सलाम मानसी!

किशोर पेटकर
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

क्रीडांगण
 

सुमारे आठ वर्षांपूर्वींची गोष्ट... उत्तम बॅडमिंटन खेळणाऱ्या मानसी जोशी या मराठी मुलीचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. रस्ता अपघातात तिला डावा पाय गमवावा लागला. खेळ खुंटलाच, तिचे जीवनही परावलंबी झाले, पण ही जिद्दी मुलगी डगमगली नाही. अपघाताचे जहरी व्रण शरीराने झेलले, तेव्हा मानसी २२ वर्षांची होती. ती मनाने खचली नाही, एका पायावर दृढनिश्चयाने उभी राहिली. समर्पित वृत्तीने बॅडमिंटन कोर्टवर आली. रॅकेट घेऊन केवळ दिखाव्यासाठी बॅडमिंटन कोर्टवर उतरली नाही, तर जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर तिने जगज्जेतेपदास गवसणी घातली. स्वित्झर्लंडमधील बासेल येथे भारतीय महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटनमध्ये विजेतेपद मिळवून इतिहास घडविला. सारा देश सिंधूचा जयजयकार करत असताना मानसीची भरारी सुरुवातीस काही प्रमाणात दुर्लक्षित राहिली, पण नंतर तिची दखल घेतली गेली. जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत मानसीने तीन वेळा विजेतेपद मिळविलेल्या देशवासीय पारूल परमार हिचा २१-१२, २१-७ फरकाने पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून साऱ्यांनीच तिच्या पराक्रमास शाबासकी देत दिव्यांग क्रीडापटूंच्या जिद्दीचा जयजयकार केला. सिंधू जगज्जेती ठरली, तिचे कौतुक झाले. मात्र, पॅरा बॅडमिंटनपटूंनी बासेल येथेच १२ पदके जिंकूनही त्यांची कामगिरी नजरेआड झाली. पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेल्या सुकांत कदम या पॅरा खेळाडूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंधू यांचा फोटो जोडून पॅरा बॅडमिंटनपटूंनी जागतिक स्पर्धेत १२ पदके जिंकल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आणि दिव्यांग बॅडमिंटनपटूंचा पराक्रम प्रकाशमान झाला. सुकांत यांच्या ट्विटनंतर त्यास लगेच पंतप्रधान मोदी यांनी प्रतिसाद देताना, `ज्यांनी मायदेशी १२ पदके आणली, त्या भारतीय पॅरा बॅडमिंटन पथकाचा १३० कोटी देशवासीयांना सार्थ अभिमान आहे. प्रत्येक खेळाडूची कामगिरी उल्लेखनीय आहे,` असे नमूद करत खेळाडूंची पाठ थोपटली. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही पॅरा बॅडमिंटनपटूंचे कौतुक केले.

सलाम मानसी!
 मानसी केवळ दिव्यांग बॅडमिंटनपटूच नाही, तर ती यशस्विनी आहे. तीस वर्षीय मानसी इलेक्ट्रॉनिक अभियंता आहे. तिचे वडील मुंबईतील भाभा अनुसंधान संशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक. लहानपणीच मानसीने बॅडमिंटन खेळात पारंगता संपादन केली. स्थानिक, तसेच राज्य पातळीवरही तिने पदके जिंकण्याचा सपाटा लावला. रस्ता अपघातात डावा पाय गमवावा लागल्यानंतर तिचे जीवनच अंधकारमय झाले होते. सुमारे दोन महिने ती रुग्णालयातील खाटेवर थिजली होती. मात्र, मानसी हार मानणाऱ्यांपैकी अजिबात नाही. एक पाय गमावला, पण दुसरा शाबूत आहे, त्यामुळे पायातील बळ साफ गेलेले नाही. आपण पुन्हा बॅडमिंटन कोर्टवर झपाटल्यागत खेळू शकतो हा निश्चय करून ती रॅकेट हाती घेऊन कोर्टवर उतरली. कृत्रिम पायाची मदत घेतली, पण चालताना, धावताना मर्यादा येत होत्या. तीव्र वेदना व्हायच्या. परंतु, मानसीचा निर्धार पक्का होता. प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर तिने जागतिक विजेतेपदास गवसणी घातली. `जागतिक विजेतेपदाने माझी स्वप्नपूर्ती झाली आहे,` अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मानसीने दिली. तिची अचाट जिगर सक्षम लोकांसाठीही प्रेरणास्त्रोत आहे.

नजर पॅरालिंपिक सुवर्णावर
 भारताचे महान बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद आता सर्वश्रेष्ठ प्रशिक्षक ठरले आहेत. देशासाठी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर पताका फडकाविणाऱ्या, तिरंगा उंचावणाऱ्या बॅडमिंटनपटूंवर गोपीचंद यांच्या हैदराबाद येथील अकादमीतच सुरेख पैलू पाडण्यात येतात. मानसी हिलाही गोपीचंद यांच्या अमूल्य मार्गदर्शनाचा परीसस्पर्श झाला आहे. बासेल येथे जागतिक विजेतेपद पटकाविल्यानंतर मानसीने सोशल मीडियाद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तिने नमूद केले, की `प्रशिक्षण खूपच खडतर असे. दिवसभरात तीन सत्रांत सराव शिबिर चालायचे. तंदुरुस्तीवर भर द्यावा लागला. वजन कमी करावे लागले. स्ट्रोक्सवरही काम करावे लागले. त्यासाठी अकादमीत प्रत्येक दिवशी अथक प्रशिक्षणावर भर दिला. गाळलेला घाम आणि मेहनतीचे चीज झाले आहे.` मानसीचे हे जागतिक स्पर्धेतील पहिलेच विजेतेपद आहे. कारकिर्दीतील पहिल्या जागतिक सुवर्णपदकामुळे ती आता प्रेरित झाली आहे. पुढील वर्षी टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकण्याची तिची मनीषा आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मानसीची घोडदौड सुरू आहे.

संबंधित बातम्या