‘ग्रँडमास्टर’ प्रिथू 

किशोर पेटकर
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

क्रीडांगण
 

दिल्लीचा प्रिथू गुप्ता हा १५ वर्षांचा मुलगा भारताचा बुद्धिबळातील ६४ वा ग्रँडमास्टर झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, बुद्धिबळ खेळण्यास उशिरा सुरुवात करूनही त्याने हा खेळ खूपच लवकर आत्मसात केला. त्यात प्रावीण्य संपादन केले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात प्रिथूने दोन वर्षांच्या कालावधीत डोळे दीपवणारी प्रगती साधली आहे. गेल्या वर्षी त्याने इंटरनॅशनल मास्टर (आयएम) किताब मिळविला, त्यानंतर वर्षभरातच ग्रँडमास्टर होण्यापर्यंत मजल मारली. भारतात सध्या लहान वयातच मुले बुद्धिबळ खेळतात, त्यात स्पर्धात्मकता असते. त्यामुळे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाला सात वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा घ्यावी लागते. प्रिथूने उशिराच बुद्धिबळातील प्यादी हाती घेतली. नवव्या वर्षी त्याने हा ‘६४ घरांचा’ खेळ खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर १४ व्या वाढदिवसापूर्वीच त्याने ‘आयएम’ किताब मिळवून कुशाग्र बुद्धी प्रदर्शित केली. नवी दिल्लीतील वसंत विहार येथील मॉडर्न स्कूलमध्ये प्रिथूने बुद्धिबळ गांभीर्याने घेतले. तो सुरुवातीला खेळत असताना, मोठी मजल मारेल असे कुणालाच वाटले नव्हते. चार वर्षांपूर्वी दिल्लीतील बुद्धिबळ स्पर्धेत ११ वर्षांखालील गटात विजेतेपदाचा करंडक उंचावल्यानंतर प्रिथूचा आत्मविश्वास बळावला. आपण ‘चँपियन’ होऊ शकतो हा आत्मविश्‍वास त्याला गवसला. १५ वर्षे, ४ महिने आणि १० दिवसांचा असताना ‘ग्रँडमास्टर’ होण्याची त्याची स्वप्नपूर्ती झाली. 

सफल कामगिरी 
प्रिथूने २०१८ मध्ये ‘आयएम’ किताब मिळविल्यानंतर, त्याच वर्षी ग्रँडमास्टर किताबाचे दोन नॉर्म मिळविले. परदेशात स्पर्धा खेळल्याचा फायदा त्याला झाला. गतवर्षी युरोपातील सहा स्पर्धांत खेळून त्याने ग्रँडमास्टर किताबाचे दोन नॉर्म मिळविले होते आणि २४०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला होता. या कामगिरीमुळे त्याचा ‘आयएम’ किताबही निश्‍चित झाला होता. यावर्षी त्याने ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा नॉर्म मिळविला, या किताबासाठी आवश्यक तिन्ही नॉर्म त्याच्यापाशी होते, परंतु तांत्रिकदृष्ट्या तो ग्रँडमास्टर नव्हता, कारण - त्याच्या खाती २५०० एलो गुण नव्हते. पोर्तुगालमधील स्पर्धेत त्याने गुणांचा टप्पा सर करत भारताचा नवा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू हा मान मिळविला. पोर्तुगीज लीग स्पर्धेत त्याने अफलातून खेळ करताना पाचव्या फेरीत २५०० एलो गुण गाठले. ग्रँडमास्टर झाल्यामुळे केवळ प्रिथूचेच नव्हे, तर त्याच्या पालकांचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. प्रिथूला सदैव पालकांचे प्रोत्साहन लाभले. विशेषतः त्याच्या आईने खूप मेहनत घेतली आहे. प्रिथूच्या स्पर्धांच्या कालावधीत आई पूनम सावलीप्रमाणे मुलासोबत असते. परदेश दौऱ्यात आईसोबत असल्यामुळे प्रिथू गांगरून जात नाही. बिनधास्तपणे बुद्धिबळ खेळतो. प्रिथू अभ्यासातही हुशार असल्यामुळे पालकांनी त्याच्यावर जास्त दडपण टाकले नाही. प्रिथूने स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केल्यानंतर लगेच ‘फिडे’चे मानांकन मिळविले. १७०० एलो गुणांसह खाते उघडल्यानंतर प्रिथू प्रेरित झाला. तो जास्तच गांभीर्याने बुद्धिबळ खेळू लागला. आपल्या वयाच्या मुलांपेक्षा सीनियर खेळाडूंविरुद्ध खेळण्यास प्राधान्य दिले. त्याचे योग्य फळ त्याला गवसले. 

मोठी झेप घेण्याचे लक्ष्य 
ग्रँडमास्टर किताबधारक बुद्धिबळपटू झाल्यामुळे प्रिथू आनंदित आहे, परंतु समाधानी नाही. पोर्तुगालमधील स्पर्धेनंतर त्याने २६०० एलो गुणांचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याला आणखीन खडतर स्पर्धा खेळाव्या लागतील. प्रतिस्पर्धीही तगडे असतील. यंदाचे वर्ष त्याच्यासाठी कसोटीचे आहे. दहावीची परीक्षा आणि बुद्धिबळ यांची त्याला योग्य सांगड घालावी लागेल. अभ्यासामुळे परदेशातील स्पर्धा खेळण्याबाबतही त्याला व पालकांना योग्य नियोजन करावे लागणार आहे. बुद्धिबळाच्या पटावर विचारपूर्वक चाली रचणाऱ्या प्रिथूची आत्तापर्यंतची कारकीर्द स्वप्नवत ठरली आहे. तो भरात असला, की त्याला रोखणे कठीण ठरते. गतवर्षी बिएल मास्टर्स स्पर्धेत त्याने पहिल्या ५० खेळाडूंत स्थान मिळविले होते. यंदा इटलीतील बुद्धिबळ स्पर्धेत त्याने मातब्बर ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंना रोखताना लक्षवेधी खेळ केला होता. 

संबंधित बातम्या