दक्षिण आफ्रिकेचे रग्बी जगज्जेतेपद

किशोर पेटकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

क्रीडांगण
 

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्यांदा रग्बी जगज्जेतेपद मिळविताना न्यूझीलंडच्या विक्रमाशी बरोबरी साधली. जपानमध्ये झालेल्या यावेळच्या रग्बी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्प्रिंगबॉक्स या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडला ३२-१२ फरकाने लीलया हरविले. दक्षिण आफ्रिकेचा जागतिक रग्बीत न्यूझीलंडप्रमाणेच दबदबा आहे. शेवटपर्यंत हार मानायची नाही हेच स्प्रिंगबॉक्स संघाचे उद्दिष्ट्य असते आणि त्याच जोरावर त्यांनी तीन अंतिम लढती जिंकल्या आहेत. १९९५ मध्ये घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदा विश्वविजेता ठरला. अतिशय चुरशीच्या लढतीत त्यांनी न्यूझीलंडचा पाडाव केला होता. त्यानंतर २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यांदा जगज्जेतेपद मिळविले. फ्रान्समध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी इंग्लंडला हरविले होते. यंदा स्प्रिंगबॉक्स संघाने इंग्लंडला तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले. आंद्रे पोलार्ड हा दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख खेळाडू. यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६९ गुण त्यानेच नोंदविले. स्पर्धेच्या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या नीरस शैलीवर टीका झाली, पण हा संघ जेतेपदाच्या ध्येयापासून दूर हटला नाही. प्रशिक्षक रॅसी इरॅस्मस यांनी संघात चेतना जागविली. त्यामुळेच १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा एकदा जगज्जेता होऊ शकला. आक्रमक खेळ हेच या संघाचे मुख्य सूत्र, त्या बळावर त्यांनी इंग्लंडला डोके वर काढू दिले नाही. सिया कोलिसी हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार. गतवर्षी प्रशिक्षक इरॅस्मस यांनी कोलिसी याची कर्णधारपदी नियुक्ती केली. दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी संघ कर्णधारपदी प्रथमच कृष्णवर्णीय खेळाडूची नियुक्ती करून इरॅस्मस यांनी गुणवत्तेची कदर केली. 

आशियात प्रथमच...
 रग्बीतील विश्वकरंडक स्पर्धेस १९८७ मध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी तीन विजेतेपदांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने दोन वेळा, तर इंग्लंडने एक वेळ स्पर्धा जिंकलेली आहे. इंग्लंडने चार वेळा अंतिम फेरी गाठली, त्यापैकी तीन वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फ्रान्स हा सर्वांत कमनशिबी संघ आहे. तीन वेळा अंतिम फेरी गाठूनही त्यांना एकदाही जगज्जेतेपदाचा जल्लोष करता आलेला नाही. चार वर्षांनंतर फ्रान्समध्ये पुढील विश्वकरंडक स्पर्धा होईल. त्यावेळी घरच्या मैदानावर हा संघ जगज्जेतेपदाचे स्वप्न साकारणार का हे पाहावे लागेल. यंदा प्रथमच आशिया खंडात रग्बी विश्वकरंडक स्पर्धा रंगली. सुमारे सहा आठवडे चाललेली ही स्पर्धा जपानसाठी एकप्रकारे आव्हानच ठरली. नैसर्गिक संकटावर मात करत त्यांनी विश्वकरंडक स्पर्धेच्या यजमानपदाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. स्पर्धेच्या कालावधीत हगिबिस चक्रीवादळाचा तडाखा जपानला बसला. सुरक्षिततेच्या कारणास्तव काही सामने रद्दही करावे लागले, पण त्याचा स्पर्धेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला नाही. देश प्रथमच रग्बी विश्वकरंडकाचे आव्हान पेलत असताना त्यांच्या संघाने मैदानावरही नेत्रदीपक कामगिरी बजावली. जपानने उपांत्यपूर्व फेरी गाठली. रग्बी विश्वकरंडक स्पर्धेत बाद फेरी गाठणारा पहिला आशियायी देश हा मान जपानने पटकाविला.

युरोप-ओशियानिया देशांचे प्राबल्य
 रग्बी विश्वकरंडकात आशियाचे प्रतिनिधित्व तुटपुंजेच. फक्त एकच देश यंदा स्पर्धेत खेळला. जपानने आशियाचा झेंडा फडकावत ठेवताना प्रत्येक विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचा मान मिळविला आहे. रग्बीत युरोप व ओशियानिया देशांचे प्राबल्य पाहायला मिळते. जपानमधील विश्वकरंडक स्पर्धेत आठ देश युरोपातील होते, तर पाच देश ओशियानियातील होते. याशिवाय दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील प्रत्येकी दोन देशांना प्रतिनिधित्व मिळाले. रग्बी हा खेळ जगव्यापी होत आहे. युरोप, ओशियानिया गटात, तसेच दक्षिण आफ्रिकेत हा खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील लढतींना अनन्यसाधारण महत्त्व असते. जपानमधील विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीत ९३ देशांचा सहभाग होता, त्यापैकी २० संघ मुख्य स्पर्धेत खेळू शकले. भारताचा विचार करता, रग्बी हा खेळ अजूनही प्राथमिकावस्थेत आहे. काही मोजक्या भागातच हा खेळ हौशी पातळीवर दिसतो. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, फ्रान्स हे रग्बीतील बलाढ्य संघ आहेत. फिजी, सामोआ, टोंगा या लहानग्या ओशियानिया देशांनीही रग्बी खेळात खूप मजल मारलेली आहे. वेल्स, स्कॉटलंड, इटली, आयर्लंड या देशांचाही रग्बीत वरचष्मा आहे. जपानमधील विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी जागतिक क्रमवारीत आयर्लंड अव्वल स्थानी होता, पण त्यांना विश्वकरंडक स्पर्धेत कधीच उपांत्यपूर्व फेरी पार करता आलेली नाही. 

संबंधित बातम्या