‘सिटी फुटबॉल’ व्यवस्थापन मुंबईत

किशोर पेटकर
सोमवार, 9 डिसेंबर 2019

क्रीडांगण
 

जगातील प्रमुख फुटबॉल क्लब संघांची मालकी असलेल्या सिटी फुटबॉल ग्रुपचे (सीएफजी) भारतात आगमन झाले आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत आता सिटी फुटबॉल ग्रुपचे अस्तित्व पाहायला मिळेल. आयएसएल स्पर्धेत सुरुवातीचे चार मोसम विशेष चमक दाखवू न शकलेल्या मुंबई सिटी एफसी संघाची आता बहुतांश मालकी सीएफजी यांच्याकडे गेली आहे. जगभरात व्यापलेल्या या बलाढ्य समूहाने मुंबई सिटी एफसीचे ६५ टक्के समभाग विकत घेतले आहेत. अभिनेता रणबीर कपूर आणि बिमल पारेख यांच्याकडे एकत्रितपणे ३५ टक्के मालकी समभाग असतील. सिटी फुटबॉल ग्रुपने मालकी हक्क मिळविलेला मुंबई सिटी एफसी हा जगभरातील आठवा क्लब आहे. यापूर्वी इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, उरुग्वे, स्पेन व चीन या देशांत सीएफजी यांनी आपले साम्राज्य पसरविले आहे. भारत हा खंडप्राय देश आहे. आयएसएल स्पर्धेच्या माध्यमातून देशातील फुटबॉल लोकप्रियतेकडे सरकत आहे. मोठ्या लोकसंख्येच्या या देशात मार्केटिंग, तसेच आर्थिक बाबींच्या दृष्टीने मोठी संधी आहे हे हेरूनच सीएफजीने भारतीय फुटबॉल क्लबचे मालकी हक्क मिळविले आहेत, त्यात दुमत नसावे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, त्यामुळे त्यांनी या शहरातील संघाचा ताबा मिळविला. फुटबॉल स्पोर्ट्‌स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) ही कंपनी आयएसएल स्पर्धेची प्रमोटर आहे आणि रिलायन्स फाउंडेशनचे एफएसडीएल हे अपत्य आहे. रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या एफएसडीएलच्या प्रमुख आहेत. साहजिकच सिटी फुटबॉल ग्रुपने मुंबई सिटी एफसीचे सर्वाधिक समभाग घेण्याबाबतचा उद्देशही स्पष्ट आहे. जगात फुटबॉलकडे केवळ खेळ या नजरेने पाहिले जात नसून, अर्थकारणही मोठ्या प्रमाणात संबंधित असते.

जगभरात पाळेमुळे
इंग्लंडमधील मातब्बर फुटबॉल संघ मँचेस्टर सिटी एफसीची मालकी सिटी फुटबॉल ग्रुपकडे आहे. मँचेस्टर सिटीने गतमोसमात इंग्लिश प्रिमिअर लीग (ईपीएल) स्पर्धा जिंकली होती. मँचेस्टर सिटी संघाचे चाहते इंग्लंडसह जगभरात विखुरले आहेत. सिटी फुटबॉल ग्रुपसाठी मँचेस्टर सिटी संघआर्थिक बाबतींतही फायदेशीर ठरला आहे. याशिवाय अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटी, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न सिटी, जपानमधील योकोहामा मरिनोस, उरुग्वेतील क्लब एटलेटिको टॉर्के, स्पेनमधील जिरोना एफसी आणि चीनमधील सिचिआन जिऊनियू एफसी या संघांची मालकीही सिटी फुटबॉल ग्रुपकडे आहे. यावरून त्यांची पाळेमुळे जगभरात रुतलेली आणि फैलावल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये स्थापन झालेल्या सिटी फुटबॉल समूहाचे मुख्यालय लंडनमध्ये आहे. त्यात अबुधाबी युनायटेड ग्रुपची सिटी फुटबॉलमध्ये ७८ टक्के गुंतवणूक आहे, शिवाय चायना मीडिया कॅपिटल, सिल्व्हर लेक या समूहांचेही सिटी फुटबॉलमध्ये समभाग आहे, पण ते एकत्रितपणे २२ टक्के आहेत. मँचेस्टर सिटी, मेलबर्न सिटी, क्लब एटलेटिको टॉर्के या फुटबॉल क्लबमध्ये सीएफजी यांची १०० टक्के गुंतवणूक आहे. मन्सूर बिन झायेद अल नाह्यान हे फुटबॉल सिटी ग्रुपचे प्रमुख आहेत. ते शेख मन्सूर या नावाने परिचित असून संयुक्त अरब अमिरातीतील राजघराण्यातील आहेत, त्या देशाचे उपपंतप्रधानही आहेत. 

मुंबई सिटी बहरणार?
आयएसएल फुटबॉल स्पर्धेला २०१४ मध्ये सुरुवात झाली. यंदा स्पर्धेचा सहावा मोसम सुरू आहे. या कालावधीत मुंबई सिटी एफसीची कामगिरी आयएसएल स्पर्धेत उठावदार ठरलीच नाही, अपवाद फक्त गतमोसमाचा. पोर्तुगीज प्रशिक्षक जॉर्ज कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटीने २०१८-१९ मोसमात आयएसएल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यापूर्वी हा संघ ढेचाळतानाच दिसला. सिटी फुटबॉल व्यवस्थापन मुंबई सिटी एफसीला सावरण्याची चिन्हे आहेत. २०१४ आणि २०१५ मध्ये या संघाने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमला घरच्या मैदानाचा दर्जा दिला. त्यानंतर हा संघ आयएसएल स्पर्धेतील सामने अंधेरी क्रीडा संकुलातील मुंबई फुटबॉल अरेनावर खेळत आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता अवघी आठ हजार इतकी आहे. आयएसएल स्पर्धेत बहरण्यासाठी मुंबई सिटी संघाला फुटबॉल संस्कृती रुजवावी लागेल, त्यासाठी ग्रासरूट फुटबॉलवर जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. सिटी फुटबॉलच्या माध्यमातून मुंबई सिटी व्यवस्थापनात पैसा येईल हे नक्की आहे, साहजिकच आयएसएल स्पर्धेत चँपियन होण्याचे स्वप्न मुंबईतील हा संघ पाहू शकतो.

संबंधित बातम्या