‘ब्ल्यू टायगर्स’ची कमाल

किशोर पेटकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

क्रीडांगण
 

भारतीय फुटबॉल संघ ब्ल्यू टायगर्स या टोपणनावाने ओळखला जातो. या संघातील नवोदितांनी दोहा येथील जासिम बिन हमाद स्टेडियमवर कमाल केली. कतार हा आशियायी फुटबॉलमधील दादा संघ. या वर्षी बलाढ्य जपानला हरवून या संघाने आशिया करंडक जिंकला. २०२२ मध्ये याच देशात विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. त्यानिमित्त सध्या पात्रता फेरी सुरू आहे. प्रबळ कतारला त्यांच्या मायभूमीत जाऊन गोलशून्य बरोबरीत रोखण्याचा पराक्रम भारतीय फुटबॉल संघाने बजावला. बरोबरीचा निकाल भारतीय संघासाठी विजयासमान ठरला. कारण अगोदरच्या लढतीत शेवटच्या आठ मिनिटांत दोन गोल स्वीकारल्यामुळे ब्ल्यू टायगर्स संघाला गुवाहाटी येथे ओमानकडून २-१ फरकाने हार पत्करावी लागली होती, तर कतारने अफगाणिस्तानवर तब्बल सहा गोल डागले होते. साहजिकच भारतीय संघाच्या बचावाच्या दोहा येथे ठिकऱ्या उडण्याचे मानले जाते. तापाने आजारी असलेला अनुभवी खेळाडू सुनील छेत्रीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ आक्रमणात दुबळा होता. संघाने सारे लक्ष बचावावर एकवटले. त्यांनी कतारच्या आक्रमकांना निराश केले. ते आक्रमण करत होते, मात्र तेवढ्याच जिद्दीने भारतीय संघ प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत होते. कतारला गोल करण्यासाठी मोकळीकच मिळाली नाही.

नव्या प्रशिक्षकांचा संयम
 कतारविरुद्धच्या बरोबरीत भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक क्रोएशियाचे इगोर स्टिमॅक यांनाही श्रेय जाते. गुवाहाटी येथे सुनील छेत्रीने २४ व्या मिनिटास गोल करून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील ७२ वा गोल नोंदविला. त्या लढतीत भारत ८२ व्या मिनिटापर्यंत आघाडीवर होता. मात्र, नंतर सामन्याचे पारडे अचानक फिरले व पराभव पत्करावा लागला. त्या निकालानंतर स्टिमॅक अजिबात निराश झाले नव्हते, उलट `हा संघ म्हणजे नवभारताचा चेहरा आहे,` असे धाडसी विधान स्टिमॅक यांनी केले होते. प्रशिक्षक पाठ थोपटत आहेत हे पाहून खेळाडूंचाही उत्साह दुणावला आणि दोहा येथे भारतीय फुटबॉलमधील असामान्य कामगिरी नोंदीत झाली. स्टिमॅक यांनी यावर्षी जूनमध्ये संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा भारतीय संघाचा बचाव खूपच दुबळा होता. अहमदाबाद येथे जुलैमध्ये झालेल्या इंटरकाँटिनेंटल कप स्पर्धेतील तीन सामन्यांत मिळून भारताला दहा गोल स्वीकारावे लागले होते. ओमानविरुद्धच्या विश्वकरंडक पात्रता लढतीत शेवटच्या दहा मिनिटांच्या खेळात संघाच्या बचावास खिंडार पडले होते. या पार्श्वभूमीवर स्टिमॅक यांची हिंमत भक्कम होती. सामन्यापूर्वी स्टिमॅक म्हणाले होते,  `मला माहीत आहे, कतार हा प्रबळ संघ आहे. शारीरिकदृष्ट्या ते दणकट आहेत, त्यांचे तांत्रिक कौशल्य आणि मैदानावरील हालचाली अप्रतिम आहेत. त्यांच्या कमजोरी शोधणे कठीण आहे, पण फुटबॉलमध्ये काहीही शक्य आहे. आम्ही जिद्द हरणार नाही.` यावर्षीच्या प्रारंभी, आशिया करंडक स्पर्धेत पुढील फेरी गाठण्यास अपयश आल्यानंतर ब्रिटिश प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टंटाईन यांनी पद सोडले, त्याजागी क्रोएशियाच्या राष्ट्रीय संघातून खेळलेल्या अनुभवी स्टिमॅक यांची वर्णी लागली. त्यांनी नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखविला. हे खेळाडू कॉन्स्टंटाईन यांच्या कारकिर्दीत संघात नव्हते. स्टिमॅक यांच्या पारख्या नजरेने खेळाडूंना हेरले. नवोदितांवर विश्वास दाखविला, त्याचे फळ मैदानावर मिळू लागले.

`फ्लाईंग` गुरप्रीत
 अगोदरच्या लढतीतील खराब बचावामुळे स्टिमॅक यांच्या प्रशिक्षण तंत्रावर टीका झाली. कॉन्स्टंटाईन यांचा भर लाँग-बॉल शैलीवर असायचा, तर स्टिमॅक यांच्या शैलीत खेळाडू चेंडूवर ताबा राखण्यास प्राधान्य देतात. संदेश झिंगन हा बचावफळीतील अनुभवी खेळाडू. त्याच्या साथीला स्टिमॅक यांनी दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारा आदिल खान, नवोदित राहुल भेके, मंदार राव देसाई यांना आणले. बचावफळीचा जम बसण्यास काही दिवस गेले ही बाब खरी असली, तरी आता खेळाडू स्थिरावत आहे. गुरप्रीतसिंग संधू या पंजाबी खेळाडूची गोलरक्षणातील कामगिरी अनन्यसाधारण ठरली. संपूर्ण ९० मिनिटांच्या खेळात गोलपोस्टसमोर चेंडू अडविण्यासाठी वारंवार हवेत झेपावणाऱ्या `फ्लाईंग` गुरप्रीतने साऱ्यांनाच अचाट कर्तृत्वाने थक्क केले. अर्जुन पुरस्कारप्राप्त हा २७ वर्षीय गोलरक्षक भारतीय फुटबॉल संघासाठी संकटमोचक ठरला. दोहा येथील लढतीत ९० मिनिटांच्या खेळात कतारच्या खेळाडूंनी भारतीय गोलक्षेत्रात प्रभाव पाडताना तब्बल २७ वेळा गोलच्या दिशेने फटके मारले, पण एकही प्रयत्न सफल ठरला नाही. दुसरीकडे भारतीय आघाडीफळीने क्वचितच आक्रमण केले आणि फक्त दोन वेळा गोलपोस्टचा वेध घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावरून गोलरक्षक गुरप्रीतच्या दक्ष, चपळ आणि एकाग्र कामगिरीचे प्रमाण मिळते.   

संबंधित बातम्या