महिलांना हॉकीत ऑलिंपिक तिकीट

किशोर पेटकर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

क्रीडांगण
 

पुरुष हॉकीच्या तुलनेत भारतातील महिला हॉकीवर कमीच प्रकाशझोत असतो. ऑलिंपिकचा विचार करता, महिला संघ यापूर्वी दोन वेळा जगातील सर्वांत मोठ्या क्रीडा महोत्सवात खेळलेला आहे. १९८० मध्ये मॉस्कोतील ऑलिंपिक स्पर्धेत सर्वप्रथम खेळण्याची संधी भारतीय हॉकी संघाला मिळाली. तेव्हा त्यांना चौथा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर तब्बल ३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय महिला हॉकीपटू ऑलिंपिक स्पर्धेत खेळल्या. २०१६ च्या ''रिओ द जानेरो''त महिला हॉकी संघाने देशाचे प्रतिनिधित्व केले, मात्र कामगिरी निराशाजनकच ठरली. पाच पैकी चार सामने गमावलेल्या संघाला शेवटचा बारावा क्रमांक मिळाला. त्या पार्श्वभूमीवर भारताचा महिला हॉकी संघ सलग दुसऱ्यांदा ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. २०२० मध्ये टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय संघ खेळताना दिसेल. ऑलिंपिकमधील भारतीय महिला हॉकी संघाचे ते तिसरेच प्रतिनिधित्व असेल. यावेळच्या ऑलिंपिक पात्रतेसाठीही भारतीय महिला संघास संघर्ष करावा लागला. अमेरिकेविरुद्धच्या पात्रता फेरीतील दोन टप्प्यानंतर ६-५ गोलसरासरीनंतर पुढील वर्षी टोकियोस जाण्यासाठी तिकीट निश्चित झाले. कर्णधार राणी रामपाल हिची कामगिरी स्पृहणीय ठरली. चार वर्षांपूर्वी (२०१५ मध्ये) ऑलिंपिक पात्रता फेरीत राणी हिनेच जपानविरुद्ध निर्णायक कामगिरी केली होती. या वर्षी पुन्हा राणी हिच्याच बहारदार खेळामुळे भारताला ऑलिंपिक महिला हॉकी स्पर्धेत जागा मिळाली. 

निर्णायक गोल...
 भारत आणि अमेरिका यांच्यातील ऑलिंपिक पात्रता लढत ओडिशात झाली. पहिल्या टप्प्यात भारतीय महिलांनी ५-१ अशा दणदणीत फरकाने विजयास गवसणी घातली. त्यामुळे शूएर्ड मरिन यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघासाठी दुसऱ्या टप्प्यातील लढत केवळ औपचारिकता ठरली होती. पण अमेरिकन महिलांनी जबरदस्त मुसंडी मारली. त्यांनी ४-० अशी मजबूत आघाडी घेत, भारतीय संघाच्या गोटात खळबळ माजविली. सामना चांगलाच रंगला, अखेरीस राणी रामपाल हिचा दीर्घ अनुभव यजमानांच्या कामी आला. तिने सामन्याच्या ४८ व्या मिनिटास केलेला गोल भारतासाठी लाखमोलाचा ठरला. त्यामुळेच गोलसरासरीवर भारताची सरशी झाली. हरयाणात जन्मलेली राणी ही भारतीय महिला हॉकी संघाची आधारस्तंभ आहे. अमेरिकेविरुद्ध ही २४ वर्षीय खेळाडू लौकिकास जागली. रिओ ऑलिंपिकमध्ये खेळलेल्या महिला संघात राणीचा समावेश होता. वयाच्या १५ व्या वर्षी २०१० मध्ये विश्वकरंडक स्पर्धेत खेळलेल्या राणीपाशी अफाट अनुभव आहे आणि त्या बळावर तिने सध्या भारतीय महिला संघाचा भार आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलला आहे. गतवेळच्या ऑलिंपिकमध्ये तळाचे स्थान निराशाजनक होते. यावेळचा भारतीय महिला हॉकी संघ अनुभवी आहे. टोकियोत पदक जिंकण्याची मनीषा भारतीय संघाची कर्णधार बाळगून आहे. वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतल्यास, भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. टोकियोत भारताला महिला हॉकीत पदक मिळाल्यास ती ऐतिहासिक कामगिरी ठरेल. त्याचवेळस पात्रता लढतीत पहिल्या टप्प्यात लढत सहज जिंकलेल्या भारतीय संघास अमेरिकेने दुसऱ्या टप्प्यात खिंडीत गाठले, राणीच्या गोलमुळे वाटचाल सुकर झाली हे दुर्लक्षिता येणार नाही. 

लक्षवेधक खेळ
 शूएर्ड मरिन हे ४५ वर्षांचे असून नेदरलँड्समधील व्यावसायिक प्रशिक्षक आहेत. भारतात प्रशिक्षक या नात्याने येण्यापूर्वी त्यांनी डच महिला संघालाही मार्गदर्शन केलेले आहे. २०१७ मध्ये ते भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक झाले. मध्यंतरी ते काही काळ भारताच्या पुरुष संघाचे प्रशिक्षकही होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला हॉकी संघाने वर्षभरात लक्षवेधक खेळ केला आहे. संघाने मेहनत घेतली, त्यामुळे ऑलिंपिकचा प्रवेश साध्य झाला. भारताच्या महिला हॉकी संघाने गतवर्षी लंडन येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत आठवा क्रमांक मिळविला. रिओ ऑलिंपिकमधील बारावा क्रमांक पाहता, विश्वकरंडकात खेळ सुधारल्याचे दिसून आले. गतवर्षी जाकार्ता येथे झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताने अंतिम फेरी गाठली, पण रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी आवश्यक गुण मिळविताना भारतीय महिलांनी एफआयएच सीरिज फायनल्समध्ये एशियाड विजेत्या जपानला हरविले. त्यामुळे जाकार्तातील पराभवाचा बदला घेतल्याचे समाधान भारतीय संघाला मिळाले. मरिन यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने टोकियोतही सुधारित खेळाची मालिका राखल्यास चांगले निकाल मिळू शकतात.

संबंधित बातम्या