सायकलिंगमध्ये प्रगती

किशोर पेटकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

क्रीडांगण
 

सायकलिंग या खेळात भारतीयांची कामगिरी स्पृहणीय ठरत आहे. मागील दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील भारतीयांची कामगिरी पाहता, शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या या क्रीडा प्रकारात देशातील खेळाडू प्रगती साधताना दिसले. सायकलिंगमध्ये खेळाडूच्या तंदुरुस्तीचा प्रचंड प्रमाणात कस लागतो. अतिशय वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या सरस सायकलिंग करणाऱ्यालाच या खेळात टिकून राहता येते. भारतीय सायकलिंगचा विचार करता मणिपूर, अंदमान-निकोबारमधील नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेले सायकलपटू आंतरराष्ट्रीय सायकल ट्रॅकवर तिरंगा फडकावताना दिसत आहेत. दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारतीयांनी लाजवाब सायकलिंग केले. त्यामुळे देशातील युवा सायकलपटूंनी आता अपेक्षा उंचावल्या आहेत. ऑगस्टमध्ये जर्मनीत झालेल्या जागतिक ज्युनिअर सायकलिंग स्पर्धेत भारताला तीन पदके मिळाली, तर नवी दिल्लीत झालेल्या आशिया कप ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताने १० सुवर्णपदकांसह २५ पदके जिंकली. पुरुष गटात मणिपूरचा रोनाल्डो लैटॉनजाम, पोर्ट ब्लेअरचा एसो अल्बेन यांचे सायकलिंग उठावदार आहे. अल्बेन सध्या सायकलिंगमधील केरिन व स्प्रिंट प्रकारात ज्युनिअर गटात जगातील अव्वल सायकलपटू आहे. देशाच्या ईशान्य भागातील, तसेच अंदमान बेटावरील गुणवान सायकलपटूंना घरच्यांपासून दूर राहत, भरारी घेण्यासाठी दिल्लीत यावे लागले. देशासाठी आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्याच्या ध्येयाने पछाडलेले युवा सायकलपटू राष्ट्रीय सायकलिंग अकादमीत घाम गाळताना दिसतात. आशियायी क्रीडा स्पर्धेत पदके जिंकणे, ऑलिंपिक पात्रता मिळविणे हेच उद्दिष्ट भारतीय सायकलपटूंसमोर ठेवण्यात आले आहे.

एसोचा धमाका
पोर्ट ब्लेअरमधील एलो अल्बेन हा फक्त १८ वर्षांचा आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक आर. के. शर्मा यांचे मार्गदर्शन या प्रतिभाशाली सायकलपटूसाठी मौल्यवान ठरले आहे. जर्मनीत झालेल्या जागतिक ज्युनिअर सायकलिंग स्पर्धेत त्याने तीन पदके जिंकून भारतीय सायकलिंगमध्ये नवा इतिहास रचला. सहकारी रोनाल्डो, जेम्स सिंग व रोजीत सिंग यांच्या साथीत त्याने देशाला जागतिक सायकलिंगमध्ये सांघिक स्प्रिंट प्रकारात आशियायी विक्रमासह सुवर्णपदक जिंकून दिले. जागतिक सायकलिंगमधील भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली. एसो याने जागतिक स्पर्धेत आणखी दोन वैयक्तिक पदकेही जिंकली. वैयक्तिक स्प्रिंट प्रकारात तो रौप्य, तर केरिन प्रकारात ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. एसो याचे वडील अल्बान दिदूस हे सायकलपटू, तर आई नेली या राष्ट्रीय पातळीवरील महिला कबड्डीपटू. लहानपणी पोर्ट ब्लेअरमध्ये एसो बरेच खेळ खेळायचा. फुटबॉल, धावणे, उंचउडी, जलतरण, रोविंग या क्रीडाप्रकारात तो पारंगत होता. रोविंग प्रशिक्षण केंद्रात जाण्यासाठी तो सायकलचा वापर करत असे. सायकलिंगमध्ये कारकीर्द करण्यास त्याला आईचे बहुमोल प्रोत्साहन लाभले. २०१५ मध्ये तिरुअनंतरपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या सबज्युनिअर गटात एसो याने दोन रौप्यपदके जिंकली. त्यावेळी त्याच्या गुणवत्तेने राष्ट्रीय प्रशिक्षकांना प्रभावित केले आणि एसोच्या सायकलिंगने भन्नाट वेग घेतला. गतवर्षी स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक ज्युनिअर सायकलिंगमध्ये एसोने केरिन प्रकारात रौप्यपदक जिंकून ऐतिहासिक झेप घेतली होती. जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय सायकलपटू ठरला होता. यावर्षी जागतिक ज्युनिअर स्पर्धेत तीन पदके जिंकण्यापूर्वी एसो याने इंडोनेशियात झालेल्या आशियायी अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून धडाका राखला होता.

रोनाल्डोची छाप
दिल्लीत झालेल्या आशियायी ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत मणिपूरच्या रोनाल्डो लैटॉनजाम याची कामगिरी भन्नाट ठरली. भारताच्या १० सुवर्णपदकांत चार वेळा रोनाल्डोने विजेतेपदाचा मान मिळविला. त्याने छाप पाडताना ज्युनिअर गटातील २०० मीटर टाइम ट्रायल प्रकारात आशियायी विक्रमही प्रस्थापित केला. त्याने चीनचा सायकलपटू लिऊ की याचा अगोदरचा आशियायी विक्रम मोडून भारतीयांची आशियायी सायकलिंगमधील प्रगती अधोरेखित केली. दिल्लीतील स्पर्धेत आशियायी १६ देशांतील सुमारे दीडशे स्पर्धक होते. रोनाल्डोसुद्धा राष्ट्रीय प्रशिक्षक आर. के. शर्मा यांचा प्रशिक्षणार्थी आहे. ब्रिटनचा सहा वेळचा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता सायकलपटू जेसन केनी याला रोनाल्डो 
आदर्श मानतो. शालेय जीवनात तो पट्टीचा जलतरणपटू होता. पदके जिंकण्यासाठी 
नव्हे, शारीरिक तंदुरुस्तीसाठी तो जलतरण करायचा. त्यानंतर तो सायकलिंगकडे आकर्षित झाला. राष्ट्रीय पदके जिंकण्यास सुरुवात झाल्यानंतर या गुणवान मणिपुरी मुलाने मागे वळून पाहिलेच नाही. त्याने २०२२ मधील आशियायी क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल स्पर्धा, तसेच २०२४ मधील लॉस एंजलिस ऑलिंपिक स्पर्धेचे लक्ष्य बाळगले आहे.  

संबंधित बातम्या