महिलांची क्रिकेट पंचगिरी

किशोर पेटकर
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

क्रीडांगण
 

क्रिकेटमधील पंचगिरी आता केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही क्रिकेट मैदानावर मोठ्या उमेदीने पंचगिरी करताना दिसतात. यावर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लेअर पोलोसॅक हिने पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात पंचगिरी करणारी पहिली महिला पंच हा मान मिळविला. भारतीय महिलाही आता क्रिकेट पंचगिरीत रस दाखवत आहेत. मुंबईतील वृंदा राठी व तामिळनाडूतील चेन्नईच्या जननी नारायणन यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या क्रिकेट पंच परीक्षेत यश प्राप्त करत मैदानावर खंबीर पाऊल टाकले आहे. वृंदा, तसेच जननी केवळ महिलांच्याच नव्हे, तर मुलांच्या गटातील सामन्यांतही पंचगिरी करताना दिसतात. गतवर्षी वृंदा आणि जननी यांनी स्पर्धात्मक क्रिकेट पंचगिरीत पदार्पण केले. यंदाच्या मोसमात ऑक्टोबरमध्ये १६ वर्षांखालील स्पर्धेत गोवा आणि केरळ यांच्यातील सामन्यात वृंदा आणि जननी पुन्हा मैदानावर पंचगिरी करताना दिसल्या. रणरणत्या उन्हात या दोघी समर्थपणे पंचगिरी करताना दिसतात. मुलेही त्यांना आदर देत आहेत. वृंदा आणि जननी यांनी इतर भारतीय महिलांसमोर आदर्श ठेवला आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड देशात महिला क्रिकेट पंचगिरीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. भारतातही हे शक्य असल्याचे वृंदा आणि जननी यांनी सिद्ध केले आहे. यावर्षीच्या प्रारंभी वृंदा पंचगिरीतील दुसऱ्या श्रेणीतील परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. मुंबईतील पुरुषांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेतही त्यांनी पंचगिरी केलेली आहे. 

खेळाडू ते क्रिकेट पंच
 वृंदा राठी यांना क्रिकेट परके नाही. त्या माजी क्रिकेटपटू आहेत. मुंबई विद्यापीठाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. निवृत्तीनंतर त्यांनी क्रिकेट स्कोअरिंगमध्ये पारंगतता मिळविली. बीसीसीआयची स्कोअरिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्कोअरर या नात्याने उत्तम काम बजावले. खेळाडू, स्कोअरर या नात्याने ठसा उमटविल्यानंतर त्या आता क्रिकेट पंचगिरीत स्थिरावल्या आहेत. २००८-०९ मध्ये मुंबई विद्यापीठाने अखिल भारतीय महिला क्रिकेट स्पर्धा जिंकली. त्या संघात वृंदा यांचा समावेश होता. २०१३ मध्ये महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेत स्कोअरिंग करताना त्यांच्या कारकिर्दीने मोठे वळण घेतले. न्यूझीलंडच्या माजी महिला क्रिकेट पंच कॅथी क्रॉस यांनी वृंदा यांना प्रभावित केले व त्यांनी क्रिकेट पंच होण्याचा निश्चय केला. क्रिकेट सामन्यात पंचगिरी करताना शारीरिक आणि मानसिक कणखरतेचा कस लागतो असे वृंदा यांना वाटते. योग्य निर्णय घ्यावे लागतात, तेव्हाच खेळाडूंकडून आदर मिळतो हे त्यांचे मत आहे. क्रिकेट प्रेमापोटी जननी यांनीही कडक उन्हात पंचगिरी करण्याचे आव्हान स्वीकारले.  जननी यांच्यासाठी क्रिकेट पंचगिरीत माजी पंच डेव्हिड शेफर्ड व एस. व्यंकटराघवन हे आदर्शवत आहेत. वृंदा यांनी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये मणिपूर व मिझोराम यांच्यातील २३ वर्षांखालील पुरुष गटातील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात सर्वप्रथम पंचगिरी केली. नंतर गतवर्षी नोव्हेंबरमध्येच वृंदा व जननी यांनी त्रिपुरा व आंध्र यांच्यातील १९ वर्षांखालील मुलांच्या कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्यात सर्वप्रथम एकत्रित पंचगिरी केली.

महिला क्रिकेट सामनाधिकारी
 यावर्षी प्रारंभी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ५१ वर्षीय जी. एस. लक्ष्मी यांची आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनलमध्ये नियुक्ती केली. हा मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. लक्ष्मी या माजी क्रिकेटपटू आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सामनाधिकारी या नात्याने चोख कामगिरी बजावल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय मैदानावर संधी मिळाली आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू निवृत्तीनंतर क्रिकेट सामनाधिकारी होण्यात रस दाखवत आहेत. गोव्यात झालेल्या १६ वर्षांखालील सामन्यात मैदानावर वृंदा राठी व जननी नारायणन पंचगिरी करत होत्या, तर राजस्थानच्या मीनाक्षी मंगला या सामनाधिकारी होत्या. हा दुर्मीळ योग ठरला. गतवर्षी पाँडेचेरी येथे झालेल्या १९ वर्षांखालील सामन्यात वृंदा व जननी या पंच, तर सामनाधिकारीही महिला होत्या. यंदा पुन्हा एकदा योग जुळून आला. सामनाधिकारी झालेल्या मीनाक्षी या राजस्थानच्या माजी क्रिकेटपटू. २०११ मध्ये त्यांचे लग्न झाले. नंतर मुलगा जन्मला. गृहिणी झालेल्या मीनाक्षी यांना क्रिकेटची आवड संथ बसू देईना. मुलगा मोठा होऊ लागला, पती, सासू-सासरे यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले, त्यामुळे मीनाक्षी यांनी बीसीसीआयची सामनाधिकारी परीक्षा दिली व त्या उत्तीर्ण झाल्या. गतमोसमापासून त्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सामनाधिकारी या नात्याने कार्य बजावत आहे.     

संबंधित बातम्या