साथियनची जिगर 

किशोर पेटकर
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

क्रीडांगण
 

काही वर्षांपूर्वीची गोष्ट, भारताचा पुरुष टेबल टेनिसपटू ज्ञानेश्‍वरन साथियन जागतिक टेबल टेनिस क्रमवारीत खूप दूरवर ४०० व्या क्रमांकावर होता. सहा वर्षांपूर्वी त्याने जगात पहिल्या ५० टेबल टेनिसपटूंत स्थान मिळविण्याचे स्वप्न पाहिले, तेव्हा चेन्नईच्या या खेळाडूची बहुतेकांनी थट्टा केली. कारण सोपे होते, भारतीय टेबल टेनिसचे जागतिक पातळीवरील स्थान पाहता, साथियन खूप मोठ्या बढाया मारतोय असेच मत होते. मात्र, हा खेळाडू जिद्दी आणि जिगरबाज ठरला. त्याने जगातील ५० टेबल टेनिसपटूंत स्थान मिळविलेच, पण त्याही पुढे जात जगातील पहिल्या २५ खेळाडूंत जागा मिळविली. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय पुरुष टेबल टेनिसपटू ठरला. या २६ वर्षीय टेबल टेनिसपटूने २४ वा क्रमांक मिळवत थक्क करणारी प्रगती साधली. त्याचे हे मानांकन कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरले. त्याने आता ‘टॉप १५’मध्ये येणाचे उद्दिष्ट बाळगले आहे, पण यावेळी त्याला सारे गांभीर्याने घेत आहेत. वर्षभरातील साथियनची कामगिरी बहारदार ठरली. त्याने जगातील मातब्बर टेबल टेनिसपटूंना हरविले. या मेहनती टेबल टेनिसपटूने जागतिक पातळीवर मोठी मजल मारली आहे, ती स्पृहणीय आहे. सध्या तो देशातील अव्वल टेबल टेनिसपटू आहे. ए. शरथ कमाल हा भारताचा आणखी एक मातब्बर टेबल टेनिसपटू. शरथ आणि साथियन यांनी जागतिक टेबल टेनिसमध्ये भारताचा तिरंगा उंचावला आहे. 

प्रगतीचे स्वप्न साकारले 
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू सुब्रह्मण्यम रमण यांच्या मार्गदर्शनाखाली साथियनची कामगिरी बहरली आहे. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली साथियनने शिस्तबद्ध कामगिरीच्या बळावर स्वप्न साकार केले. जगात पहिल्या २५ खेळाडूंत स्थान मिळविणाऱ्या या हिकमती खेळाडूने टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याचे आणखी एक स्वप्न बाळगले आहे. ऑलिंपिक पदकप्राप्तीचे उद्दिष्ट कठीण आहे ही बाब साथियनलाही मान्य आहे, पण निर्धार पक्का आहे. गतवर्षी त्याने आशियायी क्रीडा स्पर्धेतील पदकाचा संकल्प केला होता, तो प्रत्यक्षातही आणला. इंडोनेशियातील आशियायी क्रीडा स्पर्धेत साथियनच्या अफलातून खेळाच्या बळावर भारताने पुरुष सांघिक गटात कांस्यपदक जिंकले होते. भारतीय टेबल टेनिसमध्ये व्यावसायिकता रुजत आहे. शरथ कमाल, साथियन जगभरातील व्यावसायिक स्पर्धांत खेळतात, क्लब पातळीवर युरोपातील स्पर्धांत सहभागी होतात, त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कामगिरीत दिसत आहे. आशियायी पदकानंतरही साथियनने सात्यत कायम राखले. आशिया करंडक स्पर्धेत त्याला सहावा क्रमांक मिळाला, त्यामुळे विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता मिळवता आली. याशिवाय जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत साथियनने ‘राऊंड ऑफ ३२’ फेरीपर्यंत मजल मारली. आशिया करंडक स्पर्धेत साथियनने ‘टॉप टेन’मधील चिह युआन चुआंग, वाँग चुन टिंग या मातब्बर टेबल टेनिसपटूंनाही हरविले. टेबल टेनिस खेळताना साथियनची चपळता, पदलालित्य आणि तंत्र यांचा सुरेख संगम साधला जातो.

योग्य निर्णय 
जागतिक टेबल टेनिसमध्ये यशस्वी वाटचालीत साथियनने शारीरिक तंदुरुस्तीवर जास्त भर दिला आहे. अभियांत्रिकी शिक्षण सफलपणे पूर्ण केल्यानंतर अभियंता होऊन काम करण्याऐवजी साथियनने टेबल टेनिसमध्ये कारकीर्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला, त्यावेळी त्याचे मन द्विधावस्थेत होते. मुलाने अभियंता होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे ही त्याच्या वडिलांची इच्छा होती. जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णय घेताना साथियन थोडाफार बावरलाही होता. अखेरीस प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्याने कारकिर्दीतील जोखीम यशस्वी ठरविली. गेल्यावर्षी ‘टॉप ५०’ खेळाडूंत येण्याची स्वप्नपूर्ती केल्यानंतर आक्रमक शैलीच्या खेळावर भर देत त्याने आगेकूच राखली. या वाटचालीत त्याला सुब्रह्मण्यम रमण यांच्यासारख्या प्रगल्भ मार्गदर्शकाची समर्थ साथ लाभली.  व्यावसायिकदृष्ट्या टेबल टेनिस खेळात जास्त पैसा नाही, तरीही साथियन प्रेरित आहे. आशियायी स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले, आता त्याला ऑलिंपिक पदक खुणावत असेल. जागतिक क्रमवारीत पहिल्या २५ खेळाडूंत जागा मिळविल्यामुळे त्याचा हुरूपही वाढलेला असेल. ऑलिंपिक पात्रतेचा टप्पा पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होणार आहे. वैयक्तिक मानांकन उंचावलेले असल्यामुळे साथियनला वैयक्तिक गटात पात्रता शक्य आहे, त्याचवेळी सांघिक पातळीवरही त्याला मोलाचा वाटा उचलावा लागणार आहे. 

संबंधित बातम्या