पाकिस्तानला भारत भारी

किशोर पेटकर
सोमवार, 23 डिसेंबर 2019

क्रीडांगण
 

सुरक्षिततेच्या कारणास्तव भारताने इस्लामाबाद येथे डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेतील सामना खेळण्यास अनुत्सुकता दाखविली. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया-ओशेनिया विभागातील गट क्रमांक एकमधील लढत तटस्थ ठिकाणी खेळविण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने घेतला. पाकिस्तानने थोडीफार नाराजी व्यक्त केलीच, पण ठरल्यानुसार कझाकिस्तानमधील नूर-सुलतान येथे लढत रंगली, मात्र एकतर्फी ठरली. पाकिस्तानचा संघ बलाढ्य भारताला आव्हान देऊच शकला नाही. बहुचर्चित ठरलेल्या या लढतीत पाकिस्तानचा पुरता धुव्वा उडाला. भारताने तिन्ही एकेरी, तसेच दुहेरीतही बाजी मारली. ही कामगिरी बजावताना भारतीय संघाने एकही सेट गमावला नाही. फक्त सात गेमच्या मोबदल्यात भारताने लढत जिंकत पाकिस्तानवरील निर्विवाद वर्चस्व अधोरेखित केले. २२ वर्षीय सुमीत नागल याने धडाका राखताना एकेरीतील दोन्ही लढती जिंकल्या. रामकुमार रामनाथन याने एकेरीतील पहिली लढत जिंकत भारताला आश्वासक सुरुवात करून दिली होती. डेव्हिस करंडक स्पर्धेतील २९ वर्षांच्या कारकिर्दीत दिग्गज लिअँडर पेस याने वयाच्या ४६ व्या वर्षी दुहेरीत विक्रमी कामगिरी बजावली. पाकिस्तानला नमविल्यामुळे भारतीय संघ आता जागतिक गट पात्रता लढतीत खेळणार आहे. आव्हान क्रोएशियाचे असून पुढील वर्षी ५ ते ७ मार्च या कालावधीत भारताला खेळावे लागेल. पाकिस्तानविरुद्ध भारताचे प्रमुख खेळाडू संघात नव्हते. नखेळणारा कर्णधार महेश भूपती यांना बदलण्यात आले आणि त्यांच्या जागी रोहित राजपाल यांची नियुक्ती झाली.

लिअँडर पेसचा विक्रम
 पाकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीत वयाच्या अर्धशतकापासून चार वर्षे दूर असलेला लिअँडर पेस ‘विक्रमी’ ठरला. तो चेन्नईच्या जीवन नेंदून्चेझीयन याच्या साथीत दुहेरीत खेळला. लिअँडर-जीवन जोडीने पाकिस्तानच्या जोडीस ६-१, ६-३ असे सहजपणे परतविले. पेसहा हा डेव्हिस करंडक स्पर्धेतील दुहेरीत ४४ वा विक्रमी विजय ठरला. त्याने यापूर्वीच इटलीच्या निकोला पित्रांजेलीचा ४२ विजयांचा विक्रम मोडला होता. नूर-सुलतान येथे पेसने स्वतःचाच ४३ विजयांचा विक्रम मागे टाकत एक पाऊल पुढे टाकले. पित्रांजेलीचा विक्रम पेसने चीनविरुद्धच्या लढतीत मोडला होता. पेसची जिद्द पराकोटीची आहे. १९९० मध्ये त्याने डेव्हिस करंडक स्पर्धेत पदार्पण केले. तेव्हापासून हा जिगरबाज खेळाडू उत्कट देशभावनेने खेळत आहे. १९९२ मध्ये बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व केले. तेव्हापासून तो सात ऑलिंपिक स्पर्धा खेळला आहे. असा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला क्रीडापटू आहे, तर टेनिसमधील एकमेव खेळाडू आहे. लिअँडरने १९९६ मधील अटलांटा ऑलिंपिकमध्ये पुरुष एकेरीत ब्राँझपदकही जिंकले. वय वाढले, पण लिअँडरची इच्छाशक्ती कमी झालेली नाही. पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकमध्ये खेळण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. तसे झाल्यास त्याच्या नावे आणखी एक उच्चांक नोंदीत होईल. डेव्हिस करंडकात लिअँडरची कारकीर्द एक आख्यायिकाच आहे, त्याची तब्बल तीन दशकांची वाटचाल प्रेरणादायी आहे. हल्लीच्या कालावधीत दीर्घकाळ दुहेरीत खेळणारे टेनिसपटू कमीच आहेत, त्यामुळे पेसचा डेव्हिस करंडक दुहेरीतील ४४ विजयांचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता फारच कमी आहे.

स्पेन विजेते
 स्पेनने २०१९ मधील डेव्हिस करंडक स्पर्धा जिंकली. त्यांचे हे स्पर्धेतील सहावे विजेतेपद ठरले. जागतिक पुरुष टेनिस एकेरीतील अग्रमानांकित राफेल नदालच्या समावेशामुळे ताकद वाढलेल्या स्पेनने अंतिम लढतीत कॅनडास संधीच दिली नाही. लढत २-० फरकाने सहजपणे जिंकली. कॅनडाच्या युवा संघाला स्पेनचे आव्हान झेपले नाही. नदाल व रॉबर्टो बॉतिस्ता आगुत यांनी स्पेनमधील माद्रिद शहरात संस्मरणीय कामगिरी नोंदविली. रॉबर्टो याच्यासाठी हा करंडक खूपच भावनिक ठरला. कॅनडाविरुद्धच्या लढतीस तीन दिवस बाकी असताना रॉबर्टो बॉतिस्ता आगुत याचे वडील वारले. पितृवियोगाचे दुःख मागे सारत तो टेनिस कोर्टवर उतरला आणि देशासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली. एकेरीतील दुसऱ्या लढतीत कॅनडाच्या १९ वर्षीय फेलिक्स ऑगेर-अलियासिम याला हरविल्यानंतर रॉबर्टो अश्रू रोखू शकला नाही. वडिलांची त्याला तीव्र आठवण झाली. नदाल आणि आगुत यांच्या कामगिरीमुळे आठ वर्षांनंतर स्पेनला डेव्हिस करंडक जिंकता आला. शेवटच्या वेळेस त्यांनी ही स्पर्धा २०११ मध्ये जिंकली होती, तर २०१२ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे नदालने करंडकाचा आनंद व्यक्त करताना हे यश ‘अविस्मरणीय’ असल्याचा उल्लेख केला.

संबंधित बातम्या