तरुणाईची सरशी

किशोर पेटकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

क्रीडांगण
 

अमेरिकेची दिग्गज महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने १९९९ मध्ये पहिल्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीचा किताब जिंकला, तेव्हा बियांका आंद्रीस्कू या कॅनेडियन युवतीचा जन्मही झाला नव्हता. बियांका १६ जून २००० रोजी जन्मली. याच उदयोन्मुख खेळाडूने यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत इतिहास घडविला. ३८ वर्षांची `सुपर मॉम` सेरेनास बियांकासारखी सळसळती खेळाडू वरचढ ठरली. बियांकाने कारकिर्दीत प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला, त्यामुळे एकेरीतील २४ वे ग्रँड स्लॅम जिंकून मार्गारेट कोर्ट हिच्या उच्चांकाला गाठण्याची संधी सेरेनाने पुन्हा एकदा हुकली. मातृत्वानंतर दोन वर्षांत चौथ्यांदा ती ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत हरली. सेरेनास नमविल्यानंतर बियांका म्हणाली, `ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगूनच पुढे जात होते. खेळात सातत्य राखताना स्वप्नाच्या मागे धावणे सोडले नाही. त्यामुळेच मी हे यश मिळवू शकले.` बियांकाचा अमेरिकन ओपन स्पर्धेतील धडाका स्वप्नवत ठरला. तिला स्पर्धेत पंधरावे मानांकन होते. ही स्पर्धा जिंकणारी ती कॅनडाची पहिलीच महिला टेनिसपटू ठरली. या १९ वर्षीय खेळाडूने न्यूयॉर्कला अफलातून खेळ केला, त्यामुळे सेरेनाचा नेहमीचा ताकदवान खेळ अंतिम लढतीत फिका ठरला. तिला दोन सेट्समध्ये माघार घ्यावी लागली. अनुभवाने तरुणाईसमोर सपशेल हार पत्करली. 

जोरदार भरारी
 बियांकाचा खेळ नवोदितांसाठी प्रेरणादायी आहे. समोर सेरेनासारखी मातब्बर खेळाडू असूनही पहिल्याच ग्रँड स्लॅम अंतिम लढतीत खेळताना ती आत्मविश्वासाने भारलेली होती. दबावास दूर फेकून देत ती खेळली. अमेरिकन ओपन जिंकल्यामुळे तिला फायदा झाला आहे. आता ती जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आली आहे. मोसमाच्या प्रारंभी ती १७८ व्या स्थानी होती. यावरून तिच्या खेळातील प्रगती आणि भरारी लक्षात येते. सेरेनाप्रमाणे ती वलयांकित नाही, नवोदित हा शिक्काच कायम आहे. मोसमाच्या प्रारंभी बियांका यंदा ग्रँड स्लॅम जिंकणार आहे हे भाकीत करणे अविश्वसनीय होते, पण या जिगरबाज मुलीने ते शक्य करून दाखविले. कारकिर्दीत चौथ्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळताना तिने विजेतेपदास गवसणी घातली. दोन वर्षांपूर्वी बियांकाला विंबल्डनच्या पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. गतवर्षी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या पात्रता फेरीतच बियांका गारद झाली होती. या वर्षी तिने खेळात सुधारणा घडवून आणली, पण ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीचा टप्पा पार करणेही तिला जमले नाही. तिची जिद्द आणि चिकाटी कमालीची होती. त्यामुळेच हार्ड कोर्टवर तिचा खेळ खुलला. विंबल्डनच्या हिरवळीवर ती यंदा खेळली नाही. अमेरिकन ओपनमध्ये बाजी मारण्यापूर्वी तिने यावर्षी हार्ड कोर्टवरील दोन स्पर्धा जिंकल्या. इंडियन वेल्स ओपनमध्ये तिने अँजेलिक केर्बरला नमविले. कॅनेडियन ओपनमध्ये तिच्यासमोर सेरेनाचे आव्हान होते, पण दुखापतीमुळे अमेरिकन खेळाडूने माघार घेतली आणि बियांकाला अनायासे विजेतेपद मिळाले.

सेरेनाचे `फायनल` अपयश
 सेरेनाने अमेरिकन ओपनमध्ये शतकी विजय नोंदविला, पण अंतिम फेरीत पराभूत होण्याची मालिका कायम राहिली. फ्लशिंग मेडोजवर सेरेनाने सहा वेळा एकेरीचा करंडक उंचावत जल्लोष केला आहे. १९९९ ते २०१९ हा २० वर्षांचा प्रदीर्घ कालावधी. गंभीर आजारावर मात केल्यानंतर, सेरेनाने मातृत्वाची जबाबदारीही पेलली, तरीही तिच्या खेळातील आक्रमकता कमी झाली नाही. यावेळी सेरेनाने दहाव्यांदा अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठली. मार्गारेट कोर्टला गाठण्यासाठी तिला फक्त एक विजय हवा होता, पण तो साध्य झाला नाही. त्यामुळे ही दिग्गज महिला टेनिसपटू हिरमुसली. अंतिम फेरीत पराभूत होण्याची सल तिने व्यक्त केली. त्याचवेळी अजूनही सर्वोत्तम खेळ करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे सांगत पुढील वर्षीच्या मोसमासाठी ग्रँड स्लॅम कोर्टवर उतरण्याचे ध्येय व्यक्त केले. सेरेना अजूनही चांगली खेळते, पण अंतिम फेरीत नव्या दमाच्या खेळाडूंविरुद्ध तिचा खेळ कोलमडतो. गेल्या वर्षी विंबल्डनच्या अंतिम लढतीत तिला जर्मनीच्या अँजेलिक केर्बर हिने हरविले. गतवर्षी सेरेनाने न्यूयॉर्कमधील स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, मात्र जपानच्या नाओमी ओसाकाचा झंझावात ती रोखू शकली नाही. यंदाच्या मोसमात विंबल्डनच्या हिरवळीवर सेरेना पुन्हा अंतिम फेरीत दाखल झाली, रुमानियाच्या सिमोना हालेप हिला ती रोखू शकली नाही. अमेरिकन ओपन ही तिची घरची स्पर्धा, अंतिम फेरीपर्यंत तिने दणक्यात वाटचाल केली, परंतु बियांकाने कमाल केली.

संबंधित बातम्या