जिन्सनची वेगवान धाव

किशोर पेटकर
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

क्रीडांगण
 

या वर्षी एप्रिलमध्ये दोहा येथे झालेली आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा भारताचा मध्य पल्ल्याचा धावपटू जिन्सन जॉन्सन याच्यासाठी खूपच वेदनादायी ठरली. जिन्सन हा भारताचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेता धावपटू. गतवर्षी जकार्ता येथे १५०० मीटर शर्यतीत त्याने सुवर्णपदक, तर ८०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. साहजिकच दोहा येथील आशियाई स्पर्धेत त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या, पण दुखापतीने घात केला. पायाच्या स्नायूने दगा दिला आणि जिन्सनला ८०० मीटर शर्यतीचा शेवटचा टप्पा पूर्ण करता आला नाही. त्यानंतर तो १५०० मीटर शर्यतीतही भाग घेऊ शकला नाही. सारी मेहनत एका क्षणात पाण्यात गेली. दोन्ही शर्यतीतील पदकांना तो दुरावला. दुखापतीचे दुःख खूपच सलणारे ठरले. मार्च महिन्यात त्याने पतियाळा येथील फेडरेशन कप स्पर्धेत वेगवान वेळ नोंदविली होती, त्यामुळे दोहा येथील स्पर्धेत पदक मिळणार याची प्रशिक्षकांना खात्री होती. प्रत्यक्षात दुखापतीमुळे विव्हळणे त्याच्या नशिबी आले. जिन्सनच्या डोळ्यांत अश्रूंची दाटी झाली. त्याची वेगवान धाव आणि तयारी पाहता, तो पदकाचा दावेदार होता. दुखापतीमुळे केरळमधील कोझिकोड येथील या जिगरबाज धावपटूचे स्वप्न भंगले. दोहा येथून वेदनांसह त्याला मायदेशी परतावे लागले, पण त्याने जिद्द सोडली नाही. अवघ्या दोन महिन्यांत त्याने ट्रॅकवर वेगाने धाव घेतली. १५ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत जिन्सनने दोनवेळा राष्ट्रीय विक्रम मोडत प्रबळ इच्छाशक्ती प्रदर्शित केली. नेदरलँड्समध्ये त्याने १५०० मीटर शर्यतीत तीन मिनिटे ३७.६२ सेकंद ही नवी राष्ट्रीय विक्रमी वेळ दिली. नंतर एक सप्टेंबरला जर्मनीतील बर्लिन येथे १५०० मीटर शर्यतीत तो आणखी वेगाने धावला. तीन मिनिटे ३५.२४ सेकंद वेळेत अंतर पार करून स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. जिन्सनने सप्टेंबरच्या अखेरीस दोहा येथेच होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. आता त्याची नजर २०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धा पात्रतेवर आहे.

वेगाचा ध्यास
 जिन्सन २८ वर्षांचा आहे. वय आणि अनुभवागणिक तो परिपक्व होत आहे. त्याची धावही आशियाई धावपटूंसाठी वरचढ ठरत आहे. वेगाने धावणे हाच त्याचा ध्यास आहे. नेदरलँड्स, तसेच जर्मनीतील त्याचा १५०० मीटर शर्यतीतील वेग पाहता, दोहा येथील जागतिक स्पर्धेत त्याला पदकाची संधी राहील. एप्रिलमध्ये जिन्सनच्या अनुपस्थितीत आशियाई स्पर्धेत बहारीनचा केनियात जन्मलेला अब्राहम रोटिच याने प्रथम क्रमांक मिळविला. त्याने तीन मिनिटे ४२.८५ सेकंद वेळ नोंदविली, तुलना करता जिन्सनच्या कामगिरीपेक्षा ती वेळ खूपच संथ आहे. बर्लिनमधील शर्यतीत तुल्यबळ प्रतिस्पर्धी होते. एकूण १७ धावपटूंत त्याला दुसरा क्रमांक मिळाला. वेग वाढविण्याच्या नादात त्याने पदकही प्राप्त केले व जागतिक स्पर्धेसाठीही पात्रता मिळविली. त्याच्यासाठी ही कामगिरी सुखावणारी आहे. टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धा पात्रतेसाठी तीन मिनिटे ३५ सेकंद वेळ नोंदविणे आवश्यक आहे. बर्लिनला जिन्सन ही वेळ गाठण्यात अगदी थोडक्यात हुकला, तो ००.२४ सेकंद संथ ठरला. मात्र, त्याचा निश्चय पक्का आहे. त्यासाठीच जागतिक स्पर्धेपूर्वी प्रगत प्रशिक्षणासाठी तो अमेरिकेस रवाना झाला आहे. 

योग्य निर्णय
 आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील दुखापतीनंतर जिन्सनने कारकिर्दीतील सर्वांत मोठा, पण योग्य निर्णय घेतला. १५०० मीटर शर्यतीवर लक्ष एकाग्र करण्यासाठी ८०० मीटर शर्यतीवर पाणी सोडले. एकावेळी दोन्ही शर्यतीत न धावण्याचा निर्णय घेताना, त्याने १५०० मीटर शर्यतीस प्राधान्य दिले. या निर्णयाविषयी त्याचे म्हणणे आहे, `आशियाई पातळीवर एकावेळेस दोन शर्यतीत धावणे सोपे, पण ऑलिंपिकचा विचार करता फक्त एकाच शर्यतीवर लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरते. १५०० मीटर शर्यतीत जास्त संधी असल्याने ऑलिंपिकसाठी या शर्यतीला पसंती दिली.` अमेरिकेतील कोलोराडो स्प्रिंग्स येथील प्रगत प्रशिक्षणानंतर ऑलिंपिक पात्रतेची वेळ नोंदविण्याचा जिन्सनला विश्वास आहे. जागतिक स्पर्धा हेच त्याचे सध्याचे मुख्य लक्ष्य आहे. जागतिक स्पर्धेत पदक जिंकल्यास त्याचा आत्मविश्वासही खूपच उंचावेल. सध्याची त्याची वेळ २०१६ मधील रियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या अमेरिकेच्या मॅट सेंट्रोविट्झ (३ मिनिटे ५० सेकंद) याच्या तुलनेत खूपच सरस आहे.

संबंधित बातम्या