भारतात डे-नाईट कसोटी

किशोर पेटकर
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

क्रीडांगण

माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, देशातील क्रिकेटमध्ये क्रांतिकारी निर्णयांची अपेक्षा होती. झालेही तसेच. गेली चार वर्षे प्रकाशझोतातील (डे-नाईट) कसोटी क्रिकेटला नाक मुरडणाऱ्या टीम इंडियाने संमती देताच देशातील पहिल्या डे-नाईट कसोटी क्रिकेट सामन्याचा मुहूर्त ठरला. भारत आणि बांगलादेश यांच्यात २२ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर होणारा कसोटी सामना माईलस्टोन असेल. कारण, भारत तसेच बांगलादेशने अजून डे-नाईट कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. भारतीय वातावरणातही प्रथमच प्रकाशझोतातील कसोटी क्रिकेटचा आस्वाद क्रिकेटप्रेमी घेणार आहेत. याकामी सौरव गांगुली यांचा पुढाकार निर्णायक ठरला. बांगलादेश क्रिकेट मंडळाची त्यांनी मान्यता मिळविली. 
गांगुली यांनी भारताचा कर्णधार विराट कोहली याच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळविला. साहजिकच प्रकाशझोतातील कसोटीचा मार्ग मोकळा झाला. भारतीय क्रिकेटमधील ही फार मोठी घडामोड आहे, असे सांगत गांगुली यांनी देशातील पहिल्यावहिल्या दिन-रात्र कसोटी क्रिकेट सामन्याचे महत्त्व विषद केले. या कसोटीत प्रतिथयश मान्यवर उपस्थित राहणार असल्यामुळे सामनाही हाय-व्हॉल्टेज झाला आहे. आतापर्यंत भारतीय संघाने दिवसा खेळले जाणारे कसोटी क्रिकेट अनुभवले आहे. अर्धा खेळ दिवसा आणि अर्धा खेळ प्रकाशझोतात असेही स्वरूप असलेल्या कसोटी लढतीत भारतीय क्रिकेटपटू प्रथमच खेळत असल्याने खेळाडूंच्या कामगिरीकडेही साऱ्यांचे लक्ष असेल. गांगुली यांनी कर्णधार या नात्याने भारतीय क्रिकेटमधील आक्रमकतेची वेगळी ओळख साऱ्या जगाला करून दिली, अध्यक्ष या नात्याने माजी कर्णधाराने आता आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.

आव्हानेही आहेत...
 जगभरात विविध देशांत प्रकाशझोतातील कसोटी क्रिकेट सामने झालेले आहेत, पण भारतीय उपखंडात प्रथमच कृत्रिम प्रकाशात कसोटी सामना खेळला जात आहे. पाकिस्तान दुबईतील होम मैदानावर डे-नाईट कसोटी खेळला आहे, तर श्रीलंकेचा संघ परदेशात अशाप्रकारच्या वातावरणात खेळलाय. साहजिकच भारतासाठी ईडन गार्डन्सवरील कसोटी सामन्याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. त्याचवेळी आव्हानेही असतील. भारतीय क्रिकेटपटू एकदिवसीय, तसेच टी-20 या झटपट प्रकारात डे-नाईट पद्धतीने भरपूर क्रिकेट खेळतात. पण कसोटी क्रिकेट खेळण्याची पहिलीच वेळ असल्याने खेळाडूंना नव्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. दिवसा होणाऱ्या कसोटीत लाल चेंडूने कसे खेळावे हे भारतीय क्रिकेटपटूंना पक्के माहीत आहे, पण गुलाबी चेंडूने उपखंडातील खेळपट्ट्यांवर कसोटी खेळण्याचा अनुभव वेगळाच असेल. वातावरणानुसार खेळपट्टीचे स्वरूपही बदलू शकते. त्यातच भारतातील डे-नाईट क्रिकेट दवाच्या प्रमाणावरही अवलंबून असते हे यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेले आहे. साहजिकच नाणेफेकीच्या कौलापासून सामना आव्हानात्मक असेल. संघ निवडही विचारपूर्वक करावी लागेल. गुलाबी चेंडूवरील गोलंदाजाची पकड, चेंडूचा स्विंग या बाबीही निर्णायक असतील. दुपारनंतरची उष्णता, आर्द्रता, संध्याकाळचे काहीसे थंड वातावरण हे हवामानातील बदलही प्रतिकूल-अनुकूल ठरू शकतात. प्रकाशझोतातील आणि गुलाबी चेंडूच्या क्रिकेटचा अनुभव नसला, तरी भारतीय क्रिकेटपटू पक्के व्यावसायिक आहेत, त्यामुळे ते निश्चितच नव्या बदलाशी जुळवून घेतील.

बारावा कसोटी सामना
 भारत आणि बांगलादेश यांच्यातील ईडन गार्डन्सवरील प्रकाशझोतातील सामना दुपारी एक वाजता सुरू होईल आणि खेळ रात्री आठ वाजेपर्यंत चालेल. डे-नाईट कसोटीची भारतातील पहिलीच वेळ असली, तर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या अन्य देशांसाठी या प्रकारचे क्रिकेट नवे नाही. आतापर्यंत अकरा कसोटी क्रिकेट सामने डे-नाईट पद्धतीने खेळले गेले आहेत. भारत व बांगलादेशचा अनुभव वगळता अन्य कसोटी क्रिकेट देशांनी दिन-रात्र क्रिकेटची लज्जत अनुभवली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारी कसोटी ही डे-नाईट प्रकारची बारावी कसोटी आहे. सर्वप्रथम प्रकाशझोतातील कसोटी क्रिकेटचे यजमानपद ऑस्ट्रेलियाने भूषविले. २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१५ या कालावधीत अॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचे आव्हान स्वीकारले. तेव्हापासून ऑस्ट्रेलियात प्रकाशझोतातील कसोटी क्रिकेट नित्याचेच झाले आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान (दुबईत), श्रीलंका (परदेशात) हे देशही क्रिकेटमधील या नव्या प्रयोगाचे वारकरी झालेले आहेत. भारत-बांगलादेश सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध दिन-रात्र कसोटी क्रिकेट सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाची या प्रकारच्या क्रिकेटमधील रुची पाहता, डे-नाईट कसोटी क्रिकेट सामन्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे. क्रिकेटप्रेमींचाही त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे. भारतात डे-नाईट कसोटी क्रिकेटला प्रेक्षकांचा कितपत पाठिंबा लाभतो हे पाहणेही उत्सुकतेचे असेल.

संबंधित बातम्या