशोर पेटकर
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

क्रीडांगण
 

टूर द फ्रान्स ही जागतिक सायकलिंगमधील सर्वांत अवघड आणि कस लावणारी शर्यत आहे. आल्प्स पर्वतातून जाणाऱ्या या शर्यतीत सायकलपटूंना कमालीच्या एकाग्रतेने आणि जिद्दीने सायकलिंग करावे लागते. यंदाच्या टूर द फ्रान्स शर्यतीत नवा विजेता ठरला, जो स्पर्धेच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत कमी वयाचा चँपियन झाला. टूर द फ्रान्स शर्यतीचा विजेता या नात्याने त्याने ‘यलो जर्सी’ कायम राखली, तेव्हा एगान बर्नाल हा २२ वर्षे आणि १९६ दिवसांचा होता. तो १९०९ नंतरचा सर्वांत युवा ‘विनर’ ठरला. बर्नाल हा कोलंबियातील आहे. दक्षिण अमेरिकेतील एखाद्या सायकलपटूने प्रतिष्ठेचा टूर द फ्रान्स किताब जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरे म्हणजे, बर्नाल याला यंदा योगायोगानेच संधी मिळाली. ‘इनिओस’ संघात (पूर्वीचा स्काय संघ) कोलंबियन सायकलपटू तिसऱ्या क्रमांकावर होता. गतवर्षीच्या टूर द फ्रान्स शर्यतीत तो जेरांयट थॉमस व केनियात जन्मलेला ख्रिस फ्रूम या ब्रिटिश सायकलपटूंचा साहाय्यक होता. तेव्हा बर्नाल थॉमस व फ्रूम यांच्यासाठी ‘डॉमेस्टिक’ (जिंकण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्य संघ सहकाऱ्यांना मदत करणारा) या नात्याने शर्यतीत भाग घेतला होता. यंदा चार वेळचा विजेता फ्रूम जायबंदी झाला आणि बर्नालला मोठी संधी लाभली. थॉमसच्या साथीत तो ‘इनिओस’ संघाचा शर्यतीतील मुख्य सायकलपटू झाला. जिगरबाज बर्नालने संधीचे सोने करत टूर द फ्रान्स किताब जिंकताना, इनिओस संघाचे वर्चस्वही अबाधित राखले. थॉमस हा तीन वेळचा माजी विजेता, यंदा त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 

खडतर शर्यत
 एकूण २१ टप्प्यातील टूर द फ्रान्स शर्यतीत बर्नालने खडतर मार्ग कापला. आल्प्सच्या पर्वत रांगांतून सायकलिंग करताना त्याने ज्युनिअर गटातील ‘माऊंटन बाईकिंग’मधील अनुभवास प्राधान्य दिले. सुमारे ३,३६५ किलोमीटर अंतराची शर्यत संपली आणि बर्नालचे अव्वल स्थान कायम राहिले. १९ व्या टप्प्यात त्याने ‘यलो जर्सी’ प्राप्त केली, ती विसाव्या टप्प्यातील आणखी एका पर्वत मोहिमेनंतरही कायम राखली. पॅरिसमधील चँप्स एलिसीस टप्प्यात बर्नालचे मोठ्या दणक्यात स्वागत झाले. ‘‘हा केवळ माझा विजय नाही, तर संपूर्ण देशाचा आहे,’’ असे सांगत त्याने यशस्वी कामगिरी कोलंबियन देशवासीयांना अर्पित केली. फ्रूम शर्यतीत असता, तर कदाचित बर्नालला जल्लोष करण्याची संधी लाभलीही नसती. फ्रूम आणि थॉमस या दिग्गज सायकलपटूंच्या सावलीत बर्नालने आता स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. त्याने गतवर्षी इनिओस संघाशी पाच वर्षांचा मोठा करार केला. गतवर्षीच्या टूर द फ्रान्स शर्यतीत युवा ‘बाईकर’ या नात्याने त्याने चमक दाखविली होती. टूर द फ्रान्स शर्यतीत सातत्य राखणे जिकिरीचे असते. कमालीची तंदुरुस्ती आणि स्टॅमिना महत्त्वपूर्ण ठरतो. यंदा विजेतेपदासह बर्नालने अपेक्षा उंचावल्या आहेत, पुढील वर्षी त्याच्याकडून जास्त अपेक्षा असतील. 

पाचव्या वर्षी चालवली सायकल 
 कोलंबियातील बोगोटा येथे जन्मलेल्या एगान बर्नाल याची कौटुंबिक परिस्थिती मध्यमवर्गीय. त्याचे वडील स्थानिक पातळीवरील शर्यतीतील हौशी सायकलपटू होते. ‘सेकंड हँड’ सायकल घेऊन वयाच्या पाचव्या वर्षी एगान सायकल चालवण्यास शिकला. वयाच्या नवव्या वर्षी त्याने बोगोटा येथे पहिली सायकल शर्यत जिंकली. सुरुवातीस त्याच्या कारकिर्दीवर वडील नाखूष होते, पण नंतर मुलाची गुणवत्ता पाहून त्यांनी परवानगी दिली. एगान अगोदर ‘रोड रेस’मध्ये भाग घेत नव्हता, त्याचा भर पर्वतावरील (माऊंटन रेसिंग) शर्यतीत असायचा. ब्राझील, कॉस्टारिका, अमेरिकेतील माऊंटर बाईकिंग शर्यतीत त्याने यश मिळविले. त्यानंतर त्याने युरोपकडे मोर्चा वळविला. इटलीतील ‘रोड रेस’ शर्यतीत त्याने यश संपादन केले. २०१६-१७ च्या मोसमात त्याने व्यावसायिक सायकलपटू या नात्याने पदार्पण केले.

संबंधित बातम्या