भारतीयांची आश्वासक कुस्ती

किशोर पेटकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

क्रीडांगण
 

महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीत ब्राँझपदक जिंकले. भारतीय क्रीडापटूचे हे ऑलिंपिकमधील पहिले वैयक्तिक पदक ठरले. २०१६ मध्ये रिओ द जानेरो ऑलिंपिकमध्ये साक्षी मलिक हिने महिला कुस्तीत ब्राँझपदक पटकावले. ऑलिंपिकमध्ये कुस्तीत पदक जिंकणारी साक्षी पहिली भारतीय महिला ठरली. याशिवाय नावाजलेला मल्ल सुशील कुमार याने ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. त्याने २००८ मधील बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझ, तर २०१२ मधील लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. लंडन ऑलिंपिकमध्ये मल्ल योगेश्वर दत्त यानेही ब्राँझपदकाची प्राप्ती केली. १९५२ ते २०१६ या कालावधीत भारतीय कुस्तीगिरांनी ऑलिंपिक स्पर्धेत एकूण पाच पदके जिंकली. एकंदरीत कुस्ती हा ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदकविजेता खेळ ठरला आहे. मागील तीन ऑलिंपिक स्पर्धांत कुस्तीत भारताला किमान एक पदक मिळालेले आहे. आता २०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेतही भारताला कुस्तीत पदकांची आशा आहे. कझाखस्तानमधील नूर-सुलतान येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेद्वारे चार भारतीयांनी टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविली. महिला गटात विनेश फोगट हिने ५३ किलो फ्रीस्टाइलमध्ये ब्राँझपदकासह ऑलिंपिक कोटा मिळविला. दुखापतीमुळे दीपक पुनिया अंतिम लढतीच्या आखाड्यात उतरू शकला नाही, पण ८६ किलो गटात रौप्यपदकासह त्याने टोकियोचे तिकीट पक्के केले. बजरंग पुनिया याने ६५ किलो गटात, तर रवी कुमार याने ५७ किलो गटात ब्राँझपदकासह ऑलिंपिक वारी निश्चित केली. महाराष्ट्राच्या राहुल आवारे यानेही ६१ किलो गटात ब्राँझपदक जिंकले, पण त्याचा वजनगट ऑलिंपिकमध्ये नसल्यामुळे आवारेला प्रतीक्षा करावी लागेल.

उत्कृष्ट कामगिरी
 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत नूर-सुलतान येथे भारताने सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. एका रौप्यपदकासह भारताला या स्पर्धेत एकूण पाच पदके मिळाली. यापूर्वी २०१३ मध्ये भारताने तीन पदके जिंकली होती, यावेळी ती कामगिरी मागे पडली. जागतिक कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये भारतीयांची आश्वासक कामगिरी लक्षात घेता, अपेक्षा वाढल्या आहेत. सुशील कुमार याचे पुनरागमन नूर-सुलतान येथे यशस्वी ठरू शकले नाही, तरीही बाकी कुस्तीगिरांची कामगिरी सुखावणारी आहे. टोकियो ऑलिंपिकपर्यंत पात्र कुस्तीगिरांना सुमारे वर्षभराचा कालावधी मिळत आहे. तंत्र आणि डावपेचात आणखी सुधारणा करून मॅटवर अधिक प्रभावी कुस्ती खेळण्याची संधी भारतीयांना लाभेल. सारे काही अपेक्षित घडून आल्यास, पुढील वर्षीच्या ऑलिंपिक स्पर्धेतही भारताला कुस्तीत पदक नक्कीच मिळू शकते. देशात आता कुस्तीला वलय प्राप्त झाले आहे. कुस्तीपटूंना सार्वत्रिक ओळख लाभत आहे. ऑलिंपिक स्पर्धेतील पदकामुळे या खेळावर प्रकाशझोत आलेला आहे. टोकियो ऑलिंपिकसाठी पुरुष व महिला गटात मिळून भारताला चार जागा मिळालेल्या आहेत, आणखी काही कुस्तीगीर पात्र ठरण्याचे संकेत आहेत.

विनेशने अपेक्षा उंचावल्या
 रिओ ऑलिंपिकमध्ये महिला कुस्तीत विनेश फोगट पदकाची दावेदार होती, तेव्हा ती ४८ किलो वजनगटात होती. सुरुवातीपासून देशातील एक सर्वोत्तम महिला कुस्तीपटू हा विनेशचा लौकिक आहे. मात्र, दुखापतीमुळे विनेशला असह्य वेदना आणि अश्रूंसह रिओ ऑलिंपिक नगरी सोडावी लागली. शरीर साथ देत नसल्याने उपांत्यपूर्व फेरीतील लढत तिने अर्ध्यावर सोडली. तिला स्ट्रेचरवरून बाहेर न्यावे लागले. विनेशच्या पायाची दुखापत गंभीरच होती, कदाचित कारकीर्दही संपली असती. आखाड्यातील मॅटवर आता विनेशने पुन्हा जबरदस्त प्रगती प्रदर्शित केली आहे. मागील ऑलिंपिकमध्ये भंगलेले पदकाचे स्वप्न टोकियोत साकारण्याची तिला संधी आहे. विनेश आता ५३ किलो वजनगटात स्थिरावली आहे. यावर्षी ती ५० किलो वजनगटातही खेळली, पण जागतिक स्पर्धेत ५३ किलोगटातील पदकामुळे तिचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. हाच वजनगट आपल्यास ऑलिंपिकमध्ये पदक देऊ शकतो हे तिने ओळखले आहे. नूर-सुलतान येथे २५ वर्षीय विनेशने कारकिर्दीतील पहिले जागतिक स्पर्धा पदक जिंकले आहे. लग्नानंतरही तिची कुस्ती प्रगतिपथावर राहिली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विनेश विवाह बंधनात अडकली. तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड आणि कुस्तीगीर सोमवीर राठी याच्याशी तिचे लग्न झाले. तिला आणि तिच्या खेळाला समजून घेणारा नवरा भेटला, प्रोत्साहन कायम राहिले, परिणामी चौथ्यांदा जागतिक स्पर्धेत भाग घेताना विनेश पदक जिंकू शकली. तसेच ऑलिंपिकसाठीही पात्रता मिळविली. विनेशचा निर्धार आणि मेहनत लक्षात घेता, तिला टोकियोत पदकासह जल्लोष करणे शक्य आहे. हंगेरीच्या वॉलर अकॉस या वैयक्तिक प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली साक्षीची प्रगती योग्य दिशेने आहे हे जागतिक पदकाने सिद्ध झाले आहे.  

संबंधित बातम्या