रशियाला उत्तेजकांचा विळखा

किशोर पेटकर
सोमवार, 23 डिसेंबर 2019

क्रीडांगण
 

रशियातील क्रीडाविश्व उत्तेजकांमुळे बदनाम झालेले आहे. पदके जिंकण्यासाठी त्या देशातील क्रीडापटू मोठ्या प्रमाणात संघटित पद्धतीने उत्तेजकांची मदत घेत आहेत, त्यात सरकारचाही हस्तक्षेप असल्याचा आरोप होत आहे. क्रीडा क्षेत्रात उत्तेजक सेवनाच्या रोगाने साऱ्याच देशांना ग्रासलेले आहे, पण रशियात डोपिंगने राक्षसी स्वरूप धारण केले आहे. साहजिकच रशियन क्रीडापटू मेहनतीने जिंकण्याचे दिवस मागे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात या देशातील क्रीडापटू उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळत आहेत. यावरून एक बाब सिद्ध होते, ती म्हणजे उत्तेजक सेवन प्रकरण सर्वसंमतीने होते, खेळाडूंना नियोजनबद्ध पद्धतीने उत्तेजकांचे डोस दिले जातात, जेणेकरून जास्त मेहनत न करता या खेळाडूंची क्षमता उच्च प्रतीची ठरावी. रशियातील क्रीडा मंत्रालयाकडेही बोट दाखविले जाते. उत्तेजक सेवन परंपरा आता रशियासाठी भस्मासुर ठरली आहे. जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा) रशियाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो येथील ऑलिंपिक स्पर्धेत, बीजिंगमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत, तसेच २०२२ मधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत रशियाला सहभागी होऊ देऊ नये अशी शिफारस वाडाने केल्यामुळे क्रीडाविश्व खडबडून जागे झाले आहे. वाडाच्या शिफारशीचा मान राखला गेला, तर टोकियो ऑलिंपिकमध्ये रशियाचे राष्ट्रगीत वाजण्याची शक्यता नाही. क्रीडापटूंवर उत्तेजक सेवन प्रकरणी आजन्म बंदी घातल्याची कित्येक उदाहरणे आहेत. उत्तेजक सेवनप्रकरणी संपूर्ण देशावर बंदी येण्याची जागतिक क्रीडाक्षेत्रातील पहिलीच घटना ठरू शकते. डोपिंगप्रकरणी सारेच देश सावध आहेत. आपल्या भारतातही उत्तेजकविरोधी जागृती आहे. युवा क्रीडापटूंना उत्तेजकांचे दुष्परिणाम पटवून दिले जात आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अगोदर उत्तेजक चाचणीस अनुकूल नव्हते, पण त्यांनीही आता दृष्टिकोन बदलला आहे.

रशियाचा लौकिक खलास...
 ऑलिंपिकमध्ये नेहमीच अमेरिका व रशिया यांच्यात चढाओढ पाहायला मिळालेली आहे. पूर्वी सोविएत युनियन रशिया या अखंडित भूखंडाची जागतिक क्रीडाक्षेत्रात मोठी मक्तेदारी होती. नव्वदच्या दशकात सोविएत युनियनचे विघटन झाले. रशियाची क्रीडा क्षेत्रातील ताकद कमी झाली. मात्र, या देशाचा क्रीडाक्षेत्रात दादागिरी राखण्याची महत्त्वाकांक्षा कायम राहिली. त्यातून जग जिंकण्याच्या उद्देशाने क्रीडापटूंना उत्तेजक सेवनाची सवय लावण्याचे प्रकार संघटितपणे सुरू झाले. उत्तेजकसेवनाशिवाय पदक शक्य नाही हेच क्रीडापटूंच्या मनावर बिंबवण्यात येते. गेल्या काही वर्षांत रशियातील उत्तेजक सेवनाचा मोठा उद्रेकच पाहायला मिळाला. दोषी क्रीडापटूंवर कारवाई करत उत्तेजकविरोधी जागतिक संस्थाही थकली, त्यामुळे आता त्यांनी संपूर्ण देशावरच बंदी लादण्याची शिफारस केली आहे. रशियातील उत्तेजकविरोधी संस्थाही निलंबित झाली आहे. उत्तेजकांच्या मदतीने रशियन क्रीडापटू यशवंत ठरले, ही पूर्णतः अखिलाडूवृत्ती होती. कालांतराने त्यांचा गुन्हा सिद्धही झाला. जिंकण्यासाठी मेहनत घेणाऱ्या इतर देशांतील क्रीडापटूंच्या परिश्रमावर रशियातील डोपिंगमुळे पाणी पडले जात होते. त्यास चाप बसणे आवश्यक होते. हे काम ग्रेगॉर रेडचेनकोव्ह यांनी केले. ते रशियन उत्तेजकविरोधी संस्थेचे पदाधिकारी होते. रशियातील क्रीडा क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने चालणाऱ्या डोपिंगची जगभरात वाच्यता झाल्याने मोठा स्फोटच झाला. केवळ क्रीडापटूच नव्हे, तर क्रीडा संघटक, नेते, सरकारी यंत्रणा, प्रशिक्षक आणि संबंधितांच्या संगनमताने रशियात डोपिंग सर्रासपणे चालत असल्याचे जगजाहीर झाले. साऱ्या क्रीडाविश्वाला जबर धक्का बसला.

यापूर्वीही निर्बंध
 वाडाने ऑलिंपिक आणि विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उत्तेजकाच्या आहारी गेलेल्या रशियावर बंदीची शिफारस केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने, तसेच जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. याप्रकरणी रशिया दाद मागण्याची शक्यता आहे, तरीही रशियन क्रीडापटूंकडे सारे विश्व संशयाच्याच नजरेने पाहील. २०१६ मध्ये ब्राझीलमधील रिओ द जानेरो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत रशियाने एकूण ५६ पदके जिंकली होती. यामध्ये १९ सुवर्ण, १७ रौप्य आणि २० ब्राँझपदकांचा समावेश होता. उत्तेजक सेवनप्रकरणी रशियातील काही क्रीडा संघटनांच्या ऑलिंपिक सहभागावर २०१६ मध्ये निर्बंध होते. तेव्हाही जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने रशियावरील बंदीची शिफारस केली होती, पण आयओसीने ती स्वीकारली नव्हती. त्याबद्दल वाडाने स्पष्ट नाराजीही व्यक्त केली होती. रिओ ऑलिंपिकसाठी आयओसीने २७८ क्रीडापटूंच्या ऑलिंपिक सहभागास हिरवा कंदील दाखविताना, १११ क्रीडापटूंना बाहेर ठेवले होते. यामध्ये ॲथलेटिक्स, रोईंग, वेटलिफ्टिंग, कनोईंग, कुस्ती, मॉडर्न पेंटाथलॉन, सायकलिंग या खेळांचा समावेश होता. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समितीने खंबीर भूमिका घेतली होती.    

संबंधित बातम्या