भारतीय फुटबॉलचा गौरव

किशोर पेटकर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

क्रीडांगण
 

भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार आशालता देवी हिला आशियायी फुटबॉल महासंघाने (एएफसी) वार्षिक पुरस्कारांसाठी नामांकन देणे हा देशातील फुटबॉलचा मोठा गौरव आहे. आशियायी फुटबॉल मैदानावर भारतीय फुटबॉलला गांभीर्याने पाहिले जाते, याचे प्रमाण मिळाले आहे. मणिपूरमधील इंफाळ येथील आशालता २६ वर्षांची असून भारतीय फुटबॉल संघाची ती दीर्घानुभवी बचावपटू आहे. चीनची ली यिंग आणि जपानची साकी कुमागाई या महिला फुटबॉलपटूंसमवेत आशालता हिला एएफसी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. आशियातील पहिल्या तीन महिला फुटबॉलपटूंत आशालता हिची गणना होणे ही फार मोठी उपलब्धी आहे. चीनची ली यिंग ही अनुभवी फुटबॉलपटू आहे. गतवर्षी झालेल्या महिलांच्या आशिया करंडक स्पर्धेत तिने सर्वाधिक गोल केले होते, तसेच गतवर्षी फ्रान्समध्ये झालेल्या महिला विश्वकरंडक स्पर्धेत ‘राऊंड ऑफ १६’ फेरी गाठलेल्या चीनच्या वाटचालीत ली यिंग हिने मोलाची भूमिका बजावली होती. जपानची साकी कुमागाई हीसुद्धा अनुभवी महिला फुटबॉलपटू आहे. साकी युरोपीय क्लब पातळीवर व्यावसायिक फुटबॉल खेळते. ती फ्रान्समधील लिऑन संघाची प्रमुख खेळाडू आहे. गतवर्षी महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत जपानकडून खेळताना साकी हिने लक्षवेधक खेळ केला होता. ली यिंग आणि साकी कुमागाई या नावाजलेल्या खेळाडूंसमवेत आशालता हिला नामांकन मिळाले आहे, यावरून भारतीय महिला फुटबॉलची आशियायी पातळीवरील प्रगती लक्षात येते. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ देशातील महिला फुटबॉलच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. दक्षिण आशियात भारतीय महिला फुटबॉलचा दबदबा आहे. भारताने सलग चार वेळा सॅफ करंडक महिला स्पर्धा जिंकली आहे. या यशात आशालता हिने मोलाचे योगदान दिलेले आहे. वयोगट पातळीवरून खेळत आलेल्या आशालताने भारतीय महिला फुटबॉल संघाच्या बचावफळीत भक्कम तटबंदी तयार केली आहे.

अनुभवी फुटबॉलपटू
 भारतीय महिला फुटबॉल संघाने गतवर्षी मेमॉल रॉकी यांच्या मार्गदर्शनाखाली उठावदार खेळ केला. संघाने सॅफ करंडक स्पर्धा जिंकली, तसेच पुढील वर्षीच्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रतेत दुसरी फेरीही गाठली. प्रशिक्षक मेमॉल आणि कर्णधार आशालता यांची चांगलीच जोडी जमली आहे. खडतर मेहनतीच्या बळावर आशालताने महिला फुटबॉलमध्ये वैयक्तिक लौकिक टिकवून ठेवला आहे. गतवर्षी देशातील महिला फुटबॉल लीग स्पर्धा सेथू एफसी संघाने जिंकली, त्या संघाची यशस्वी कामगिरी आशालतावर केंद्रित होती. मणिपूरची ही अनुभवी फुटबॉलपटू २०१५ मध्ये मालदीवमधील प्रिमिअर लीग स्पर्धेत न्यू रेडियंट क्लबकडून खेळली होती. भारतीय महिला फुटबॉलमध्ये आशालता निष्णात गणली जाते, त्यामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने २०१८-१९ मधील सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटू म्हणून तिच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. तिच्या वाटचालीत राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षक मेमॉल यांच्या इतकाच चाओबा देवी यांचाही वाटा आहे. त्याचवेळी तिच्या संघातील सहकाऱ्यांनाही दुर्लक्षिता येणार नाही. फुटबॉल हा सांघिक खेळ आहे. आशालताच्या वाटचालीत तिच्यासमवेत खेळणाऱ्या खेळाडूंचाही वाटा आहे. फिफाच्या जागतिक क्रमवारीत भारतीय महिला संघ ऑक्टोबर महिन्याच्या मानांकनात ५८ व्या स्थानी होता. देशातील मुली मोठ्या प्रमाणात फुटबॉल खेळताना दिसत आहे. महिला फुटबॉल लीग स्पर्धेनेही राष्ट्रीय पातळीवर जम बसविला आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेने भारतीय फुटबॉलमध्ये क्रांती घडविली आहे. भविष्यात आयएसएलच्या धर्तीवर महिलांची स्पर्धा सुरू झाल्यास नवल वाटायला नको.

फुटबॉल विकासावर भर
 अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने पायाभूत पातळीवरील फुटबॉल विकासावर भर दिला आहे. त्याची दखल ‘एएफसी’ने घेतली आहे. त्यामुळेच भारतीय महासंघाला वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात सिंगापूर व हाँगकाँगसह ‘एएफसी अध्यक्ष मान्यता’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. हा पुरस्कार भारताला २०१४ मध्ये मिळाला होता. आता पुन्हा एकदा देशातील ग्रासरूट फुटबॉल विकास अधोरेखित झाला आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुला व मुलींच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग या नात्याने ‘बेबी लीग’ स्पर्धा घेतली जाते. लहान वयातील कच्ची फुटबॉल गुणवत्ता हेरणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून देशभरातून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्याची दखल घेत ‘एएफसी’ने नामांकन दिले आहे.

संबंधित बातम्या