दिव्यांग क्रीडा गुणवत्तेला न्याय

किशोर पेटकर
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

क्रीडांगण
 

भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानाच्या खेलरत्न या पुरस्काराने पॅरा-ॲथलिट दीपा मलिक सन्मानित झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपाने राष्ट्रीय क्रीडादिनी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारला. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणारी ती पहिली महिला पॅरा-ॲथलिट आहे, तर दुसरी दिव्यांग क्रीडापटू आहे. पॅरा-ॲथलिट देवेंद्र झाझरिया याला २०१७ मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. खेलरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर दीपा कमालीची भावूक आणि आनंदितही झाली. आपला खेलरत्न पुरस्कारापर्यंतचा प्रवास दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा ठरेल, असा विश्वास दीपा हिने व्यक्त केला. दीपाने २०१६ रियो पॅरालिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले, पण तिला खेलरत्न पुरस्कारासाठी डावलण्यात आले होते. ती निराश झाली नाही, उलट प्रयत्न कायम ठेवले. अखेर तिचे पदक आणि कामगिरी खेलरत्न पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात आली. पॅरा-ॲथलिट्सच्या मैदानावरील कामगिरीची दखल घेण्यात येत आहे. ही बाब अगोदर देवेंद्र आणि आता दीपाला सन्मानित करण्यात आलेल्या खेलरत्न पुरस्काराने अधोरेखित झाली आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर दीपा म्हणाली, `पॅरालिंपिकमध्ये आम्ही केवळ दिव्यांगांचे नव्हे, तर देशाचे प्रतिनिधित्व करतो. देशाचा तिरंगा मानाने फडकवण्यात हातभार लागला, याशिवाय दुसरी अभिमानाची गोष्ट असूच शकत नाही.` दिव्यांग क्रीडापटूंच्या अडचणी पुरस्कार समितीला समजल्या हे महत्त्वाचे असल्याचे दीपाने नमूद केले.

जिद्दीचा सन्मान
 आंतरराष्ट्रीय मैदानावर पदके जिंकणाऱ्या दिव्यांग क्रीडापटूंचा सारा जीवनपट साहसी आणि संघर्षमय असतो. आपल्या शारीरिक त्रुटींवर मात करून देशासाठी पदक जिंकण्याची त्यांची जिद्द गौरवास्पद आहे. राष्ट्रीय पुरस्कार समिती या संस्मरणीय कामगिरीचा सन्मान करत आहे. त्यापासून प्रेरणा घेत इतर दिव्यांग क्रीडापटूही मैदानावर यशस्वी ठरण्यासाठी मेहनत घेऊ लागलेत. तीन वर्षांपूर्वी रियो पॅरालिंपिक स्पर्धेत भारतीय पॅरा खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी प्रदर्शित केली. २०१६ मध्ये भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य व कांस्यसह एकूण चार पदके मिळाली होती. दिव्यांग क्रीडापटूंना सहकार्य आणि न्याय मिळाल्यास तेही सक्षम क्रीडापटूंच्या तोडीची कामगिरी करू शकतात हे सिद्ध झाले आहे. प्रत्येक पॅरा क्रीडापटूची संघर्षगाथा वेगळी, पण ते हिंमत हारत नाहीत. वीस वर्षांपूर्वी बिछान्यावरून उठून व्हीलचेअरच्या मदतीने गगनभरारी घेणाऱ्या दीपाची यशोगाथा दिव्यांग क्रीडापटूंसाठी दिशादर्शक, प्रेरणादायी आहे. शारीरिक अपंगत्वावर जिद्दीवर मात करता येते, कुटुंबीयांचे भरीव प्रोत्साहन लाभले, तर जग पादाक्रांत करता येते, ही बाब भारतीय दिव्यांग क्रीडापटू वारंवार सिद्ध करत आहेत. फक्त त्यांची पाठ थोपटणे आवश्यक असते.

रोख पारितोषिकासाठी थेट पात्र
 भारतातील दिव्यांग क्रीडापटूंची पूर्वी विचारपूस होत नसे. पण आता परिस्थिती बदलत आहे. देशात दिव्यांग क्रीडापटूंना आवश्यक सुविधा मिळू लागल्या आहेत. केवळ पॅरालिंपिकच नव्हे, तर जागतिक, आशियायी, राष्ट्रकुल पातळीवरही पॅरा स्पर्धा रंगत आहेत. भारतीय क्रीडापटू मोठ्या संख्येने या स्पर्धांत सहभागी होताना आणि पदके जिंकताना दिसतात.  आता केंद्र सरकारनेही दिव्यांग क्रीडापटूंना न्याय दिला आहे. आंतरराष्ट्रीय पदक जिंकल्यानंतर पॅरा खेळाडू सरकारी योजनेतील रोख पारितोषिकासाठी थेट पात्र असतील. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी नियोजनात तातडीने महत्त्वाची दुरुस्ती केली. त्यामुळे भारतीय दिव्यांग क्रीडापटूंना आता केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या रोख पारितोषिकासाठी वाट पाहावी लागणार नाही, कागदोपत्री संघर्ष करावा लागणार नाही. या बदलाचा सर्वप्रथम लाभ जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतील पदक विजेत्यांना मिळाला. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस २० लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यास १४ लाख रुपये, तर कांस्यप्राप्तीसाठी आठ लाख रुपये देऊन पॅरा बॅडमिंटनपटूंना गौरविण्यात आले. दुहेरीतील सुवर्णपदकासाठी १५ लाख रुपये, रौप्यपदकासाठी साडेदहा लाख रुपये, तर कांस्यपदकासाठी सहा लाख रुपये असे रोख पारितोषिकाचे स्वरूप आहे. आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समितीच्या स्पर्धांत पदक जिंकून दिव्यांग क्रीडापटू जेव्हा मायदेशात परततील, तेव्हा त्यांना त्याच दिवशी रोख रकमेच्या पारितोषिकाने गौरविण्याची दुरुस्ती दिव्यांग क्रीडापटूंना प्रोत्साहित करणारी आहे. यामुळे हे खेळाडू अधिकच प्रेरित होतील हे निश्चित आहे. देशातील प्रत्येक खेळाडूंना समान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी नमूद केले. दिव्यांग क्रीडापटू जागतिक-आंतरराष्ट्रीय मैदानावर पदके जिंकून देशासाठी भूषणावह कामगिरी करतात, त्यांना परिश्रमाचे योग्य फळ आणि हक्काचा गौरव मिळायलाच हवा. केंद्र सरकारने दिव्यांग क्रीडापटूंप्रती घेतलेली भूमिका स्पृहणीय आहे.

संबंधित बातम्या