प्रतीक्षेचे गोड फळ

किशोर पेटकर
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

क्रीडांगण
 

हैदराबादच्या पी. व्ही. सिंधू या महिला बॅडमिंटनपटूने तीन वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये इतिहास रचला. ऑलिंपिक बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय हा पराक्रम या जिगरबाज मुलीने साधला. स्पेनच्या करोलिना मरिन हिच्याकडून हार स्वीकारल्यामुळे सिंधूच्या गळ्यात सोनेरी पदक दिसले नाही, तरीही रुपेरी पदकाचा दिमाख अद्वितीय ठरला. मात्र, ऑलिंपिक अंतिम लढतीपासून जुलै २०१९ पर्यंत सिंधू आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर ओळीने अकरा अंतिम लढतीत पराभूत झाली. फायनलमध्ये हरणारी `चोकर` हा शिक्का २४ वर्षीय सिंधूला कमालीचा सलत होता. तिचा खेळ सर्वगुणसंपन्न होता, पालकांचे भरीव प्रोत्साहन होते, प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांचे दिग्गज मार्गदर्शनही पाठराखण करत होते, तरीही अंतिम लढतीत सिंधू प्रतिस्पर्ध्यांना शह देऊ शकत नव्हती. अखेरीस दुष्काळ संपला आणि यशाच्या चिंब सरीने सिंधूसह सारे भारतीय न्हाऊन गेले. दीर्घ प्रतीक्षेचे गोड फळ सिंधूच्या मेहनतीस मिळाले. टेनिसमधील महान खेळाडू रॉजर फेडरर याच्या स्वित्झर्लंड देशातील बासेल येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने भारतीय क्रीडा क्षेत्रातील आणखी एक ऐतिहासिक घटना नोंदीत केली. बॅडमिंटनमध्ये जगज्जेतेपद मिळविणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. जपानच्या नोझोमी ओकुहारा हिला नमविल्यानंतर, एकदाचे मी जिंकले, हेच भाव सिंधूच्या जल्लोषित चेहऱ्यावर प्रकर्षाने उमटले होते. ``दोन रौप्यपदकानंतर, अखेरीस मी जगज्जेती होऊ शकले. या विजयाची दीर्घकाळ प्रतीक्षा होती,`` असे सांगत सिंधूने भावनांना वाट मोकळी करून दिली. जगज्जेतेपदासह तिने टीकाकारांना, जे नेहमीच तिच्या कुवतीवर शंका घेत होते, त्यांना उत्तररूपी सणसणीत चपराकच लगावली आहे. 

थर्ड टाइम लकी
 जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळा ब्राँझपदक जिंकलेल्या सिंधूला मागील दोन वेळा अंतिम लढतीत हार स्वीकारावी लागली होती. २०१७ मध्ये ओकुहारा तिला भारी ठरली होती, तर गतवर्षी चीनमधील नान्जिंग येथे तिचे जगज्जेतेपदाचे स्वप्न अपूर्ण राहिले. करोलिना मरिन तिची मैत्रीण, पण बॅडमिंटन कोर्टवर मैत्री विसरली जाते. करोलिना हिने सिंधूला उपविजेतेपदावरच समाधान मानण्यास भाग पाडले. यंदाच्या जागतिक स्पर्धेत दुखापतीमुळे करोलिना नव्हती, पण सिंधूसमोर जपानी आणि चिनी खेळाडूंचे तगडे आव्हान होते. जबरदस्त स्मॅशेसचा भडिमार करत या जिद्दी मुलीने स्वप्नपूर्ती केली. सिंधूला नेहमीच भारी ठरणारी जपानची अकाने यामागुची दुसऱ्या फेरीतच गारद झाली. सिंधूपुढील मोठा अडथळा दूर झाला होता, परंतु आव्हाने कायम होती. कमालीच्या आत्मविश्वासाने आणि अफलातून तंदुरुस्तीसह बॅडमिंटन कोर्टवर उतरलेली सिंधू सोनेरी यशासाठी प्रेरित होती. जागतिक स्पर्धेपूर्वी ती मानांकनात पाचव्या स्थानी होती, मात्र तिचा खेळ अव्वल मानांकितास साजेसा होता. उपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित तई त्झू यिंग हिला, उपांत्य फेरीत तृतीय मानांकित चेन यू फेई, तर अंतिम लढतीत चौथ्या मानांकित ओकुहारा हिचा पाडाव करत सिंधूने स्वप्नवत घोडदौड राखत समस्त भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत सिंधूने फक्त एकच गेम गमावला, यावरून तिचा धडाका लक्षात येतो. ओकुहारा हिने धारदार रॅलीजवर भर देत सिंधूला दमविण्याचा प्रयत्न केला, पण सिंधूचा खेळ खूपच बहरला होता. जपानी खेळाडूस अवघ्या ३७ मिनिटांत बॅडमिंटन रॅकेटला म्यान करावे लागले. सिंधूने सामना २१-७, २१-७ असा लीलया जिंकत फायनलमध्ये जिंकणारी भारतीय ही नवी ओळख प्रस्थापित केली.

आईला वाढदिनी गिफ्ट...
 बासेल येथे सिंधू अंतिम लढत खेळत असताना, तिच्या मनात आई विजया यांना वाढदिवसाचे काय गिफ्ट द्यावे याचाही विचार होता, पण ती भावनिक झाली नव्हती. तिचे सारे लक्ष अंतिम लढतीवर एकवटले होते. मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या सिंधूने मागील सलग अकरा पराभवांचे ओझे फेकून देत नव्या दमाने खेळ केला. परिणामी अनायासे ती आईला वाढदिनी जगज्जेतेपदाची भेट सादर करू शकली. सिंधूच्या यशात तिच्या पालकांचा मोठा वाटा आहे. आई-वडील दोघेही माजी खेळाडू असल्यामुळे त्यांना मैदानावरील अपेक्षा, दबाव, जिंकण्याची ईर्षा, पराभवाचे शल्य या साऱ्या बाबींची जाणीव आहे. वडील पी. व्ही. रमण यांनी मुलीची कारकीर्द घडविण्यास मोलाची भूमिका बजावली. जागतिक स्पर्धेपूर्वी रमण यांची गाठ श्रीकांत वर्मा यांच्याशी पडली. श्रीकांत हे हैदराबादमधील नावाजलेले ट्रेनर आहेत. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूचे शरीर अधिकच दणकट आणि खंबीर झाले. जगज्जेतेपदानंतर खुद्द सिंधूनेच श्रीकांत यांच्या शारीरिक तंदुरुस्ती मार्गदर्शनाचा आवर्जून उल्लेख केला. ऑलिंपिक रौप्य, जागतिक विजेतेपदानंतर सिंधूची नजर आता निश्चितच पुढील वर्षी टोकियोत ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्यावर स्थिरावलेली असेल. तिचा भारदस्त खेळ, असामान्य कौशल्य आणि गुणवत्ता, अपयशातून भरारी घेण्याची जिद्द, उणिवांवर मात करून यशस्वी होण्याचा बाणा, मानसिक कणखरपणा यांचा विचार करता, टोकियोत सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम पुसार्ला व्यंकट सिंधू हिच्या नावावर निश्चितच जमा होऊ शकतो.     
 

संबंधित बातम्या