शफाली वर्माची निवड

किशोर पेटकर
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

क्रीडांगण
 

भारतीय महिला क्रिकेटमधील अनुभवी फलंदाज ३७ वर्षीय मिताली राज हिने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर, मोठी पोकळी निर्माण होईल हा सूर व्यक्त झाला. त्यात तथ्यही आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यावर त्वरित उपाययोजनाही करण्यास प्राधान्य दिले आहे. मितालीच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली उणीव भरून काढण्याच्या प्रयत्नात, भविष्याचा विचार करून हरियानाची १५ वर्षीय शफाली वर्मा हिची निवड करण्यात आली. ही युवा मुलगी मितालीपेक्षा तब्बल २२ वर्षांनी लहान. अनुभवातही साफ नवखी. सलामीला आक्रमक शैलीत खेळणाऱ्या शफालीत महिला क्रिकेट निवड समितीला आगळा जोश दिसला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेसाठी ही अनोळखी मुलगी सीनियर महिला क्रिकेट संघात आली. तिच्या निवडीचे धाडस दाखविणाऱ्या निवड समितीचेही कौतुक करायला हवे. या वर्षी मे महिन्यात जयपूर येथे आयपीएलच्या धर्तीवर महिला क्रिकेटपटूंची स्पर्धा झाली होती. त्या टी-२० स्पर्धेत शफाली खेळली होती. इंग्लंडची मातब्बर क्रिकेटपटू डॅनियली व्यॅट हिला शफालीच्या आक्रमकतेने कमालीचे प्रभावित केले. दोघीही एकाच संघात होत्या. नेटमधील सफाईदार सराव, तसेच मैदानावर बिनधास्त फलंदाजी करणाऱ्या शफालीचा आत्मविश्वास, तिची नैसर्गिक शैली, पदलालित्य पाहून, येत्या काही वर्षांत ही मुलगी भारतीय संघाची सुपरस्टार होईल असे भाकीत डॅनियली हिने केले होते, पण ते इतक्या लवकर प्रत्यक्षात येईल याची कल्पनाही इंग्लिश खेळाडूने केली नसेल. महिलांच्या आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची बांधणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शफालीला मोठी संधी मिळत आहे. स्फोटक फलंदाजीस सातत्याची जोड लाभल्यास शफाली भारतीय महिला क्रिकेटमध्ये विक्रमी अध्याय लिहू शकते, पण त्यासाठी निश्चितच प्रतीक्षा करावी लागेल.

रोहतकहून प्रवासास सुरुवात
 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची संलग्नता लाभल्यापासून देशातील महिला क्रिकेट बहरत आहे. साऱ्या राज्य क्रिकेट संघटनांचे महिला संघ आहेत. नव्या मुली भारतीय क्रिकेट नकाशावर प्रकाशमान होत आहेत. या मुली देशाकडून खेळताना पुरुष क्रिकेटपटूंच्या तोडीची कामगिरी बजावताना दिसतात. शफाली वर्मा ही अशीच जिद्दी आणि जिगरबाज मुलगी. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी अवघ्या पंधराव्या वर्षी आपली निवड सीनियर संघात होईल याची कल्पनाही शफालीला नव्हती, कारण ती राष्ट्रीय पातळीवर जास्त खेळलेली नाही. साहजिकच रोहतक येथील या मुलीची राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर, कोण ही शफाली हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. फक्त अपवाद तिचे वडील. शफालीच्या वडिलांना क्रिकेटपटू व्हायचे होते, परंतु घरच्यांनी त्यांना रोखले. परिणामी मैदानावरील क्रिकेट खुंटले. मात्र, त्यांची इच्छाशक्ती कायम राहिली व ती त्यांनी आपल्या मुलीत उतरविली. ''मी क्रिकेटपटू व्हावे ही वडिलांची इच्छा होती. त्यांनी माझ्या खेळावर खूप मेहनत घेतली आहे,‘‘ असे शफालीने राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर सांगितले. वयाच्या आठव्या वर्षी भावासमवेत खेळत तिने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा श्रीगणेशा केला. भाऊ लेगस्पिनर असल्यामुळे तो जास्त 
वेळ गोलंदाजी टाकायचा, त्यामुळे शफालीला फलंदाजीची संधी जास्त लाभत असे. त्यावेळीही तिचा फटकेबाजीवरच भर असायचा.

लहान वयात मोठी मजल
 भारतीय महिला क्रिकेटमध्ये सध्या युवा क्रिकेटपटूंचा बोलबाला आहे. महाराष्ट्राची स्मृती मानधना, मुंबईची जेमिमा रॉड्रिग्ज यांनी आक्रमक आणि शैलीदार फलंदाजीच्या बळावर अगदी लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर ठसा उमटविला आहे. त्यांच्या पंगतीत आता शफालीला येण्याची संधी आहे. तिने वयाच्या तेराव्या वर्षी हरियानाच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळविले होते. काही वर्षांपूर्वी, रोहतकजवळील लाहली येथे रणजी सामन्यात `क्रिकेटचा देव` सचिन तेंडुलकरला मैदानावर खेळताना पाहून लहानगी शफाली भारावून गेली. त्याचवेळी तिने क्रिकेटपटू होण्याचा निश्चय दृढ केला. सचिन तेंडुलकर तिच्यासाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी क्रिकेटपटू आहे. सचिनचे क्रिकेट पाहून प्रेरक झालेल्या शफालीने यावर्षी फेब्रुवारीत कमाल केली. सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत नागालँडविरुद्ध तिने झंझावाती फलंदाजीची अनोखी अदा सादर केली. अवघ्या ५६ चेंडूंत १२८ धावांची बरसात केली. तेथूनच तिच्या गुणवत्तेला भरारीसाठी आत्मविश्वास गवसला. त्यानंतर महिलांच्या टी-२० चॅलेंज स्पर्धेत ती परदेशी गोलंदाजांना धाडसाने सामोरी गेली. बिनदिक्कतपणे खेळली. तिच्या आक्रमक शैलीची दखल घेतली गेली. निर्धास्तपणे खेळताना, मितालीने मैदानावर वावरताना संयमी राहण्याचा दिलेला सल्लाही शफाली मनोभावे जोपासत आहे.

संबंधित बातम्या