जपानी नाओमी

किशोर पेटकर
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

क्रीडांगण
 

महिला टेनिसमधील सध्याच्या काळातील आघाडीचे नाव असलेल्या नाओमी ओसाका हिने दुहेरी नागरिकत्व टाळताना जपानला प्राधान्य दिले आहे. ही २२ वर्षांची गुणवान टेनिसपटू अमेरिकेत राहते, पण जपान तिची मातृभूमी आहे. तिची आई जापनीज आहे आणि वडील हैतीचे आहेत.

पुढील वर्षी टोकियोत ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. नाओमीला या स्पर्धेत आपल्या मातृभूमीचे प्रतिनिधित्व करायचे होते, पण त्यासाठी तिला कायद्याचा अडथळा पार करणे आवश्यक होते. जपानी कायद्यानुसार, एखाद्याकडे दुहेरी नागरिकत्व असेल, तर त्याला जपानी होण्यासाठी २२ व्या वाढदिवसापूर्वी दुहेरी देशाचे नागरिकत्व त्यागणे बंधनकारक असते. टोकियो ऑलिंपिक नजरेसमोर ठेवून नाओमीने कायद्याचा अडथळा पार केला. पश्चिम जपानमधील ओसाका येथे जन्मलेली ही टेनिसपटू आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टवर आपल्या आईच्या नावाने प्रसिद्ध आहे. वडील लिओनार्ड फ्रँकोईस यांचे ती नाव लावत नाही. तिने आई तामाकी ओसाका यांची ओळख जपली आहे. १६ ऑक्टोबर १९९७ रोजी जन्मलेली ही महिला टेनिसपटू आता पूर्णतः जपानी असेल व टोकियो ऑलिंपिकमध्ये ती या देशाचे प्रतिनिधित्व करू शकेल. नाओमीच्या पालकांनी जपानमधून अमेरिकेत स्थलांतर केले, तेव्हा ती अवघी तीन वर्षांची होती. न्यूयॉर्कमध्ये वडिलांच्या प्रोत्साहनामुळे नाओमी टेनिस खेळू लागली. २०१३ मध्ये तिने आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टवर व्यावसायिक टेनिसपटू या नात्याने पाऊल टाकले. 

जपानचे स्वप्न साकारणार? 
नाओमी ओसाका ही जागतिक महिला टेनिस एकेरी क्रमवारीत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी जानेवारीत तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन प्राप्त करताना महिला एकेरीत अव्वल क्रमांक पटकाविला होता. गतवर्षी अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम लढतीत महान महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला हरवून नाओमीने कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम यश साकारले होते. असा पराक्रम बजावणारी ती पहिली जपानी महिला टेनिसपटू ठरली होती. यावर्षी तिने कारकिर्दीतील दुसरा ग्रँड स्लॅम किताब जिंकताना पेट्रा क्विटोवा हिला हरवून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. सध्या नाओमी आशियातील सर्वोत्तम महिला टेनिसपटू मानली जाते. तिचा खेळ पाहता, टोकियो ऑलिंपिकमध्ये जपानला यजमान या नात्याने टेनिसमध्ये नाओमीकडून पदक मिळण्याची शक्यता आहे. ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासात जपानने यापूर्वी कधीच टेनिस खेळात पदक जिंकलेले नाही. ही उणीव नाओमी निश्चितच भरून काढेल असा विश्वास टोकियो ऑलिंपिक आयोजकांना वाटत आहे. मिश्रवर्णीय नाओमी जपानमध्ये लोकप्रिय आहे. तेथील उत्पादनांच्या जाहिरातीतही झळकते. ऑलिंपिकमध्ये जपानचे प्रतिनिधित्व करण्याची भावना विशेष आणि अभिमानास्पद असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे. आपण जपानी असल्याचा नाओमीला अभिमान आहे. ती सराईतपणे जपानी भाषा बोलू शकत नाही, पण मातृभाषा तिला समजते. जपानी भाषेतील प्रश्नांना ती इंग्रजीत उत्तरे देते. तिच्या आईने आपल्या दोन्ही मुलींचे पालनपोषण जपानी आणि हैतीयन संस्कृती जपत केले आहे. जपानमध्ये अजूनही मिश्रवर्णीयांकडे पाहण्याची नजर थोडी वेगळी असते, तरीही सध्या परिस्थिती बदलत आहे. नाओमीने टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकल्यास त्या देशातील मिश्रवर्णींयांसाठी मोठा सन्मानच असेल. मिश्रवर्णीयांचे प्रतिनिधित्व करत जपानसाठी लौकिकप्राप्त कामगिरी बजावण्याची संधी नाओमीला टेनिस कोर्टवर लाभत आहे. यापूर्वी तिने जपानचे विविध स्पर्धांत प्रतिनिधित्व केलेले आहे, पण केवळ जपानी नागरिक या नात्याने ऑलिंपिकसारखी मोठी स्पर्धा खेळण्याची नाओमीची पहिलीच वेळ असेल.

खेळासाठी नागरिकत्वाचा त्याग
क्रीडा मैदानावरील आपल्या मूळ देशाच्या नागरिकत्वाचा त्याग केल्याची खूप उदाहरणे आहे. विशेषतः आफ्रिकेतील क्रीडापटू मोठ्या प्रमाणात युरोपियन अथवा पश्चिम आशियायी देशात स्थलांतर करतात. कायद्याच्या चौकटीत राहून दत्तक देशाचे नागरिकत्व मिळवितात आणि विविध स्पर्धांत त्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. चांगल्या सुविधा, कारकिर्दीस बहर देणे आणि मोठ्या प्रमाणात पैसा हा मूळ देश सोडण्यामागचा आफ्रिकी क्रीडापटूंचा मुख्य उद्देश असतो. आफ्रिकेतील धावपटू अॅथलेटिक्समध्ये पश्चिम आशियायी देशांकडून याच कारणास्तव खेळतात. फुटबॉलमध्येही हेच चित्र दिसते. टेनिसमध्येही देश बदललेले खेळाडू आहेत. नाओमीचा निर्णय पूर्णतः वेगळा आहे. अमेरिकेत ती स्थिरावलेली आहे. व्यावसायिक टेनिसपटू या नात्याने तिच्याकडे भरपूर पैसा आहे. अमेरिका आणि जपान या दोन्ही देशांचे नागरिकत्व तिच्या कारकिर्दीआड येत नव्हते, तरीही केवळ मातृभूमीप्रती ममत्व आणि ओढ या कारणास्तव तिने ऑलिंपिक सहभागासाठी जपानच्या नागरिकत्वाला प्राधान्य दिले ही बाब उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहे. 

संबंधित बातम्या