बॅडमिंटन दुहेरीतील ऐतिहासिक यश

किशोर पेटकर
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

क्रीडांगण
 

मुंबईचा चिराग शेट्टी आणि आंध्रप्रदेशमधील अमलापूरम येथील सात्विकसाईराज रंकीरेड्डी या दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या, बॅडमिंटन कोर्टवर दुहेरीत खेळताना त्यांचे साथीदारही वेगळे होते. हैदराबाद येथील पुल्लेला गोपीचंद अकादमीतील तेलगू भाषिक मित्रांमध्ये रमणाऱ्या सात्विकसाईराज याची वेगळ्या विश्वात रममाण होणाऱ्या चिरागशी बॅडमिंटन कोर्टवर जोडी अनपेक्षितपणेच जमली. भारतीय बॅडमिंटनमध्ये मार्गदर्शक असलेले मलेशियातील निष्णात दुहेरी प्रशिक्षक टॅन किम हेर यांना चिराग व सात्विकसाईराज यांच्यातील खेळात वेगळीच चमक दिसली. ‘हे दोघेही एकत्रित खेळले, तर त्यांच्यात सनसनाटी कामगिरी करण्याची क्षमता निश्चितच आहे’ असे मलेशियन मार्गदर्शकांना वाटले. त्यांनी ही योजना प्रत्यक्षात आणताना सुमारे तीन वर्षांपूर्वी उंचपुऱ्या चिराग व सात्विकसाईराज यांची जोडी जमविली... आणि हा निर्णय ‘मास्टरस्ट्रोक’ ठरला. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी त्यांनी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नवा इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या सुपर ५०० दर्जाची स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन जोडी हा मान चिराग व सात्विकसाईराज यांनी मिळविला. यापूर्वी सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा भारतीयांनी जिंकलेल्या आहेत, पण ते सारे विजेते एकेरीतील होते. साई प्रणीत, किदांबी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी सुपर सिरीज स्पर्धांतील एकेरीत विजयी पताका फडकावलेली आहे, आता दुहेरीतही भारतीय जोड्या जिंकू शकतात हे चिराग व सात्विकसाईराज या जोडीने सिद्ध केले आहे. ही जोडी आता जागतिक दुहेरी मानांकनात ‘टॉप टेन’मध्ये आली आहे. 

दिग्गजांना पाजले पाणी 
ली जून हुई आणि लियू यू चेन ही चीनची पुरुष दुहेरी जोडी जागतिक विजेती आहे. त्यांचा दबदबा आहे, मात्र बँकॉकमध्ये चिराग व सात्विकसाईराज यांनी दिग्गज जोडीचे अजिबात दडपण घेतले नाही. या युवा भारतीय जोडीने चीनी खेळाडूंची चांगलीच दमछाक करत विजेतेपदास गवसणी घातली. कमालीची एकाग्रता आणि निर्णायक गुण वसूल करणारे समयोचित फटके या बळावर भारतीय जोडीने बाजी मारली. त्यापूर्वी उपांत्य फेरीत त्यांनी आणखी एका नावाजलेल्या दक्षिण कोरियन को सुंग-ह्यून व शिन बाएक-चेओल जोडीस पाणी पाजले होते. थायलंड ओपन स्पर्धेत चिराग व सात्विकसाईराज यांच्या खेळात अफलातून वेग, ताकद, कौशल्य यांचा सुरेख समन्वय साधला गेला. गतवर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत रौप्यपदक मिळविले. मात्र, आशियायी क्रीडा स्पर्धेत त्यांचे आव्हान दुसऱ्याच फेरीत आटोपले होते. त्या अपयशानंतर चिराग व सात्विकसाईराज यांनी निराशा झटकून नव्याने तयारीवर भर दिला. बँकॉकमधील यशस्वी कामगिरीनंतर आता त्यांना टोकियो ऑलिंपिक खुणावू लागलेय. 

दुहेरीत परिपक्व 
चिरागला एकेरीतील बॅडमिंटनपटू व्हायचे होते, पण गोरेगाव क्रीडा संकुलात उदय पवार यांना या मुलात दुहेरीतील गुणवत्ता दिसली. उदय हे भारताचे दुहेरी बॅडमिंटनमधील माजी निष्णात खेळाडू आहेत. वयाच्या सातव्या वर्षापासून चिरागला उदय यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी प्रशिक्षकांचा सल्ला आज्ञाधारकपणे मानत चिरागने दुहेरीवरच लक्ष केंद्रित केले. सात्विकसाईराज याचे वडील बॅडमिंटनमधील पंच होते, तसेच व्हॉलिबॉलही खेळायचे. व्हॉलिबॉलपटू उडी घेत मारत असलेल्या स्मॅश फटक्यांनी लहानग्या सात्विकसाईराजवर गारूड केले. त्याने हा फटका आपल्या बॅडमिंटन शैलीस जोडून घेतला. हाच फटका बॅडमिंटन कोर्टवर त्याच्या भात्यातील सामर्थ्यवान अस्त्र आहे. २२ वर्षीय चिराग आपल्या दुहेरीतील साथीदारापेक्षा वयाने मोठा आहे. सात्विकसाईराज १३ ऑगस्टला १८ वा वाढदिवस साजरा करेल. वयात किंचित फरक असला, तरी बॅडमिंटन कोर्टवरील त्यांच्यातील समन्वय पराकोटीचा असतो. दुहेरीत एकत्रित खेळण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी परिपक्वता दाखविली आहे. सहा फूट उंचीचा सात्विकसाईराज याचे स्मॅश फटके भेदक असतात, त्याच्या स्मॅश फटक्यांचा वेग प्रतिताशी ४०० किलोमीटर इतका असतो. त्यामुळे चिरागने नेटजवळ खेळण्यास प्राधान्य दिले. आक्रमक खेळ हे या जोडीचे वैशिष्‍ट्य आहे. 

संबंधित बातम्या